Join us  

वेळ नसेल तर फक्त वीस मिनिटांचा व्यायामही ठरु शकतो प्रभावी! तो कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 6:57 PM

हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग हे नाव ऐकून हा जास्त थकवणारा वगैरे वाटण्याची  शक्यता आहे. पण या व्यायाम प्रकारात वेग, क्षमता, सर्जनशीलता आणि आनंद या सगळ्यांचा विचार केलेला आहे. कमी वेळात जास्त जोरकसपणे होणारा हा व्यायाम प्रकार व्यायामाचा कंटाळा घालवण्यासाठी, व्यायामाची सवय लावण्यासाठी आणि व्यायामाचे फायदे शरीराला मिळवून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

ठळक मुद्देकमी वेळात जास्त उष्मांक जाळण्यासाठी हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग करावं असं तज्ज्ञ म्हणतात.तरुण दिसण्यसाठी हा कमी वेळाचा , काटेकोर आणि वेगवान २० मिनिटांचा व्यायाम खूपच परिणामकारक असतो.आनंदी राहाण्यासाठी, कामात ऊर्जा टिकून राहाण्यासाठी या व्यायाम प्रकाराचा खूप फायदा होतो.

अनेकजण व्यायाम टाळतात, कारण त्यांच्याकडे तेवढा वेळच नसतो. पाऊण तास, एक तास व्यायामासाठी आदर्श वेळ मानली जाते. तेवढा वेळ काढणं अनेकांना शक्य होत नाही. मग वेळ नाही म्हणून व्यायाम नाही असं होतं. पण व्यायाम हा पाऊण तास किंवा एक तासच केला पाहिजे असं नाही. फिटनेस तज्ज्ञ म्हणतात की २० मिनिटांचा विशिष्ट व्यायामही शरीर आणि मनाला पाऊण ते एक तास केला जाणारा व्यायाम देतो.  व्यायाम टाळण्यापेक्षा व्यायाम करणं हे केव्हाही फायदेशीरच . २० मिनिटं व्यायाम करुनही फिट राहाता येतं, ताकद कमावता येते, स्नायुंना आकार देता येतो आणि वजनही कमी करता येतं.

२० मिनिट व्यायामाचे फायदे 

- २० मिनिटांचा व्यायाम हा कसा असेल असा प्रश्न पडला असेल . तर त्याचं उत्तर आहे हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग. हा व्यायामाचा एक प्रकार आहे. हा व्यायाम प्रकार प्रभावी मानला जतो. यात कार्डिओ वर्कआऊटचा समावेश असतो. ज्यामुळे रक्त पंप करण्याची हदयाची क्षमता वाढते. स्नायुंची हालचाल जलद आणि प्रभावी होते. संशोधनातून हे सिध्द झालं आहे हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग या व्यायामप्रकारानं हदयाची क्षमता ४५ मिनिटं पळण्यांनं जेवढी वाढते तितकी दहा मिनिटांच्या व्यायामानं वाढते.

- कमी वेळात जास्त उष्मांक जाळण्यासाठी हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग करावं असं तज्ज्ञ म्हणतात. या व्यायाम प्रकारानं हदयाची कार्यक्षमता वाढते, शिवाय उष्मांकही जळतात. या व्यायाम प्रकाराचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. फक्त त्यासाठी त्याला आरोग्यदायी आहाराचीही जोड द्यावी लागते. खूप वेळ चालण्यानं आणि पळण्यानं होणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त फायदा या कमी वेळाच्या हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंगने होतो. फक्त हा फायदा दिसण्यासाठी हा व्यायाम नित्यनेमानं करायला हवा. हाय इंटेन्सिटी अ‍ॅक्टिव्हिटीने चयापचयाची क्रिया वाढते. त्यामुळे वजन वाढीचा धोका टळतो.

- तरुण दिसण्यसाठी हा कमी वेळाचा , काटेकोर आणि वेगवान २० मिनिटांचा व्यायाम खूपच परिणामकारक असतो. वय वाढतं तसं पेशी निर्माण करण्याची ऊर्जा कमी होते. पण हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंगमुळे नवीन पेशी निर्माण होण्याची क्षमत वाढते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाही. पण हा परिणाम दिसण्यासाठी या व्यायामात सातत्य हवं

- कोणत्याही शारीरिक व्यायामाचा फायदा फक्त शरीराला होत नाही तर मानसिक आरोग्यासाठीही हा व्यायाम उपयोगी ठरत असतो. व्यायाम केल्यानं एन्डॉर्फिन्स नावाचं हार्मोन स्त्रवतं. हे हार्मोन फील गूड हार्मोन म्ह्णून ओळखलं जातं. २० मिनिटांच्या हाय इंटेन्सिटी व्यायामानं हे हार्मोन जलद स्त्रवतं. आनंदी राहाण्यासाठी, कामात ऊर्जा टिकून राहाण्यासाठी या व्यायाम प्रकाराचा खूप फायदा होतो. वेळ मिळत नाही म्हणून दिनचर्यतून व्यायाम वजा करुन टाकला जातो. पण या व्यायाम प्रकाराचे फायदे आणि स्वरुप बघता आपल्या व्यस्त दिनचर्येत या व्यायामासाठी वेळ काढणं सहज जमू शकेल.

हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग हे नाव ऐकून हा जास्त थकवणारा वगैरे वाटण्याची शक्यता आहे. पण या व्यायाम प्रकारात वेग, क्षमता, सर्जनशीलता आणि आनंद या सगळ्यांचा विचार केलेला आहे. अभ्यास सांगतो की फक्त दहा मिनिटांचा व्यायाम मेंदूची कार्यक्षमता, ऊर्जा आणि उत्पादन क्षमता वाढवण्यास पुरेसा असतो . कमी वेळात जास्त जोरकसपणे होणारा हा व्यायाम प्रकार व्यायामाचा कंटाळा  घालवण्यासाठी, व्यायामाची सवय लावण्यासाठी आणि व्यायामाचे फायदे शरीराला मिळवून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे.