स्थूल दिसण्यात सर्वात मोठा वाटा असतो तो पोटाचा. व्यायाम किंवा डाएटिंग करुन शरीरावरची चरबी कमी करण्याचा प्रयत्न सुरु असताना शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत पोटाची चरबी कमी होत नसल्याचं लक्षात येतं. वाढलेलं पोट कमी करणं अवघड आहे, पण अशक्य नाही. पवनमुक्तासन या योगसाधनेतील एका आसनामुळे पोट सहज कमी करणं शक्य आहे. पवनमुक्तासनामुळे पोटाचा जडपणा कमी होतो. रक्तप्रवाह सुधारतो. चेतापेशी उद्दिपित होतात. पवनमुक्तासनामुळे पोटातील वायू बाहेर पडायला मदत होते. तसेच पवनमुक्तासनाला डिटाॅक्स व्यायाम प्रकार असंही संबोधलं जातं. पवनमुक्तासनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
Image: Google
पवनमुक्तासनातील पवन म्हणजे वायू तर मुक्त म्हणजे मोकळ होणे. पवनमुक्तासन केल्याने पोटात साठलेला वायू बाहेर टाकला जातो. पवनमुक्तासन हा व्यायाम म्हणजे आरामदायी मुद्रा असून ती एकूणच आरोग्याचा विचार करता उपयुक्त आहे. पवनमुक्तासन केल्याने केवळ पोटच कमी होतं असं नाही तर पवनमुक्तासनाचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. पवनमुक्तासनाचे फायदे मिळवण्यासाठी ते करण्याची अचूक पध्दत माहिती असायला हवी.
Image: Google
कसं करायचं पवनमुक्तासन?
पवनमुक्तासन करण्यासाठी खाली जमिनीवर पाठ टेकवून सरळ झोपावं. आधी एक एक पायानं पवनमुक्तासन करावं. यासाठी डावा पाय गुडघ्यात वाकवून दोन्ही हातांनी गुडघ्यास मिठी मारावी. पोट दाबून गुडघा छातीजवळ न्यावा. मान उचलून हनुवटी गुडघ्यास टेकवावी. 15-20 सेकंद श्वास रोखत या अवस्थेत राहिल्यानंतर डोकं जमिनीला टेकवावं. गुडघ्याकी मिठी सोडून पाय सरळ करावा. हेच आसन उजवा पायानं करावं.
नंतर दोन्ही पायांनी हे आसन करावं. यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावे. दोन्ही हात एकमेकात गुंफत गुंडघ्यांभोवती मिठी मारावी. गुडघे पोटावर दाबून छातीपर्यंत आणावेत. मान उचलून हनुवटी गुडघ्यास टेकवण्याचा प्रयत्न करावा. हनुवटी गुडघ्यास टेकवताना श्वास रोखलेला असावा. या अवस्थेत 15-20 सेकंद राहावं. डोकं जमिनीला टेकवून गुडघ्याभोवतीची मिठी सोडून पाय सरळ करावेत. हे आसन 2-3 वेळा रोज केल्यास त्याचा पोट कमी करण्यास फायदा होतो.
Image: Google
पवनमुक्तासन केल्यानं काय होतं?
1. पवनमुक्तासनामुळे पोटावरची चरबी कमी होते.
2. गर्भाशयाशी संबंधित समस्या पवनमुक्तासनामुळे दूर होतात.
3. कंबरदुखीचा त्रास असल्यास, स्लिप डिस्कसंबंधी समस्या असलेल्यांनी पवनमुक्तासन केल्यास फायदा मिळतो.
4. ॲसिडिटी, संधिवात हे त्रास असल्यास पवनमुक्तासन केल्यानं या समस्यांपासून आराम मिळतो. संधिवाताच्या वेदना कमी होतात.
5. आतड्यांचे विकार दूर ठेवण्यासाठी पवनमुक्तासनाचा फायदा होतो.
6. पवनमुक्तासन नियमित केल्यास यकृताचं काम व्यवस्थित होतं.