गौरी पटवर्धन
अनेकदा असं होतं, की आपल्याला व्यायाम करायचा असतो. त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स करण्याची आपली तयारी असते. आपण व्यायामासाठी वेळ काढणार असतो, त्यात सातत्य राखण्यासाठीचा मनाचा निग्रहही आपण केलेला असतो. पण हे सगळं असलं, तरी आपल्याला व्यायाम करता येत नाही, कारण आपलं शरीर त्यासाठी साथ देत नाही.
आपली पाठ दुखते, पाय दुखतात, गुढगे दुखतात, मान दुखते, खांदे दुखतात… त्यामागे मधुमेह, संधिवात असे आजार असू शकतात. काही जणींना दुखापत झालेली असू शकते. आणि काही जणींच्या बाबतीत तर निव्वळ अशक्तपणा हेही कारण या अंगदुखीच्या मागे असू शकतं. पण या दुखण्याच्या मागची कारणं काहीही असतील तरी आपण एका चमत्कारिक दुष्टचक्रात अडकतो.
बरं वाटत नाही म्हणून व्यायाम करता येत नाही. आणि व्यायाम करता येत नाही त्यामुळे बरं वाटत नाही. आणि मग आपल्या फिटनेसचा प्रश्न हा अंडं आधी का कोंबडी आधी या प्रश्नाइतकाच जटील होऊन बसतो. अगदी चालण्याचा व्यायामसुद्धा करता येत नाही अशी काहीजणींनी अवस्था झालेली असते. आणि त्यातून बरं होण्यासाठी व्यायाम करणं, वजन कमी करणं याला काही पर्यायही नसतो. अशा वेळी अशा परिस्थितीत अडकलेल्यांनी काय करायचं? तर आपल्याला असलेल्या शारीरिक मर्यादा सांभाळून करण्यासारखा व्यायाम शोधायचा.
व्यायाम म्हणून चालणंसुद्धा कठीण वाटतं, ती काय व्यायाम करू शकते?
१. तर सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे सायकल चालवणं. सायकल चालवणं हा उत्तम एरोबिक व्यायाम आहे. शिवाय त्यात पायाचे स्नायू आणि सांधे वेगळ्या प्रकाराने वापरले जातात. म्हणजे, चालणं आणि सायकल चालवणं हे प्रामुख्याने पायाचे किंवा लोअर बॉडीचेच व्यायाम आहेत. पण त्यातून होणारा व्यायाम मात्र वेगवेगळ्या प्रकारचा आहे.
२. त्यामुळेच, ज्यांना चालणं हा व्यायाम सोसत नाही, अशांनी सायकल चालवणं या व्यायामाला एक ट्रायल देऊन बघायला काहीच हरकत नाही. कारण सायकल चालवणं हा तसा अगदी हलका व्यायाम आहे.
३. असा अजून एक हलका व्यायाम, म्हणजे असा व्यायाम जो आपल्याला शब्दशः हलकं करतो तो म्हणजे पोहायला जाणं. पोहोणे या व्यायामप्रकारात दुखापत जवळजवळ होतच नाही. कारण दुखापत होण्यासारख्या अचानक हालचाली पोहोण्यात होत नाहीत. दुसरं म्हणजे अनेकवेळा पाण्यात हालचाली करताना पाण्याचा जो विरोध (रेझिस्टन्स) जाणवतो त्यामुळे स्नायू किंवा सांधे मजबूत होणारा व्यायाम करता येतो. तो व्यायाम करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.पण तसा व्यायाम जरी बाजूला ठेवला तरी पोहोणं हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. कारण इतर एरोबिक व्यायामप्रकारात बहुतेक वेळा फक्त लोअर बॉडीचा व्यायाम होतो, पण पोहोताना मात्र सगळं शरीर वापरलं जातं. त्यामुळे पोहोणं हा एक हलका आणि तरीही अतिशय उपयुक्त व्यायाम आहे.
४. काही जणींना मात्र उठून कुठलाही व्यायाम करणं कठीण असतं. अशा वेळी चक्क खुर्चीत बसून व्यायाम करणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. खुर्चीत बसून कुठले व्यायाम करता येतील त्याचे अनेक व्हिडिओज युट्युबवर उपलब्ध असतात.