Join us  

वजन कमी करायचं तर फास्ट नको स्लो चाला; रिसर्चचा दावा स्लो वाॅकिंगचे फायदे जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2022 7:32 PM

जोरात चालून लवकर वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांना अभ्यासक देताय हळू चालण्याचा सल्ला..  तो का?

ठळक मुद्देतुम्ही किती वेगानं चालता हे महत्त्वाचं नसून किती दूरपर्यंत चालतात हे वजन कमी करण्यासाठी परिणामकारक ठरतं. कमी तीव्रतेचे व्यायाम जास्त वेळ नियमित करणं, हळू पण जास्त दूरपर्यंत रोज चालणं यामुळे वजन कमी होतं असं अभ्यासक म्हणतात.

वजन कमी करायचं तर मेहनत जास्त हवी. म्हणजेच जोरात चालणं, वेगानं पळणं,  जास्त वजन उचलणं.. वजन कमी करण्यासाठी कोणी हळू चालत असेल तर आपण त्यांना जोरात चालण्याचा सल्ला देतो. हळू चालण्यामुळे वजन कमी होत नाही, वजन कमी करायचं तर जोरात चालण्याला , वेगानं पळण्याला पर्याय नाही हा बहुतांश लोकांचा समज. पण हा समज योग्य नाही असं नुकत्याच झालेल्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात.  हळू चालण्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो का? वेगानं चालण्यानं वजन कमी होतं का? याचा शोध या अभ्यासातंर्गत घेतला गेला. या अभ्यासाचे निष्कर्ष हळू चालण्याने वजन कमी होण्यासाठी नक्की कसा फायदा होतो हे उलगडून सांगतात. 

Image: Google

'न्यूट्रीएण्टस' या जर्नलमधे प्रसिध्द झालेलं संशोधन सांगतं की हळू चालण्यामुळे शरीराची चरबी वेगानं आणि सुरक्षितरित्या कमी होते. हळू चालण्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी 30 आठवडे एवढ्या दीर्घ काळासाठी 16 सहभागी स्त्री पुरुषांना आठवड्यातून चार दिवस 4.8 किलोमीटर  अंतर चालण्यास सांगितलं. या 16 लोकांना अभ्यासकांनी दोन समान गटात विभागलं. या दोन समुहात केवळ चालण्याचा वेग एवढंच आंतर होतं. एका गटाला दर तासाला साडे सहा किमी वेगाने तर एका गटाना दर तासाला साडे पाच किमी वेगाने चालण्यास सांगितले. 

16 सहभागी स्त्री पुरुषांवर हा अभ्यास सुरु असताना संशोधकांनी आणखी 25 सहभागी लोकांचा एक गट तयार केला. या गटाला केवळ 15 आठवड्यांसाठी  दर तासाला साडे सहा किमी वेगानं चालण्यास सांगितलं. या अभ्यासाचे निष्कर्ष हळू आणि जोरात चालण्याबाबत आपल्या मनात जे समज आहेत त्यांना धक्का देणारे, पडताळून पाहाण्यास लावण्यास प्रेरित करणारे आहेत. अभ्यास सांगतो, ज्या गटाला केवळ 15 आठवड्यांसाठी वेगानं चालण्यास सांगितलं गेलं त्यांच्या एकूण वजनात ( टोटल बाॅडी फॅटस)वर काहीच परिणाम झालेला दिसून आला नाही. तर 30 आठवड्यांसाठी ज्या गटाला जोरात चालण्यास सांगितले होते त्यांच्याही वजनात फारसा फरक दिसून आला नाही.  15 आठवड्यांच्या तुलनेत 30 आठवड्याच्या गटात  अगदी थोडं वजन कमी झालेलं आढळून आलं. 

 Image: Google

ज्या गटाला 30 आठवडे कमी वेगानं चालण्यास सांगितलं होतं  त्या गटामध्हे मात्र वजनाच्या बाबतीत अभ्यासकांना मोठा फरक दिसून आला. हळू चालणाऱ्या गटातील लोकांचं वजन जोरात चालणाऱ्या गटातील लोकांच्या तुलनेत 20 टक्के जास्त कमी झालेलं आढळून आलं. अभ्यासकांच्या या निष्कर्षांवर आश्चर्य व्यक्त केलं जात असलं तरी यामागे अभ्यासक शास्त्रीय कारण असल्याचं सांगतात. 

Image: Google

अभ्यासक म्हणतात,  तुम्ही किती वेगानं चालता हे महत्त्वाचं नसून किती दूरपर्यंत चालतात हे वजन कमी करण्यासाठी परिणामकारक ठरतं. जे चालण्याबाबत तेच तीव्र गतीचे व्यायाम प्रकार करण्याबाबतही. वजन कमी करण्यासाठी तीव्र गतीचे व्यायाम प्रकारापेक्षा हास्त वेळ व्यायाम केल्याचा फायदा वजनावर झालेला दिसून आला. कमी वेळात जास्त तीव्रतेचा व्यायाम करण्यापेक्षा जास्त वेळात जास्त व्यायाम केल्याने वजन कमी होतं. अभ्यासक सांगतात, हळू चालण्यामुळे वजन घटण्यात सातत्य राहातं.. हळू चालताना शरीर आणि मनावर अनावश्यक ताण नसतो. त्यामुळे चालून झाल्यावर इतर व्यायाम प्रकार करण्याची ताकद राहाते. त्याचा परिणाम म्हणजे आणखी दूरवर, जास्त वेळ चालण्याची, आणखी व्यायाम करण्याचा त्यांची क्षमता वाढते.  

Image: Google

जोरात चालणं किंवा कमी वेळात जास्त तीव्रतेचे व्यायाम केल्यानं शरीरातील कर्बोदकं हे ऊर्जेसाठी वापरले जाते. शरीराला धावून शर्यत जिंकण्याची सवय नाही तर हदयाला मॅरेथाॅन धावण्याची सवय लावावी. यातून कर्बोदकातली ऊर्जा वापरली जात नाही तर ऊर्जेसाठी शरीरातील फॅटसचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील चरबीतून येणारे उष्मांक वापरले जातात . यातून चयापचयाची क्रिया वाढते. त्याचा परिणाम शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कमी तीव्रतेचे व्यायाम जास्त  वेळ नियमित करणं, हळू पण जास्त दूरपर्यंत  रोज चालणं यामुळे वजन कमी होतं असं अभ्यासक म्हणतात.  रोज जोरात धावूनही आपलं वजन हलत का नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. यावरच उत्तर अभ्यासकांनी आपल्या अभ्यासातून दिलं आहे. अभ्यासक म्हणतात रोज हळू चाला आणि जास्त वेगानं वजन घटवा! 

टॅग्स :फिटनेस टिप्ससंशोधनवेट लॉस टिप्स