Join us  

दिवसभरात ५ तासांहून जास्त वेळ लॅपटॉपवर काम करता? रोज न चुकता करा ५ आसनं, पाठीची दुखणी टाळायची तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 2:22 PM

If You are Working on Laptop More than 5 Hrs Do this Yoga asana : योगा हा कोणत्याही समस्येवरील उत्तम उपाय असून नियमितपणे आसने केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो

लॅपटॉपवर काम करणे ही आता आपल्या प्रत्येकाची गरज झाली आहे. ऑफीसच्या कामाला पर्याय नसल्याने आपल्याला दिवसाचे ८ ते १० तास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करावेच लागते. दिवसभर बैठ्या अवस्थेमुळे पोटाचा आणि कंबरेचा भाग वाढतो, पाठ-मान, खांदे आखडतात. अनेकदा जास्त वेळ बसल्याने कंबरेचा आणि मांड्यांचा खालचा भागही सुन्न झाल्यासारखे होते. बरेचदा कामाचे इतके जास्त प्रेशर असते की जागेवरुन उठावे म्हटले तरी उठता येत नाही. अशावेळी व्यायामाला वेळ मिळणे तर शक्यच नाही. ऑफीसमध्ये लॅपटॉपसमोर नसतो तेव्हा मोबाइलवर कॉल आणि इतर कामे सुरू असल्याने डोक्यात ऑफीस नावाचे चक्र सुरूच असते. त्यामुळे शारीरिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते. असे होऊ नये म्हणून योगा अभ्यासक स्मृती नियमितपणे करायला हवीत अशी ५ आसने सांगतात. ती कोणती आणि कशी करायची ते पाहूया (If You are Working on Laptop More than 5 Hrs Do this Yoga asana)...

१. उत्तन शिशोआसन 

गुडघ्यापर्यंतचे पाय जमिनीला टेकून ठेवायचे. कंबर वर उचलायची आणि छातीपासून हाताच्या बोटांपर्यंतचा भाग जमिनीला समांतर टेकलेला ठेवायचा. हनुवटीही जमिनीला टेकलेली राहील असा प्रयत्न करायचा. हे आसन केलेले असताना श्वसनक्रिया सुरू ठेवायची. 

२. मार्जारासन

गुडघे आणि हाताच्या पंज्यांवर मांजरीसारखे बसायचे आणि एकदा कंबर पूर्ण खाली घ्यायची आणि एकदा पूर्ण वरती घ्यायची. मांजर अशाचप्रकारे हालचाल करत असल्याने या आसनाला मार्जारासन नाव पडले असावे. यामुळे मणक्याच्या स्नायूंना व्यायाम होण्यास मदत होते. पाठ वर जाते तेव्हा श्वास घ्यायचा आणि पाठ खाली करतो तेव्हा श्वास सोडायचा. 

३. पर्वतासनामध्ये पॅडलिंग 

पर्वतासन करायला सोपे वाटत असले तरी यामध्ये शरीराच्या बहुतांश स्नायूंवर ताण येतो. हात आणि पायाचे तळवे जमिनीला चिकटून ठेवावेत. यामध्ये पायाच्या टाचा उचलून पाय गुडघ्यात एक-एक करुन वाकवावेत. यामुळे दिर्घकाळ बसून अवघडलेल्या स्नायूंना व्यायाम मिळण्यास मदत होते. 

४. शशांकासन

वज्रासनात बसून दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यावे. पोटापासून हातांच्या तळव्यापर्यंत शक्यतो जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा.  यामध्ये श्वासोच्छवास नेहमीप्रमाणे चालू ठेवायचा. 

५. जबड्याचा व्यायाम

मानेतून जबडा पुढे घेणे आणि पुन्हा मागे घेणे. असे केल्याने मान, खांदे या सगळ्यांनाच काही प्रमाणात स्ट्रेचिंग होते. त्याचप्रमाणे मान डावीकडे आणि उजवीकडे वळवावी. यामुळे जबड्याचा चांगला व्यायाम होण्यास मदत होते.  

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स