गौरी पटवर्धन
व्यायाम करायचा तरी पहिला प्रश्न येतोच की, कपडे काय? घालायचे? आपण सेलिब्रिटींचे जीमचे कपडे, ॲक्सेसरीज पाहिलेल्या असतात. आपले मॅराथॉन पळणारे मित्रमैत्रिणीही एकसेएक कपडे, स्टायलिंग करतात. आणि आपण काय? घरातलाच सलवार कुर्ता, पॅण्ट टी शर्ट घालून जाणार काय? व्यायामाला? ऑनलाइन तर कसले एकसेएक कपडे मिळतात जिम क्लोदिंग नावाने. मग आपल्यालाही प्रश्न पडतो की कपड्यांचं काय? आणि मुख्य म्हणजे बुटांचं काय? नवीन व्यायाम सुरु करतांना आधी भरपूर खर्च करून नवीन व्यायामाचे कपडे आणि बूट घेणाऱ्यांचे असंख्य जोक्स आपण न्यू इअरच्या वेळी वाचलेले असतात. त्यात काही फार खोटं नसतं. अनेक लोकांची व्यायामाची सुरुवात ही नवीन कपडे आणि बूट घेण्यापासून होते. इतकं, की ही खरेदी केल्याशिवाय व्यायाम करणं हे आपल्याला अशक्य वाटू लागतं. पण ते खरंच आवश्यक असतं का? ट्रॅकसूट घातल्याशिवाय व्यायाम करताच येत नाही का? नवे शूज घेतल्याशिवाय चालायला जाताच येत नाही का? व्यायाम करण्यासाठी नेमके कसे कपडे लागतात?
आपण घेणारच असू व्यायामासाठी कपडे तर काय लक्षात घ्यायला हवं?
१. व्यायाम करण्यासाठी सुती, सैलसर, सहज हालचाली करता येतील असे कपडे लागतात. घट्ट फिटिंगचे ड्रेस, चुडीदार, कुर्ते असे कपडे घातले तर आपल्याला विशिष्ठ हालचाली करतांना अडचण होते आणि व्यायाम नीट होत नाही. म्हणून शक्यतो सैल टीशर्ट आणि ट्रॅक पँट हा पोशाख व्यायामासाठी चांगला समजला जातो. ते कपडे सैल असतात आणि होजिअरीचे असल्यामुळे ताणलेही जाऊ शकतात. पण आपल्याकडे अनेक वेळा प्रश्न हे नुसते सोयीचे नसतात. त्यात कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक गुंतागुंतही असते.
२. आपल्याकडे अजूनही अनेक ठिकाणी घरातल्या मुलींनी पँट शर्ट घातलेले चालत नाही. त्यातही एक वेळ घरातल्या मुलीने फार हट्ट केला, डॉक्टरने सांगितलं तर तिच्या तब्येतीसाठी का असेना, पण तिला परवानगी मिळते, पण घरातली सून? घरातल्या सुनेने पँट शर्ट घालून धावायला जायचं म्हंटलं म्हणजे विषयच संपला. आधीच त्या सुनेला घरातल्या कामातून व्यायामासाठी वेळ काढण्यासाठी लढा द्यायला लागतो, ही थेरं करायचीच कशाला? हे ऐकायला लागतं. त्यात ट्रॅक पँट आणि टीशर्ट या मुद्द्यावर तर व्यायाम हा विषयच बंद होऊ शकतो. मग काय करायचं? तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे आत्ता व्यायाम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी कधी आणि किती भांडायचं याचं गणित मांडता आलं पाहिजे.
३. त्यामुळे व्यायामाला सुरुवात करतांना आपल्याकडे जे चालतं त्यातले त्यातल्या त्यात सोयीचे कपडे घालून सुरुवात करायची. सुती, जुने, सैलसर पंजाबी टॉप आणि भरपूर घेर असलेल्या सलवारी किंवा लेगिंग्ज घालून व्यायामाला सुरुवात करता येऊ शकते. इन फॅक्ट एरवी ज्या महिला असेच कपडे घालतात त्यांना तेच कपडे जास्त सोयीचे वाटू शकतात. अगदी सुती साडी नेसून चालायला येणाऱ्या महिलाही आपण सगळ्यांनी कधी ना कधी बघितलेल्या असतात. त्यामुळे साडी नेसून व्यायाम करता येत नाही का? तर असं काही नाही. जे कम्फर्टेबल ते उत्तम.
४. आपल्याला काय व्यायाम करायचा आहे यावर ते अवलंबून असतं. साडी नेसून चालायला जाता येऊ शकतं,पळणं शक्य नाही. त्यामुळे कपडे आपल्या सोयीने घालावेत.
५. शूज मात्र नेहेमीच्या वापरातले, उंच टाचा नसलेले, न चावणारे असेच वापरले पाहिजेत! वाकिंग शूज हल्ली चांगले मिळतात. पळायचं असेल तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञाचा सल्ला घेऊन शूज घेणं उत्तम.