Lokmat Sakhi >Fitness > भोग सरुन आनंदी ‘योग’ आपल्या आयुष्यात कसा येणार? काय केलं म्हणजे सुखाचं होईल जगणं?

भोग सरुन आनंदी ‘योग’ आपल्या आयुष्यात कसा येणार? काय केलं म्हणजे सुखाचं होईल जगणं?

International Day of Yoga 2022 : योग ही एक जीवनशैली आहे, शरीराच्या स्वास्थ्याबरोबरच मनस्वास्थ्याचाही विचार त्यात करण्यात आला आहे. गरज आहे ती, आपण स्वत:साठी वेळ काढण्याची! स्वीकारा उत्तम जीवनशैली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 01:57 PM2022-06-21T13:57:11+5:302022-06-21T14:31:34+5:30

International Day of Yoga 2022 : योग ही एक जीवनशैली आहे, शरीराच्या स्वास्थ्याबरोबरच मनस्वास्थ्याचाही विचार त्यात करण्यात आला आहे. गरज आहे ती, आपण स्वत:साठी वेळ काढण्याची! स्वीकारा उत्तम जीवनशैली!

International Day of Yoga 2022 : Yoga for happy life and mental peace, specially for women, make it a lifestyle. | भोग सरुन आनंदी ‘योग’ आपल्या आयुष्यात कसा येणार? काय केलं म्हणजे सुखाचं होईल जगणं?

भोग सरुन आनंदी ‘योग’ आपल्या आयुष्यात कसा येणार? काय केलं म्हणजे सुखाचं होईल जगणं?

Highlightsपली काळजी घ्यावी, स्वत:च स्वत:साठी वेळ मात्र त्यासाठी काढायलाच हवा.

- वृषाली जोशी - ढोके

इच्छा तर खूप आहे पण काय करणार वेळच मिळत नाही, घरात काय कमी कामं असतात का? हे वाक्य अनेकजणी येता-जाता स्वत:ला आणि इतरांना ऐकवतात आणि त्याचा परिणाम असा होतो की, बाकी घरातली, नोकरी करत असतील तर व्यावसायिक कामं सगळी होतात. मात्र, स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं, आपण मनानं आणि शरीरानं फिट असायला हवं, याचाच विसर पडतो. व्यायाम, आहार, एकूण व्यक्तिगत स्वास्थ्य याकडे स्त्रिया दुर्लक्षच करतात आणि मग तब्येतीच्या असंख्य कुरकुरी जगणं पोखरायला लागतात. वजन कमी करणं-घटवणं, सुंदर दिसणं-मेकअप-स्टायलिंग याचा वरवर विचार होतो पण जगण्याची प्रत उत्तम रहावी आणि मानसिक स्वास्थ्यही सांभाळावं म्हणून सातत्यानं आणि समजून उमजून प्रयत्न होत नाहीत. (International Day of Yoga 2022)
खरंतर आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला फिट राहायचं असेल आणि चिरतरुण दिसायचं असेल तर प्रत्येकानंच रोजचा योगाभ्यास करायलाच हवा. त्यातही महिलांनी तर अवश्य करायला हवा. एक स्त्री जगताना अनेक भूमिका बजावत असते. तिच्या शरीरात बदल होतात, बदलत्या टप्प्याप्रमाणे शरीराची ताकद पणाला लागते. मातृत्व ही निसर्गाची सगळ्यात मोठी देण. मुलगी वयात येते तेव्हापासून मासिक पाळीचं चक्र सुरू होते. हार्मोनल बदल मासिक पाळी येणे-जाणे आणि मातृत्त्व यासह वयाच्या प्रत्येक टप्प्यात होत असतात. शरीरातले प्रसूतीपूर्व बदल आणि नंतरचे बदल, स्तनपान आणि मुलांचं संगोपन अशा अनेक बदलांना तिला सामोरं जावं लागतं. या सगळ्या प्रवासात फक्त शारिरीक नाही तर मानसिकही चढउतार होत असतात. फक्त शरीर कणखर असून चालणार नाही तर मनही खंबीर असायला हवं आणि त्यासाठी आपण योग्य जीवनशैली स्वीकारली पाहिजे.

(Image : Google)

योग ही एक जीवनशैली आहे. ज्यामध्ये शरीराबरोबरच मनाचाही विचार केला गेला आहे. आसन, प्राणायाम यांच्या रोजच्या अभ्यासामुळे शरीर अतिशय लवचिक बनते. हाडांना/स्नायूंना बळकटी मिळते. घरच्याघरी रोज किमान एक तास तरी योगाभ्यास केला तर त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात. त्या एक तासात ४५ मिनिटं आसनांचा अभ्यास आणि १५ मिनिटं प्राणायाम असं वेळेचं नियोजन आपण करू शकतो. आसनांचा अभ्यास करण्यापूर्वी रोज काही पूरक हालचाली आणि सूर्यनमस्कार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे ताठर झालेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. पाठदुखी, डोकेदुखी, गर्भाशयाचे विकार, सतत आजारी पडणं, सतत डोक्यात विचार, टेंशन हे महिलांना हमखास छळणारे विकार, त्यासाठी काही निवडक आसनं करायला हवीतच, मात्र रोज सातत्याने योग अभ्यास करायला हवा. मात्र, आपल्या मनात येईल तेव्हा, ऑनलाईन पाहून, मनानंच कधीही, वेळ मिळेल तसा हा अभ्यास करू नये.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योगासनं, प्राणायाम शिकून घ्यावा आणि मगच आपला नियमित योगाभ्यास घरी करावा. आपली काळजी घ्यावी, स्वत:च स्वत:साठी वेळ मात्र त्यासाठी काढायलाच हवा.

(Image : Google)

खास महिलांसाठी ६ योगासनं
महिलांनी रोज योगाभ्यास करायला हवा. त्यातही पुढील काही आसनं नियमित करायला हवी.

(Image : Google)

१. पवनमुक्तासन - करायला अतिशय सोपे, परंतु तितकेच अधिक फायदे असणारे हे आसन. गॅसेस, अपचन, करपट ढेकर, पचनाच्या अनेक तक्रारी हे आसन केल्यानं कमी होऊ शकतात.


(Image : Google)

२. सर्वांगासन - या आसनामध्ये पाय जमिनीपासून वर उचलेले असतात म्हणजेच खाली डोकं वर पाय. रक्ताभिसरण हे आसन केल्यानं सुधारते. ऑक्सिजन पातळीत वाढ होण्यास मदत होते.

(Image : Google)

३. भुजंगासन - पोटावर झोपून मान मागे टाकण्याच्या या आसनामध्ये पाठीच्या शेवटच्या मणक्यावर दाब निर्माण होतो. त्यामुळे मणक्याचे विकार, पाठ दुखी, ताठरलेले पाठीचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते.

(Image : Google)

४. धनुरासन - हे आसन नियमित केल्याने मासिक पाळीचे विकार दूर होण्यास मदत होते. मल, अपचन आणि पचनाशी संबंधित विकार दूर होतात. पाय आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात. पचनसंस्था मजबूत होते.


(Image : Google)

५. शशांकासन - हे आसन नियमित केल्याने शरीर मजबूत आणि लवचीक बनते. पचनसंस्था सक्रिय होऊन बद्धकोष्ठता दूर होते. राग, भीती, दु:ख इत्यादी उत्कटता आणि भावनिक असंतुलन कमी करते. हृदयविकार, दमा, मधुमेह अशा अनेक आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तीसाठीही हे आसन उपयुक्त आहे.

(Image : Google)

६. वृक्षासन - शरीरातील आळस, तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त. तसेच लहान वयात या आसनाचा अभ्यास केल्यास उंची वाढण्यास चांगली मदत होते.

रोज करावेत असे श्वसनाचे प्रकार
रोज योगासनं केल्यानंतरच हे श्वसनाचे प्रकार करायला हवे.
1. जलद श्वसन - नासिका मार्गाची शुद्धी आणि स्वच्छता करण्यासाठी तसेच फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.
2. नाडी शुद्धी प्राणायाम - नावाप्रमाणेच शरीरातील असंख्य नाड्या शुद्ध करण्यासाठी, तणाव मुक्तीसाठी, मन:शांती साठी तसेच थकवा आणि आळस दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

(Image : Google)

आसन करण्यापूर्वी लक्षात ठेवा...
गर्भधारणेदरम्यान किंवा कोणताही गंभीर आजार असल्यास, प्रशिक्षित योग शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसारच योगाभ्यास करावा. टीव्ही किंवा इंटरनेट पाहात कधीही योगाभ्यास करू नका. आरोग्याबाबत जागरुक असणं हे महिलांसाठी जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे आपली दैनंदिन जीवनशैली सांभाळणं, तरच आसनांचा लाभ मिळतो.

(लेखिका आयुष मान्यताप्राप्त योगा आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)
vruicwai@gmail.com

Web Title: International Day of Yoga 2022 : Yoga for happy life and mental peace, specially for women, make it a lifestyle.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.