वृषाली जोशी-ढोके (योगप्रशिक्षक-वेलनेस ट्रेनर)
सुखामागे धावताना आज सगळेच जण शांतता आणि आनंद गमावून बसले आहेत. विज्ञानाने प्रगती केली पण त्या गतिमान प्रगतीमुळे आधीच चंचल असलेलं मन अधिकच चंचल झालं. अस्थिरता आणि अशांतता यातून बाहेर पडण्याचा एक उत्तम पर्याय म्हणजे आपल्याच पूर्वजांनी भारताला दिलेला योगशास्त्राचा ठेवा. योगाभ्यास हा ५ वर्षाच्या बालका पासून ८० वर्षांच्या व्यक्तीपर्यंत कोणीही सहज करू शकतो. त्यासाठी भगवे कपडे घालून संसार सोडून हिमालयात, रानावनात जायची गरज नाही. रोजच्या जीवनात स्वतःसाठी अर्धा तास काढला तरी भरपूर योगाभ्यास होऊ शकतो. येत्या योग दिनापासून आपण त्याची सुरुवात नक्की करु शकतो.
रोज साधासोपा योगाभ्यास काय करता येईल?
१. सुक्ष्म व्यायाम:- यामध्ये मानेची हालचाल, खांदे, गुडघे, घोटा अश्या जॉइंट्सची साधी हालचाल करून स्नायूंची ताकद वाढवली जाऊ शकते. रोज किमान ५ मिनिट सूक्ष्म हालचाली केल्या तर हाडांना सुद्धा बळकटी मिळते. २.सूर्यनमस्कार:- सर्वांग सुंदर अशा या प्रकारात आसनांची साखळी आहे, सूर्यनारायणाची उपासना आहे. त्यामुळे तेजाची उपासना केल्यासारखे आहे. सूर्यनमस्कार घालताना श्वसनाची जोड दिली आहे त्यामुळे प्राणायामाचे फायदे पण सहज मिळतात. १० मिनिटात किमान १२ सूर्यनमस्कार सहज घालून होतात त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो असेही नाही.
३. प्राणायाम:- जलद श्वसन, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम याचा रोज ५ मिनिट सराव केला तर मन शांत होते. जुनाट सर्दी, श्वसन मार्गाची शुद्धी, मनाची एकाग्रता यासारखे अनेक फायदे मिळतात.४. ओंकार जप:- अ उ म या तीन अक्षरांनी तयार झालेल्या ओंकाराचा सातत्याने जप केल्यास एकाग्रता वाढीस मदत होते. शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक प्रगती सहजतेने होते. किमान ५ मिनिट ओंकार जप सूर्योदयापूर्वी केल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात. ज्यांना झोपेच्या तक्रारी आहेत त्यांनी झोपण्यापूर्वी ५ ते १० मिनिट एका जागी शांत बसून ओंकार जप केला तर त्या तक्रारी कमी व्हायला निश्चित मदत होते.
५. अशाप्रकारे आपल्या घरात बसून, कोणत्याही अन्य साहित्या शिवाय फक्त ३० मिनिटं रोज योगाभ्यास केला तर मनःशांतीसह निरोगी आयुष्य जगायला निश्चितच उपयोग होईल.१ जानेवारी ला केलेला संकल्प अर्धवट सुटला असेल तर या योग दिनाच्या मुहूर्तावर पुनश्च योगाभ्यासाला जोमाने सुरुवात करुया. आणि आपले आरोग्य उत्तम राखूया.(लेखिका आयुषमान्यताप्राप्त योगप्रशिक्षक आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)