फिट राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम केलाच पाहिजे, यात काहीच दुमत नाही.. पण खूप जास्त हेवी वर्कआऊट करणे आणि त्या तुलनेत तुमचा आहार मात्र अगदीच कमी असेल, तर तुमच्या वर्कआऊटला काहीही अर्थ नाही... कारण यामुळे तुमच्या शरीरातील उर्जा तर खर्च होईल, पण त्याची भरपाई मात्र आहारातून होणार नाही. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर तुम्हाला दिवसभर उत्साह वाटण्याऐवजी खूप थकवा जाणवू लागेल.. व्यायामानंतर (what should be the diet according to your workout?) तुम्हालाही असाचा विकनेस जाणवत असेल तर तुमच्या आहारात काही गोष्टींची कमतरता आहे, हे ओळखा आणि लवकरच आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
वर्कआऊट आणि डाएट यांचं गणित जुळवताना हे लक्षात घ्या..
१. तुम्ही जर दररोज अर्धा तास नियमितपणे हेवी वर्कआऊट करत असाल, तर तुमच्या आहारात ओट्स, पनीर, फळं, भाज्यांचे सूप, सॅलड, कडधान्ये, प्रोटीन्स, सुकामेवा, केळी या सगळ्या गोष्टींचा नियमितपणे आलटून- पालटून समावेश असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहारातून नियमितपणे मिळत गेल्या तरच व्यायामामुळे आलेला थकवा निघून जाऊ शकतो आणि दिवसभर उत्साह वाटू लागतो.
२. व्यायाम करण्यापुर्वी या गोष्टी खा...
ज्या पदार्थात कार्बोहायड्रेट्स असतात, असे पदार्थ तुम्ही व्यायाम करण्यापुर्वी खाऊ शकता. व्यायाम करण्याच्या आधी कॉफी पिणे देखील चांगले असते. मोड आलेली कडधान्ये, भाज्यांचे सूप, फळांचा रस या गोष्टी व्यायाम करण्यापुर्वी घेणे चांगले. यामुळे कॅलरी बर्न होण्यासाठी मदत होते, असे सांगतात.
३. हेवी एक्सरसाईज केल्यानंतर ३० ते ४५ मिनिटे काही खाऊ नये. त्यानंतर एकदम पोटभर जेवणेही योग्य नाही. त्यामुळे एक्सरसाईज केल्यानंतर एकतर ओट्स, सॅलड, प्रोटीन शेक, सुकामेवा, पनीरचा एखादा पदार्थ, दूध, मिल्क शेक असं काही खाण्यास प्राधान्य द्यावं.. केळी देखील एक्सरसाईज केल्यानंतर खाणे अधिक चांगले. यासोबतच प्रोटीन्स- कार्बोहायड्रेट्स मिक्स असणारा डाएट तुम्ही एक्सरसाईजनंतर घेऊ शकता.