Join us  

International Yoga Day 2023 : कितीही बिझी असाल तरी, रोज न चुकता १० मिनिटं करायलाच हवीत ५ आसनं, आठवड्याभरात जाणवेल फरक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 11:00 AM

International Yoga Day 2023 Must Do 5 Asanas Everyday : मन, शरीर शांत आणि शुद्ध करण्यासाठी योग करणे अतिशय आवश्यक असते

आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने २१ जून रोजी ठिकठिकाणी योगाचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असला तरी नियमितपणे योगसाधना करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मनाला शांत, एकाग्र करण्यासाठी, शरीराची लयबद्ध हालचाल अशा योगाच्य अनेक व्याख्या करता येतात. रोजच्या धावपळीत आपण सगळेच अडकून गेलेले असतो. अशावेळी मन, शरीर शांत आणि शुद्ध करण्यासाठी योग करणे अतिशय आवश्यक असते (International Yoga Day 2023 Must Do 5 Asanas Everyday ). 

यामध्ये सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, ध्यान अशा बऱ्याच गोष्टी येत असून त्यातील आपल्याला शक्य तितक्या गोष्टी आपण नियमित केल्यास त्याचा फायदा आपल्याला निश्चितच दिसून येतो. महिलांना तर विविध विषयांचे असणारे ताण, शारीरिक, मानसिक थकवा यांपासून काहीसा आराम मिळण्यासाठी योगा करण्याचा अतिशय चांगला फायदा होतो. त्यामुळे रोज तुम्ही कितीही धावपळीत असलात तरी दिवसातली १० मिनीटं का होईना ५ आसनं आवर्जून करायला हवीत. ही आसनं कोणती, ती कशी करायची आणि त्याने आपल्याला काय फायदा होतो याविषयी समजून घेऊयात...

 

१. ताडासन

दिवसभर बैठं काम करुन आपलं पूर्ण शरीर आखडून जातं, अशावेळी संपूर्ण शरीराला स्ट्रेच करणारं ताडासन आवर्जून करायला हवं. हे आसन असं आहे जे आपण अगदी सहज जाता-येतो करु शकतो. ताडासनात चालल्यानेही फायदे होतात. आसन केल्यानंतर ५ सेकंद श्वास रोखून धरावा आणि मग पाय खाली करताना श्वास सोडायचा. 

२.  कोनासन

दोन्ही पायात अंतर घेऊन दोन्ही हात एका रेषेत सरळ वर करायचे. त्यानंतर उजवा हात डाव्या पायाच्या तळव्याला लावायचा आणि डावा हात उजव्या पायाच्या तळव्याला लावायचा प्रयत्न करायचा. असे केल्याने कंबर, पोटाचा भाग, मांड्या, हात अशा सगळ्याच अवयवांचा अतिशय चांगला व्यायाम होतो. दोन्ही बाजूला किमान ५ वेळा केल्यास चांगला व्यायाम होतो आणि आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. 

३. मार्जारासन 

अगदी झोपेतून उठल्यावर किंवा दिसवाच्या कोणत्याही वेळेला करु शकतो असे हे आसन आहे. दिवसभर बसून पाठ, मान, खांदे अवघडून जातात. अशावेळी पाठीला वर-खाली करुन ताण देणारे हे आसन फारच उपयुक्त ठरते. श्वासाच्या लयीत हे आसन केल्यास त्याचा आणखी चांगला फायदा होतो. 

(Image : Google)

४.  भुजंगासन 

पोटावर झोपून कंबरेच्या वरचा भाग पुढच्या बाजूने वर उचलणे याला भुजंगासन म्हणतात. दिसायला हे आसन सोपे असले तरी संपूर्ण भार हा हातांवर आणि खांद्यावर येत असल्याने काही सेकंदातच आपण थकतो. मात्र पाठीला मागच्या बाजूला ताण पडल्याने हे आसन उपयुक्त ठरते. 

५. पश्चिमोत्तानासन

दोन्ही पाय पुढच्या बाजूला पसरुन दोन्ही हाताने पायाचे अंगठे धरण्याचा प्रयत्न करायचा. यावेळी गुडघे वाकणार नाहीत असे पाहायचे आणि डोके गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला काही सेकंद आणि नंतर काही मिनीटे हे आसन टिकवण्याचा प्रयत्न करायचा.  

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे