टाइट फिट जिन्स, स्कर्टस, ड्रेस घालण्याचं अनेक महिलांना आकर्षण असतं. पण वाढलेल्या हिप्सच्या अर्थात नितंबाच्या कारणानं असे कपडे घालायला त्या संकोचतात. अनेक महिलांचं वजन शरीराच्या इतर भागांपेक्षा कंबर आणि कंबरेखालील नितंबाच्या ठिकाणीच जास्त असतं. शरीर सौंदर्याच्या बाबतीत ही समस्या खूपच त्रासदायक ठरते.सध्याची जीवनशैली ही धावपळीची असली तरी एका जागी खूप वेळ बसून काम करण्याची सवय वाढली आहे. त्यातच वेळेअभावी व्यायामाला डावललं जातं. आणि एकूणच नितंबाचा आकार वाढतो आणि शरीराला बेढबता येते. वाढलेले नितंब कमी करण्यासाठी योगसाधनेतील दोन आसनं खूप उपयुक्त आहे. ही दोन आसनं करुन नितंबाचा आकार कमी करण्यासाठी फक्त दिवसातले 20 मिनिटं लागतात.
बटरफ्लाय अर्थात फुलपाखरु आसन
या असनासाठी आधी सुखासनात बसावं. श्वास सामान्य वेगानं घेत राहावा. दोन्ही पाय दुमडून पायांचे तळवे एकमेकांना चिकटवावे. दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंफुन त्यांनी दोन्ही पायाच्या पंजाना पकडावं. आता दोन्ही पाय फुलपाखराच्या पंखांप्रमाणे वर खाली हलवावेत. हे आसन रोज पाच ते दहा मिनिटं करावं. या आसनामुळे ओटीपोटाखालील स्नायू ज्यांना पेल्विक मसल्स असं म्हणतात त्यांना बांधीवपणा येतो. तसेच नितंब आणि मांड्यावरची चरबी कमी होते. पोटावरची चरबीही कमी होते. आणि पाठदुखी असल्यास या आसनानं आराम मिळतो.
फुलपाखरु आसन नियमित केल्यास मासिकपाळी दरम्यान पोटात, कंबरेत येणार्या चमका, वेदना, पाळीतील अनियमितता, अस्वस्थता हे त्रास कमी होतात. या आसनामुळे पायांचे विशेषत: जांघेमधले स्नायू मजबूत होतात. हे आसन नियमित केल्यास वजन नियंत्रित राहातं शिवाय शरीर -मनातला उत्साहही वाढतो.
मलासन
या आसनाला स्क्वॉट पोजिशन असं म्हणतात. हे आसन करण्यासाठी एका जागी ताठ उभं राहावं. दोन्ही पायात एक ते दीड फुटाचं अंतर ठेवावं. दोन्ही गुडघ्यातून पाय वाकवून खुर्चीत बसल्याप्रमाणे शरीराची स्थिती ठेवावी. या स्थितीत खुर्चीवर बसायचं नाही की उकडीवंही बसायचं नसतं. भारतीय पध्दतीच्या शौचालयात ज्या प्रकारे बसतो तशा स्थितीत शरीराला स्थिर ठेवायचं असतं. या अवस्थेत जितका वेळ शक्य असेल तितका वेळ राहावं. पुन्हा सामान्य स्थितीत यावं आणि परत गुडघ्यात पाय वाकवून हे आसन करावं. किमान 15 ते 20 वेळा शरीराला या स्थितीत न्यावं. 15 वेळा हे केल्यास एक सेट होतो. असे दोन ते तीन सेट नियमित केल्यास त्याचा परिणाम चांगला होतो. प्रत्येक सेट दरम्यान 10 ते 15 सेकंदाचा विराम घ्यावा. पण सेटमधील 15 वेळा या स्थितीत न थांबता यावं.सलग काही दिवस मलासन केल्यास स्नायू लवचिक होतात . सुरुवातीला हे आसन करताना स्नायुंवर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. स्नायू हळूह्ळू लवचिक करण्याचा प्रयत्न करावा. अपेक्षित परिणामांसाठी मलासन हे सकाळी आणि संध्याकाळीही करावं. जेवल्यानंतर हे आसन लगेच करु नये. किमान तीन तासाचं तरी अंतर असावं.
आसनांचे फायदे
* फुलपाखरु आणि मलासन नियमित केल्यास शरीराच्या खालच्या भागात जमा झालेली चरबी कमी व्हायला लागते. शरीराला सुडौलता येते.* ओटीपोट आणि ओटीपोटा खालचे स्नायू मजबूत होतात.* या आसनांच्या नियमित सरावानं कंबरेखालील अवयवांवर चरबी वाढत नाही.* गुडघेदुखी तसेच पचनासंबधीच्या तक्रारीही या आसनांच्या सरावानं कमी होतात.* ही दोन्ही आसनं महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात खूप महत्त्वाची आणि फायदेशीर असतात. हार्मोनसंबंधित निर्माण होणार्या समस्या या आसनांनी कमी होतात तसेच गर्भाशयाशी संबधित आजारांचा धोकाही टळतो.
.. तेव्हा मात्र आसन टाळा
* फुलपाखरु आणि मलासन हे गुडघ्यांसाठे चांगले असतात. गुंडघ्यांची दुखणी या आसनामुळे दूर राहातात. पण जेव्हा गुडघे दुखत असतात तेव्हा मात्रं ही आसनं कटाक्षानं टाळावीत.* मासिक पाळीच्या दरम्यान ही दोन आसनं करुन नये. मासिक पाळीदरम्यान शरीरात वेदना असतात. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान जर ही आसनं केली तर मात्र वेदना वाढू शकतात.