Join us  

International Day of Yoga 2022 : शरीरच नाही तर मनही तंदुरुस्त, रोज योगाभ्यास केल्याचे ६ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 6:04 PM

International Day of Yoga 2022 : मानवतेसाठी योग अशी थीम असलेला यंदाचा जागतिक योग दिन, योगाचे सार आपल्याला उमजायला मात्र हवे.

ठळक मुद्देयोग दिवस फक्त एक दिवस न करता रोज च्या जीवनाचा भाग बनवून आपले आयुष्य आनंदी बनवा.आरोग्यासाठी योगाचे अनेक फायदे असून तो एक दिवस न करता नियमित करायला हवा

डॉ. पौर्णिमा काळे

आंतरराष्ट्रीय योग दिन (International Day of Yoga). त्याची यंदाची थीम आहे "मानवतेसाठी योग". (Yoga for Humanity) योग ही एक अशी शक्ती आहे ज्यामुळे आनंद, आरोग्य आणि शांती यांचा अनुभव घेता येतो. जीवनशैलीचे संपूर्ण सार योगाच्या विज्ञानात आत्मसात केले गेले आहे. अष्टांग योग म्हणजेच-यम,नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचं पालन केलं तर अनेक फायदे मिळतात.

(Image : Google)

नियमित अष्टांग योग करण्याचे फायदे

१. ताणतणावापासून मुक्ती

रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताणतणावांचा निचरा करायचा असेल तर योगाचा नियमित सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताणतणाव शरीराबाहेर टाकली जातात.

२. अंर्तज्ञानात वाढ

तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगा आणि ध्यानधारणा यामध्ये आहे. यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता.

३. वजनात घट

सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची जाणीव आपल्याला होते. योग्य आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात रहायला मदत होते.

(Image : Google)

४. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ

शरीर, मन आणि आत्मा या तिघांचे मिळून एकसंघ अशी आपली यंत्रणा असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात तसेच मानसिक अस्वस्थपणाचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगामुळे स्नायू बळकट होतात. श्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रामुळे आणि ध्यान धारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

५. नाते संबंधात सुधारणा

तुमचा जोडीदार, आई वडील, मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असेलेले नातेसंबंध योगामुळे सुधारतात. तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी मन नात्यांसारख्या संवेदनशील संबंधात फार उपयोगी पडते. योगा आणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.

६.ऊर्जा वाढते

दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे शेवटी तुम्हाला गळून गेल्यासारखे होते. सतत दिवसभर काम करत राहिल्याने आपण पार थकून जातो. परंतु रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केल्यास त्याचा शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास चांगला उपयोग होतो.

नियमित करायलाच हवेत अशी आसने

ताडासन, ञिकोणासन , भुजंगआसन, पर्वतासन, वज्रासन, बद्धकोनासन इत्यादी आसने, त्यासोबतच दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम प्राणायाम, भस्रिका प्राणायाम,कपालभाती सारखी शुद्धीक्रीया ,सोबत शक्तीमुद्रा, प्राणमुद्रा मध्ये ध्यान केल्यास ताजेतवाने आणि उत्साही राहता येते. दिवसभराच्या कामाच्या धबडग्यातून तुम्ही मध्येच १० मिनिटांचा वेळ काढून मार्गदर्शित ध्यान जरी केले तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. उत्साह संचारेल आणि हातात घेतलेले काम तुम्ही तत्परतेने पुरे कराल. त्यामुळे योग दिवस फक्त एक दिवस न करता रोज च्या जीवनाचा भाग बनवून आपले आयुष्य आनंदी बनवा.

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेआंतरराष्ट्रीय योग दिन