वृषाली जोशी-ढोके (योगप्रशिक्षक-वेलनेस ट्रेनर)
आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर उत्साहात साजरा झाला. जगभरातल्या माणसांनी योगाभ्यासाचे महत्त्व समजून घेत आपल्या जीवनशैलीत समावेश करणं सुरु केलं. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक विशेष व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी शशांकासनासंदर्भात माहिती दिली आहे. शशांकासन करण्याचे अनेक फायदे आहेत, मात्र महिलांसाठी ते करण्याचे लाभही भरपूर आहेत. घर स्त्रीभोवती फिरते असं म्हणतात कारण स्त्री फिट तर घर फिट. प्रत्येक महिलेने ताणतणाव, नैराश्य यावर मात करण्यासाठी आणि स्वतः ला हेल्दी ठेवण्यासाठी रोज हे आसन केले तर ते फार उपयुक्त आहे.
हे आसन कसे करावे?१. वज्रासनामध्ये बसावे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवावे. २. श्वास घेत दोन्ही हात समोरून सावकाश डोक्यावर घेऊन जाणे, दंड कानाला चिकटलेले कोपर ताठ ठेवावे. दोन्ही गुडघ्यात एक ते दीड फूट अंतर घ्यावे.३. श्वास सोडत कंबरेमधून पुढे वाकत डोकं जमिनीवर टेकवावे त्याचवेळी दोन्ही हात सुद्धा जमिनीवर टेकवावे. पायात अंतर घेतल्याने डोकं जमिनीला सहज टेकवता येते.४.आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन चालू ठेवावे.५. आसन स्थिती सोडताना श्वास घेत सावकाश कंबरेतून सरळ व्हावे दोन्ही हात डोक्यावर घेऊन जाणे.६. त्यानंतर दोन्ही हात बाजूने खाली आणून गुडघ्यावर ठेवावे दोन्ही गुडघे जुळवून वज्रासन पूर्ण करून घ्यावे.
आसनाचे होणारे फायदे१. या आसनाच्या नियमित सरावाने मानसिक ताणतणाव, नैराश्य, चिडचिडेपणा, मानसिक आजार दूर होतात.२. नितम्ब, ओटीपोट, कंबरेची चरबी कमी व्हायला मदत होते. वजन कमी करायला उपयुक्त ठरते.३. स्मृती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे आसन दररोज करावे.४. पोटावर दाब निर्माण झाल्याने पचन संस्थेचे कार्य सुधारते.५. मासिक पाळीचा त्रास कमी करण्यास मदत करते.६. शरीरातील उष्णता कमी होऊन थंडावा मिळण्यास मदत होते..७. आज्ञा चक्र, मणिपुर चक्र, रूट चक्र या तिन्ही ऊर्जा केंद्रांवर चांगला परिणाम दिसतो.
कालावधीकिमान ३० सेकंद ते दीड मिनिटापर्यंत कालावधी वाढवता येतो.
दक्षता१. गुडघ्याचे ऑपरेशन झालेले असेल तर हे आसन शक्यतो टाळावे.२. मणक्याचे आजार, स्लिप डिस्क, फ्रोझन शोल्डर असे त्रास असतील तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे.३.कंबरेतून खाली वाकताना श्वास सोडत किंवा श्वास सोडलेल्या अवस्थेत खाली वाकावे. श्वास कुठेही रोखून ठेवू नये.४. गर्भवती स्त्रियांनी हे आसन टाळावे.
(लेखिका आयुषमान्यताप्राप्त योगप्रशिक्षक आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)