Join us  

फक्त आसन-प्राणायम करणं म्हणजे योग नव्हे ! ‘योग’ म्हणजे नक्की काय आणि काय नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2023 4:31 PM

International yoga day 2023 : योग दिन विशेष: फक्त १ तास आसनं करणं म्हणजे योग नव्हे, योग म्हणजे काय आणि काय नाही हे समजून घ्यायला हवं!

ठळक मुद्देआपण सतत भाविष्याच्या चिंतित किंवा भूतकाळाच्या आठवणीत वावरत असू, तर योगवर्गाचा फायदा लवकर दिसून येणार नाही.

सुचेता कडेठाणकर २१ जून. आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. योग दिवसाच्या शुभेच्छा देताना एक महत्त्वाची आठवणकरून द्यावीशी वाटते. योग म्हणजे नक्की काय आणि योग म्हणजे नक्की काय नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे.योग म्हणजे काय नाही?केवळ दि. २१ जूनला सूर्यनमस्कार घालणे, ओंकार जप करणे म्हणजे योग नाही. १०८ सूर्यनमस्कार घालता आले, म्हणजे योगसाधना आली असे नाही. शीर्षासनासारखी काही अवघड आसनं करता आली, म्हणजे योग आला असं नाही. योग म्हणजे केवळ शरीराचा व्यायाम नाही. योग म्हणजे शवासान नाही. योग म्हणजे एक तासाचा आसन-प्राणायाम वर्ग नाही.योग म्हणजे काय?

खरं म्हणजे योगाच्या अनेक व्याख्या सांगितल्या जातात.भगवद्गीतेत सांगितलेली एक व्याख्या प्रसिद्ध आहे. योगः कर्मसु कौशलम्. आपण जे काम करतो ते संपूर्णपणे तादात्म्य होऊन करणे याचा अर्थ योग.पतंजली योग सूत्रांमध्ये सांगितलेली व्याख्या आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधः. आपल्या चित्तांमध्ये अनेकविध कारणांमुळे निर्माण होणाऱ्या भावनिक चढउतारांचे नियमन करणे म्हणजे योग.योग वसिष्ठमध्ये सांगितलेली व्याख्या आहे, मनःप्रशमन उपायः योग इत्यभिधियते. मनाला शांत करण्याचा मार्ग म्हणजे योग.योग आपल्या जीवनात आणायचा कसा?योगाभ्यासाला दररोजच्या एक तासाच्या आसनवर्गापुरतं मर्यादित ठेवणं योग्य नाही. उत्तम प्रशिक्षित योग शिक्षकाच्या निरीक्षणाखाली आसन, प्राणायाम यांचा अभ्यास आणि सराव, हे महत्त्वाचे आहेच. परंतु आपण तो एक तास वगळता उरलेले २३ तास काय करतो, यावर योग आपल्या जीवनात आहे की नाही, हे समजू शकतं.यानिमित्तानं, पतंजली मुनींच्या योगदर्शन या ग्रंथामधलं एक खूप महत्त्वाचं सूत्र सांगावंसं वाटतं.मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम् !याचा अर्थ असा की, सुखी आनंदी व्यक्ती भेटली तर त्या व्यक्तीकरिता मनात मैत्रीची म्हणजेच शुभचिंतनाची भावना येणं, दुःखी किंवा निराश व्यक्ती भेटली, तर त्या व्यक्तीकरिता मनात करुणेची (दयेची नव्हे) भावना येणं, पुण्यवान म्हणजे चांगली कामं करणारी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीकरिता मनात कौतुकाची भावना येणं आणि अपुण्य म्हणजेच वाईट कामं करणारी व्यक्ती असंल, तर त्या व्यक्तीच्या त्या कृतीकरिता मनात उपेक्षेची भावना येणं हे चित्तप्रसादनाचे म्हणजेच मनाला आनंदी आणि शांत ठेवण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे, आता आपल्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रसंगांना या चार गोष्टी लावून बघू शकते.

(Image : google)

४ गोष्टी१. एखाद्या व्यक्तीच्या सुखाच्या आनंदाच्या प्रसंगी, आपल्या मनात त्या व्यक्तीसाठी शुभचिंतन येतं की तिच्या आनंदाचा मोह आपल्याला पडतो. तिला मिळालं, मला का नाही अशी भावना येते की त्या व्यक्तीचं सगळं असंच चांगलं होऊ देत, ही भावना येते. हीच मैत्रीची भावना, मी स्वतःबद्दल बाळगते का? म्हणजे, मी माझी स्वतःची बेस्ट फ्रेंड आहे का?२. एखादी निराश व्यक्ती भेटली, तर आपण करुणेने तिचं ऐकून घेतो, तिला बळ की तिला प्रथम शिकवायला जातो. हीच करुणा मला माझ्याबद्दल वाटते का? निराश असताना मी स्वतःला बळ देते की स्वतःवरच टीका करते?३. चांगलं काम करणारी, कायम सर्वांशी चांगलं वागणारी व्यक्ती पाहिली तर तिचं आपल्याला कौतुक वाटतं की त्या व्यक्तीच्या हेतुंबद्दल आपण शंका घेतो.हेच कौतुक मी माझं करते का? मी चांगलं काम केलं तर स्वतःचं कौतुक करते का?४. वाईट कृत्य करणारी व्यक्ती माहीत असेल, तर त्या व्यक्तीची ती कृत्य दुर्लक्षित करून त्यांचा आपल्या मनावर परिणाम होऊ न देण्याची क्षमता आपल्यात आहे, की आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे वाईट ठरवून टाकतो आणि त्याचा त्रास आपल्याला करून घेतो. त्याचप्रमाणे, माझ्या हातून चूक झाली तर त्यातून शिकून मी पुढे जाऊ शकते की त्या एका चुकीसाठी मी कायम स्वतःला दोष देत राहते?

(Image : google)

आपण योगाभ्यास करतो का?

योगमार्ग असे अनेक विचार आपल्याला देते. पतंजली अष्टांग योगमार्गात-यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्यहार, धारणा, ध्यान, समाधी अशी आठ अंग आहेत. आपण योगाभ्यासाची सुरुवात आसनांनी करतो, हे ठीक. कारण शरीराला त्याती गरज आहे. परंतु यम आणि नियम ही आसनांच्या आधी सांगितलेली दोन अंगं तेवढीच महत्त्वाची आहे. यम आणि नियम म्हणजे समाजाशी आणि स्वतःशी वागण्याचे नियम आहेत. त्यांवर आपली आसनांमधली प्रगती सुद्धा अवलंबून असते. आपण एक तास आसनवर्ग नियमित केला पण इतर वेळी मात्र अयोग्य अन्न, व्यसनं आपल्यावर ताबा ठेवत असतील किंवा आपण सतत भाविष्याच्या चिंतित किंवा भूतकाळाच्या आठवणीत वावरत असू, तर योगवर्गाचा फायदा लवकर दिसून येणार नाही. 

योगमार्गातील सहा अडथळेयोग दिवसाच्या निमित्ताने हठ योगामध्ये सांगितलेले योगमार्गातले सहा अडथळे सुद्धा लक्षात ठेवू. ही योगमार्गातील सहा बाधक तत्त्वं. हे अडथळे किंवा या बाधा पार करणं, म्हणजेच योगिक जीवनशैली अंगीकारणे.अति आहार, अति परिश्रम (नको तेवढा मानसिक आणि शारीरिक ताण, अति व्यायाम), अति बडबड, एखाद्या गोष्टीचा अति आग्रह (अमूक गोष्ट अमूक पद्धतीनेच कायम झाली पाहिजे असा हट्ट), अति लोकसंपर्क (सध्याच्या सोशल मीडियामुळे ही बाधा पार करणं अधिक महत्वाचं), मन अति चंचल असणं (म्हणजेच, माकडासारखं या विषयावरून त्या विषयावर उड्या मारत राहणं) या सहा गोष्टी योगमार्गात अडथळे निर्माण करतात.हे अडथळे समजून घेऊन, ते दूर करण्याचा अभ्यास सतत करणे म्हणजे योग. उत्तम प्रशिक्षित योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग अभ्यास करणे उत्तम.

 

योग पारंगत (एम्. ए. योगशास्त्र)coachsucheta@gmail.comhttp://www.kohamfit.com/

टॅग्स :योगासने प्रकार व फायदेलाइफस्टाइल