मनाली मगर-कदम
स्त्री आणि पुरुष या दोघांनाही वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रकाराच्या व्यायामाची कमी अधिक प्रमाणात गरज असतेच. हा व्यायाम आपण घरात, जीममध्ये किंवा निसर्गातही अगदी मनसोक्तपणे करु शकतो. स्त्रियांना अनेकदा घरातील कामे, मुले, पाहुणे, आजारपणं, सणवार यामुळे जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे व्यायाम करणे चुकते. मात्र व्यायामासाठी दररोज फक्त २० ते २५ मिनिटं पुरेशी आहेत. स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी आपण विविध गोष्टींचा वापर करु शकतो. इतकेच नाही तर सूर्यनमस्कारही स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी उपयुक्त ठरतात (Importance of Suryanamaskar and Perfect Method).
स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी खालील गोष्टी वापरल्या जातात...
1)स्वतःचे शरीर
2)डंबेल्स
3)बार बेल्स
4)मशीन
5)विविध प्रकारचे प्रॉप्स
6)स्त्रियांसाठी घराबाहेरील पायऱ्यांचा वापर
7)घरातील खुर्च्या, टेबल
8) किचन ओटा, उशी लोड अशा अनेक गोष्टी
सूर्यनमस्कार - सर्वांगिण व्यायामप्रकार
सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. यामध्ये, आसनांची साखळी केली जाते. ज्यामध्ये तुम्ही मागे वाकता तसेच पुढेही वाकता. यामध्ये हाता-पायांवर भार देता येतो. भुजंगासनामध्ये पाठीचा वापर होतो, सूर्यनमस्कारामध्ये योग्यरित्या श्वास घेणे आणि सोडणे योग्य पद्धतीने सांगितले गेले आहे. त्याचबरोबर सूर्यमंत्रामुळे शरीरातील सर्व भागांमध्ये, अवयांमध्ये हृदय स्पंदने निर्माण होतात व त्यांचे कार्य सुरळीतरित्या चालते. मेंदूवर सकारात्मक परिणाम होऊन मेंदूला व शरीरातील इतर भागांना रक्तपुरवठा केला जातो, ज्यामुळे पेशींचे कार्य सुधारण्यास मदत होते.
सूर्यनमस्काराची एकच अशी पद्धत नाही, यामध्ये आपण शास्त्रीयदृष्ट्या वेगवेगळी साखळी बनवू शकता, ज्याला आपण विज्ञासा योग असेही म्हणतो. मागे वाकताना श्वास घेणे आणि पुढे वाकताना सोडणे. एकदा स्थिती घेतली की पायाची आणि हाताची स्थिती बदलू नये व स्थिर राहावे. अवघडलेल्या स्थितीत राहू नये. शरीरावर, मनावर, श्वासावर लक्ष केंद्रित करावे ते स्थिर आणि सुखकारक असावे. नियमितपणे किमान १२ सूर्यनमस्कार घातल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
(लेखिका योग शिक्षिका आहेत)
manali227@gmail.com