उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्यामागे किती व्याप असतात. घर आवरणं, नाश्ता, स्वयंपाक वर्किंग वूमन असाल तर ते काम, स्वत:च्या आवडी निवडी, छंद, मुलांचा अभ्यास, त्यांना वेळ देणं, पुन्हा संध्याकाळी स्वयंपाक, आवराआवरी आणि सकाळची तयारी. कामांची यादी संपतच नाही. पण या यादीत व्यायाम कुठे बसतो? अनेकींच्या यादीत तर तो बसतच नाही. अनेकजणी तो ओढूण ताणून बसवण्याचा प्रयत्न करतात , पण ठरवलेल्या वेळी व्यायाम होईलच याची खात्री नसते. तर अनेकजणी केला तर केला व्यायाम नाहीतर सरळ कामांची किंवा थकण्याची कारणं सांगून व्यायामाला बुट्टी देतात. तर अनेकजणींना व्यायाम करण्याची इच्छा असते पण दिवसातल्या कोणत्या वेळेला करावा हेच त्यांना कळत नाही.
व्यायामाला वेळ नाही या समस्येचा विचार जेव्हा अभ्यासकांनी केला तेव्हा या समस्येतून मार्ग काढण्यासाठी ते म्हणतात , तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करा... पण व्यायाम करा. जर तुम्हाला दिवसभरात फक्त सकाळीच व्यायामाला वेळ मिळणार असेल तर सकाळी व्यायाम करा... सकाळपेक्षा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळणार असेल तर मग संध्याकाळी करा. आपलं कामाचं वेळापत्रक काय आहे याचा विचार करुन व्यायामाची एक वेळ ठरवावी आणि तीच सलग काही आठवडे, काही महिने पाळावी. यासंबंधीचा अभ्यास सांगतो की एका ठराविक वेळेत व्यायाम केल्यास त्याची शरीराला सवय होते आणि त्याचा सकारात्मक परिणाम फिटनेससाठी आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी होतो.
सकाळ आणि संध्याकाळचा व्यायाम याबाबतही जगभरात सखोल अभ्यास झाला आहे. या दोन्ही वेळेतील व्यायामाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत . आधी सकाळच्या व्यायामाविषयी.
सकाळच्या व्यायामाचे फायदे
-सकाळच्या व्यायामानं एक आरोग्यदायी दिनचर्या विकसित होऊ शकते. संशोधनातून हे सिध्द झालं आहे की जे सकाळी व्यायाम करतात ते व्यायाम सहसा चुकवत नाही. दिवसाची सुरुवातच व्यायामानं होत असल्यानं तो फारच क्वचित टाळला जातो.
-सकाळच्या व्यायामानं झोपेचं चक्र सुरळीत होतं. त्यामुळे दिवसभर छान ताजतवानं वाटतं. काम करताना उत्साह येतो आणि संध्याकाळी थकल्यासारखं वाटतं. त्यामुळे लवकर झोपण्याची सवय लागते. सकाळच्या व्यायामानं शांत आणि गाढ झोप लागते. तज्ज्ञ म्हणतात ही अशी झोप स्नायुंच्या विकासासाठी आवश्यक असते.
-सकाळचा व्यायाम हा रिकाम्या पोटीच केला जातो. त्यामुळे या व्यायामानं शरीरातील फॅटस जास्त जळतात. कारण सकाळी व्यायाम करताना शरीर जी साठवलेले फॅटस असतात ते वापरतात. सकाळी व्यायाम केल्यानं फॅटस जळण्याचा ‘आफ्टर बर्न इफेक्ट ’ जास्त काळ टिकतो. हा परिणाम वजन कमी करण्यासाठी प्रभावी असतो.
- संशोधनात हे आढळून आलं आहे की, सकाळी व्यायाम केल्यानं दिवसभर ऊर्जा टिकून राहाते. सजगता वाढते. कामात लक्ष लागतं. निर्णय क्षमता वाढते. सकाळच्या व्यायामानं कामाला जी स्फूर्ती मिळते त्यातून दिवस सत्कारणी लागतो.
- आपला दिवस उत्साहानं सुरु करण्यासाठी सकाळचा व्यायाम उपयोगी ठरतो. सकाळच्या व्यायामानं शरीरात एन्डॉर्फिन्स हे रसायन जास्त निर्माण होतं. हे आनंदी ठेवणारं रसायन आहे. यामुळे दिवसभर मूड छान राहातो. सकाळच्या व्यायामानं काहीतरी प्राप्त केल्याचं, सिध्द केल्याचं समाधान मिळतं ज्याचा परिणाम आपला पूर्ण दिवस सकारात्मक जातो.
सकाळच्या व्यायामाचे तोटे
- रात्री जर नीट जेवण केलेलं नसेल तर सकाळी व्यायामाला ऊर्जा मिळत नाही. व्यायाम करताना भूक लागल्याची जाणीव होते. त्यामुळे व्यायामात लक्ष लागत नाही. हे टाळण्यासाठी तज्ज्ञ सांगतात की रात्री व्यवस्थित जेवण करा. किंवा सकाळी व्यायामाआधी एखादं केळ खा. यामुळे व्यायामादरम्यान लागणारी भूक आणि भुकेशी संबधित थकवा टाळता येतो.
- सकाळी व्यायामासाठी लवकरचा अलार्म लावला जातो. पण यामुळे अनेकदा झोप विस्कळित होते.त्यामुळे व्यायामाच्या वेळेस उत्साही वाटत नाही. झोप आल्यासारखी वाटते. त्यामुळे व्यायामाच्या वेळच्या हालचाली जडावतात.
- सकाळी उठल्यानंतर अनेकांचा आळस पटकन जात नाही. शरीराला, सांध्यांना एकप्रकारचा जखडलेपणा असतो. त्यामुळे व्यायाम करताना हालचाली नीट होत नाही. अशा हालचालीतून स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर शरीरात उष्णता नसते. शरीर थंड असतं. शिवाय हदयाचे ठोके मंद असतात. या बाबींमुळे सकाळच्या व्यायामाला गती मिळत नाही. यासाठी वॉर्म अपला पुरेसा वेळ देणं गरजेचं असतं.
(संध्याकाळच्या व्यायामाविषयी पुढील भागात.)