सकाळी उठल्यापासून मुलांच्या मागे धावाधाव, घरातील मोठ्यांची काळजी, स्वयंपाक, इतर कामे आणि ऑफीस असे सगळे करता करता महिलांची चांगलीच तारांबळ उडते. उठल्यापासून सगळ्यांच्या आधी सुरु झालेली पळापळ रात्री सगळे झोपल्यानंतर संपते. कितीही केले तरी न संपणारी कामे आणि त्यामुळे होणारी दमछाक ही कोणत्याच वर्कींग वूमनला चुकत नाही. हे सगळे करताना स्वत:साठी वेळ काढणे कठिणच. पण या सगळ्यात आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा तब्येत चांगली ठेवायची असेल तर प्रत्येक महिलेने करायलाच हवीत अशी पाच आसने पाहूयाच. या आसनांविषयी सांगताहेत प्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ. हंसजी योगेंद्र
महिलांना रोजची दगदग आणि कामाच्या पद्धती यांमुळे पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी आणि पायदुखी या समस्या सामान्यपणे भेडसावतात. सतत ओट्यापुढे उभे राहणे आणि ऑफीसमध्ये बराच वेळ बैठे काम यांमुळे या समस्या उदभवल्याचे दिसते. मात्र ही आसने नियमित केल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते आणि शरीराचा रक्तप्रवाह चांगला होऊन आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात. पाहूयात ही आसने कोणती आणि ती कशी करायची याबद्दल...
१. विपरीतकर्णी - पाठीवर झोपा. हात शरीराच्या बाजूला समांतर ठेवा आणि कंबरेपासून पायाचा भार वरच्या बाजुला उचला. यानंतर पाठीपासून कंबरही वरच्या बाजुला उचला. कंबरेच्या वरच्या भागाच्या समस्या दूर होण्यास या आसनाचा चांगला उपयोग होतो. सुरुवातीला ही आसनस्थिती १० सेकंद ठेवा नंतर हळूहळू दोन मिनिटांपर्यंत वाढवत न्या. कंबरेला योग्य पद्धतीने आधार देत कंबर आणि पाय खाली घ्या.
२. भद्रासन - मासिक पाळीत होणारा कंबरदुखी, पायदुखी आणि पाठदुखीचा त्रास कमी होण्यास या आसनाचा चांगला उपयोग होतो. तुमचे डोके शांत ठेवण्यासाठी तसेच दैनंदिन ताणतणाव योग्य पद्धतीने हाताळता यावेत यासाठीही हे आसन उपयुक्त असते. हे आसन गर्भधारणेच्या काळातही अतिशय चांगले मानले जाते. कारण यामुळे तुमचा कंबरेच्या खालच्या भागाचा व्यायाम होतो आणि नैसर्गिक प्रसूती होण्यास याचा उपयोग होतो. पाय सरळ रेषेत घेऊन ताठ बसा. नंतर हाताने पायाचे अंगठे धरा आणि दोन्ही तळवे शरीराजवळ आणा. यावेळी तुमचे गेढगे जमिनीला टेकतील असा प्रयत्न करा. डोळे मिटून सामान्य श्वसनक्रिया सुरु ठेवा आणि १५ सेकंदांपर्यंत ही पोझिशन तशीच ठेवा. नंतर अतिशय सावकाशपणे पाय पूर्वस्थितीत आणून आसन सोडा.
३. पर्यंकासन - महिलांना साधारणपणे ओटीपोटाचा भाग वाढण्याची समस्या भेडसावते. पण हे आसन नियमितपणे केल्यास याठिकाणची चरबी घटण्यास मदत होते. तसेच या आसनामुळे पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. मासिक पाळीतील त्रास कमी होण्यासही या आसनाचा उपयोग होतो. मासिक पाळीच्या १५ दिवस आधीपासून हे आसन केल्यास मासिक पाळीदरम्यान येणाऱ्या कळा कमी होण्यास मदत होते. तसेच पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यासही याची चांगली मदत होते. शारीरिक आणि मानसिक ताण दूर होण्यास या आसनाचा चांगला उपयोग होतो. वज्रासनात बसावे. नंतर पाऊले थोडी बाहेर काढून टाचांच्या मध्ये तुमचा पृष्ठभाग येईल असे बघावे. नंतर हळूहळू कोपर आणि हाताचा आधार घेत पाठ जमिनीला टेकवावी. दोन्ही हात पोटावर ठेवावेत आणि संथपणे श्वसन सुरु ठेवावे. २० ते ३० सेकंद हे आसन करु शकता. त्यानंतर असेच आधी खांदे मग पाठ आणि कंबर उचलावी.
४. मत्स्यासन - मेटाबॉलिझम आणि प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते. पाठ, पाय, मांड्या, गुडघे यांचे दुखणे दूर व्हावे यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते. पुनरुत्पादन करणाऱ्या आवयवांचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी हे आसन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तप्रवाह चांगला राहण्यास मदत होते. सुरुवातीला पाठीवर झोपावे. मग पायांचे पद्मासन करावे. शासोच्छवास नेहमीप्रमाणे सुरु ठेवावा. दोन्ही हातांची घडी घालून ते डोक्याखाली ठेवावेत. अशाचपद्धतीने हळुहळू आसन सोडावे.
५. हस्तपासंगुस्थासन - घरकाम, ऑफीस यांमध्ये महिलांना व्यायाम करायला अजिबात वेळ मिळत नाही. पण या आसनामुळे स्ट्रेचिंग होण्यास मदत होते. शरीराला आलेला स्टीफनेस कमी होण्यास यामुळे मदत होते. तसेच हाताचे, पाठिचे स्नायू बळकट होण्यास यामुळे मदत होते. या आसनामुळे पचनक्रिया आणि प्रजननक्षमता चांगली होण्यास मदत होते. शरीराचा बॅलन्स टिकून राहण्यास या आसनाचा उपयोग होतो. अनियमित पाळीची समस्या असेल तर तीही दूर होण्यास या आसनाचा उपयोग होतो. दोन्ही पायांवर समान भार देऊन उभे राहा. खोल श्वास घ्या. पायाचा अंगठा हाताच्या पहिल्या बोटाने पकडून पाय जमिनीला समांतर वर घ्या. या आसनात तोल सांभाळायचा प्रयत्न करा. पण तोल सांभाळता येत नसेल तर भिंतीचा किंवा इतर कोणत्या गोष्टीचा आधार घ्या. या अवस्थेत किमान ६ सेकंद उभे राहण्याचा प्रयत्न करा. हीच क्रिया दुसऱ्या पायाबरोबर करा. सकाळी उठल्यावर हे आसन केल्यास तुमच्या ओटीपोटावर आलेला ताण कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.