Join us  

आळस सोडून व्यायाम करायला भाग पाडतील अशा ५ अत्यंत महत्वाच्या गोष्टी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:29 PM

व्यायाम न करण्याच्या कारणांची आपल्याकडे हातभर यादी असू शकते. पण व्यायाम का करायला हवा याची पाच मुख्य कारणं आहेत, विसरुच नयेत अशी..

ठळक मुद्देव्यायामाचे परिणाम जसे तात्कालिक असतात तसे दीर्घकालीनही असतात. भविष्यात काही गंभीर आजार होऊ नये म्हणून व्यायाम करावा. गरोदर होण्यात अनेकदा अडथळ्यांचा सामना स्त्रियांना करावा लागतो. हे अडथळे टाळण्यास नियमित व्यायाम मदत करतोनियमित व्यायामामळे मन प्रसन्न राहातं, कामाचा ताण मनावर येत नाही. नियमित व्यायाम हा आनंददायी जीवनप्राप्त करुन देतो.

व्यायाम न करण्याचे स्त्रियांकडे अनेक कारणं असतात. वेळ मिळत नाही. घरात कामाचा खूप लोड असतो, घरातली कामं करुन थकायला होतं. व्यायामात वेळ घालवून कसं चालेल ते व्यायामाचा कंटाळा येतो इथपर्यंतची सतराशे साठ कारणं असतात. पण काहीही असलं , कितीही व्याप असले तरी महिलांनी व्यायाम करण्याचे महत्त्वाचे पाच कारणं आहेत. किमान या पाच कारणांसाठी तरी स्त्रियांनी व्यायाम करायलाच हवा.

का करावा व्यायाम?

१. व्यायामाचे परिणाम जसे तात्कालिक असतात तसे दीर्घकालीनही असतात. भविष्यात काही गंभीर आजार होऊ नये म्हणून व्यायाम करावा. डिमेन्शिया अर्थात विस्मृतीच्या आजाराचा स्त्रियांना भविष्यात धोका असतो. हा धोका नियमित व्यायामाने टाळता येतो. जागतिक आरोग्य संघटनेने तर विस्मृतीच्या आजारावर व्यायम हे उत्तम औषध असल्याचं म्हटलं आहे.

२. गरोदर होण्यात अनेकदा अडथळ्यांचा सामना स्त्रियांना करावा लागतो. हे अडथळे टाळण्यास नियमित व्यायाम मदत करतो. गरोदर होण्यासाठी जसा व्यायाम मदत करतो तसाच गरोदरपणातला व्यायाम आईचं आणि पोटातल्या बाळाचं आरोग्य नीट राखतो . शिवाय प्रसूतीनंतर हाच व्यायाम वाढलेलं वजन कमी करण्यास मदत करतो.

३. महिलांमधे स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण जगभरात सर्वत्र वाढत आहे. व्यायामामुळे शरीर क्रियाशील राहातं. शरीर कमी क्रियाशील असणं हे कारण स्तनांच्या कर्करोगाला आमंत्रण देतं हे संशोधन आणि अभ्यासानं सिध्द झालं आहे. म्ह्णून आपल्याबाबतीतला हा धोका कमी करण्यासाठी रोज व्यायाम आवश्यक आहे.

४. घर, मल, घरातले वृध्द, ऑफिस /व्यवसाय असल्यास त्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता महिलांची दमछाक होते. यामळे मानसिक ताण वाढतो. त्याचा परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर, नातेसंबंधावर पडतो. हा ताण कमी करण्याचं काम रोजचा व्यायाम करतो, नियमित व्यायामामुळे मन प्रसन्न राहातं, कामाचा ताण मनावर येत नाही. नियमित व्यायाम हा आनंददायी जीवनप्राप्त करुन देतो.

५. हदयरोग आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार आता स्त्रियांनाही मोठ्या प्रमाणावर होतात. पण आरोग्यदायी जीवनशैली असेल तर अशा आजारांचा धोका कमी करता येतो. व्यायामाद्वारे आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करता येते.

व्यायाम न करण्याची अगणित कारणं बाजूला ठेवण्यासाठी ही पाच कारणं स्वत:ला व्यायामाची सवय लावण्यास पुरेशी आहेत.