वृषाली जोशी ढोके
नौकेत बसायला कुणालाही लहानपणापासून आवडतं. आल्हाददायक वाटतो तो अनुभव. मात्र रोज योगाभ्यास करताना नौकासन आणि विपरित नौकासन करणं मात्र अनेकांना जमत नाही किंवा केलं जात नाही. शरीराच्या दोन्ही बाजूला निमुळता अरुंद असा नौकेसारखा आकार दिसतो त्यामुळे या आसनाला नौकासन असे म्हणतात. आसन करायला सोपे आणि अतिशय असरदार आहे.
हे आसन कसे करावे?
१. विपरीत शयन स्थिती मध्ये म्हणजेच पोटावर झोपून हे आसन करतात. या स्थितिमध्ये हनुवटी जमिनीवर टेकलेली असते दोन्ही हात बैठकी जवळ जमिनीवर टेकलेले असावेत.२. दोन्ही हात गोलाकार फिरवून डोक्याच्यावर नमस्कार स्थिती मध्ये घेऊन जावे. त्याचवेळी कपाळ जमिनीवर टेकवावे.३. श्वास घेत एकाच वेळी पुढून नाभीपर्यंतचा भाग आणि मागून पाय वर उचलणे. आसनामध्ये स्थिर झाल्यावर संथ श्वसन चालू ठेवावे.४. आसन स्थिती सोडताना श्वास सोडत वर उचलेले शरीर एकाच वेळी सावकाश जमिनीवर टेकवावे.५. दोन्ही हात गोलाकार फिरवून पुन्हा बैठकी जवळ आणून टेकवावे, हनुवटी जमिनीवर टेकवून विपरीत शयन स्थिति पूर्ण करावी.
(Image : google)
कालावधी
५ ते १५ सेकंद आसन टिकवले तरी भरपूर फायदा मिळतो.
फायदे१. संपूर्ण शरीराचा दाब पोटावर निर्माण झाल्याने पाचक रस चांगल्या प्रकारे स्त्रवतो.२. मांडी, पोटरी, ओटीपोट यांच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. तिथली चरबी कमी व्हायला मदत होते.३. पाठीच्या स्नायूंची कार्यक्षमतेचा सुधारते त्याने पोश्चर सुधारण्यास मदत होते.
दक्षता काय घ्यायची?१. आसन स्थिती घेताना व सोडताना कोणतीही घाई गडबड करून शरीराला हिसका देऊन आसन स्थिती घेऊ नये.२. हे आसन पोटावर झोपून करायचे असल्याने ज्यांना हर्निया, अल्सर किंवा पोटाची कोणतीही शस्त्र क्रिया झालेली असेल त्यांनी हे आसन शक्यतो टाळावे.३. गर्भवती महिलांनी हे आसन टाळावे.४. मणक्याचे विकार असतिल तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार हे आसन करावे.
(लेखिका आयुषमान्यता प्राप्त योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)