वृषाली जोशी - ढोकेसगळ्या महिलांचा एक ज्वलंत गंभीर प्रश्न असतो. पोट काही केल्या कमी होत नाही. डाएट केलं, व्यायाम केला, चालायला जाणे, जिम किंवा अगदी योगासनंही केली तरी बाकी वजन कमी होतं पण पोटाचा घेर कमी होत नाही. ही चिंता सतावत असेल तर पण म्हणजे तेवढ्याचसाठी नाही तर उत्तम आरोग्य, स्नायूंना बळकटी, हृदयाची कार्यक्षमता वाढणे आणि पचन सुधारणे यासाठी हे एक आसन रोज करायला हवं. त्याचं नावद्विपाद उत्तान पादासन. करायला अतिशय सोप्पे आणि तितकेच लाभदायक असे हे आसन आहे. दोन्ही पाय उत्तान (म्हणजेच उचललेले)असे हे आसन अतिशय सोप्पे आणि तितकेच लाभदायक आहे.
(Image : google)
हे आसन कसे करावे?
१. जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर पाठीवर सरळ झोपावे. नजर छताकडे, दोन्ही पाय जुळलेले असावेत. दोन्ही हात बैठकीजवळ जमिनीवर टेकलेले ठेवावेत.२.श्वास घेत सावकाश दोन्ही पाय एकाचवेळी कमरेपासून, गुडघ्यात न वाकवता सरळ ९० अंशा मध्ये वर उचलावे. दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले, चवडे वरच्या दिशेने ताणलेले ठेवावेत.३. एकदा पाय उचलून स्थिर झाले की संथ श्वसन चालू ठेवावे. श्वासावर कोणतेही बंधन नाही.४. आसन स्थिती सोडताना श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीवर आणून खाली टेकवावे.
हे आसन करण्याचे फायदे कोणते?
१. पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळते त्यामुळे पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते.२. अशुद्ध रक्त पुरवठा पायाकडून हृदयाकडे वाहतो त्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो. हृदयाची कार्यक्षमता वाढते.३. अपचन, गॅसेस, पचनाचे विकार कमी व्हायला मदत होते.४. शरीराला रक्त संचार चांगला सुधारतो, चेहऱ्यावरचे तेज वाढीस मदत होते.
(Image : google)
कालावधी?आसनाचा कालावधी किमान ३० सेकंद असावा. रोजच्या नियमित सरावाने ५ मिनिटांपर्यंत कालावधी वाढवू शकतो.
दक्षता काय घ्यायची?
1. पायाचा थरकाप होत असेल तर थोडी अलिकडची अवस्था घ्यावी.2. हृदयविकार, उच्च रक्तदाब असेल तर हे आसन शक्यतो टाळावे अथवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.3. आसन हालचाली अतिशय हळू अणि सावकाश असाव्यात कोणताही झटका शरीराला न देता आसन करावे.
(लेखिका आयुषमान्य योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)