वृषाली जोशी-ढोके
जागतिक योग दिवस जवळ येऊन ठेपला आहे. २१ जून. हा आठवा जागतिक योग दिवस आहे. २१ जून २०१४ पासून या दिनाला जागतिक मान्यता मिळाली. आता असा स्पेशल दिवस म्हटला की तो मोठ्या स्वरूपात साजरा केलाच जातो आणि मग त्या मध्ये भाग घ्यायला हौशे, नवशे आणि गवशे असे सगळे उत्साहाने सहभागी होतात. अगदी छान पांढरा स्वच्छ टी-शर्ट, ट्रॅक पॅण्ट आणि योगा मॅट घेऊन फोटो काढण्यासाठी आणि सोशल मीडीयात ते पोस्ट करणारेही अनेकजण. ते हौशी गटात मोडतात. फक्त पोज देऊन फोटो काढणे, ते फोटो सगळ्यांना शेअर करणे, व्हॉटसॲप स्टेटसला ठेवणे यातच त्यांचं सेलिब्रेशन. एक दिवस योगासनं करून आपण कोणती तरी मोठी कामगिरी फत्ते करून आलो अशी धन्यता मानतात. बाकी ३६४ दिवस पण आसनं करायची असतात हे त्यांच्या लक्षातच राहत नाही.
बरेच जणांना योग दिन म्हणजे काय? नक्की योग म्हणजे काय?आसन प्राणायाम काय? करायचा? ह्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेल्या योगशास्त्रा बद्दल आणि त्याच्या अभ्यासाबद्दल काहीच माहीत नसते ते नवशे ह्या गटात मोडतात. मग नवीन काहीतरी करून बघू म्हणून ते हा दिन साजरा करण्यासाठी उत्सुक असतात. आणि थोडे दिवस उत्साहाने आसनं करून नव्याचे नऊ दिवस झाले की पुन्हा ते त्या वाटेला जात नाहीत. काही जण, चला! आजच्या स्पेशल दिनाच्या निमित्ताने तरी आपल्याला काही नवीन शिकायला, प्रगती करायला काही गवसते काय? म्हणून बघत असतात आणि बऱ्याचशा "योगा ग्रुप्स" ला जॉईन करतात ते गवशे ह्या गटात मोडतात. आता व्यक्ती तितक्या प्रकृती गोष्ट लक्षात घेऊन ह्या दिना निमित्त सगळेच साधक करू शकतील असे साधेसोप्पे पण भरपूर परिणामकारक अशा आसनांचा अभ्यासक्रम ठरवलेला आहे. (प्रोटोकॉल आसनं) आसनं करून किंवा नवीन काही अभ्यास करून बरेच जणांना आनंद मिळतो. आणि मग योगाभ्यास हवाहवासा वाटू लागतो. जसा योगासने, प्राणायाम हा शरीर आणि मनाचा बाह्य अभ्यास आहे तसेच शरीर शुद्धी साठी काही शुद्धीक्रिया योग ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. या शुद्धीक्रिया किती, कोणत्या त्यांचा उपयोग काय? ह्या बद्दल बरेच अज्ञान आहे. त्या कश्या कराव्यात, कोणी कराव्यात, कधी कराव्या हे सुध्दा शास्त्रोक्त पद्धतीने शिकणे आणि करणे गरजेचे आहे. अनेक आजारांवर उपचार म्हणून शुद्धीक्रिया केल्या जातात. आजकाल कोरोना महामारीच्या भयावह परिस्थितीमध्ये उपयुक्त म्हणून आपण सगळ्यांनीच जलनेती ह्या शुद्धीक्रियेचे नाव ऐकले असेल. पण जलनेती म्हणजे नक्की काय, कशी करावी ह्या बद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे. योगशास्त्रात ६ प्रकारच्या शुद्धीक्रिया सांगितल्या आहेत. त्यात जलनेती ही एक शुद्धी क्रिया सांगितली आहे. नासिका मार्ग साफ करणे याला'नेती' म्हंटले आहे. आणि जल म्हणजे पाणी. पाण्याच्या सहाय्याने नाकपुड्यांपासून घश्यापर्यंतचा मार्ग स्वच्छ धुणे असा जलनेती चा अर्थ होतो. घेरंड संहिता नावाच्या योग ग्रंथा मध्ये जलनेतीचा उल्लेख सापडतो. जलनेती म्हणजे नुसतेच पाण्यानी नासिका मार्ग साफ करणे हा उद्देश नसून खालील अनेक फायदे आपल्याला मिळतात.
कोरोनाकाळात जलनेती करा असं अनेकजण सांगत असतात. पण तिचे फायदे काय, मुख्य म्हणजे आपण शास्त्रोक्तपध्दतीने ती शिकून मगच करायला हवी.
१. शरीरातला कफदोष नाहीसा ही होतो.२. वार्ध्यक्याचे विकार उद्भवत नाहीत.३.कोणताही ज्वर (ताप) येत नाही.४. शरीरावर पूर्ण नियंत्रण येते.५. दीर्घ मुदतीची जुनाट सर्दी, सायनस पासून आराम मिळतो.असे एक ना अनेक फायदे ह्या शुध्दीक्रियाचे आहेत.या योग दिनानिमित्त असं काही शास्त्रीय पध्दतीने शिकता आलं तर जरुर पहावं.
नाशिकस्थित योगविद्या गुरुकुल अंतर्गत योगविद्या धाम ही संस्था योगदिनानिमित्त ही विनामूल्य संधी उपलब्ध करून देत आहे. अधिक माहितीसाठी ही वेबसाईट पहा..
https://www.yogapoint.com/
( लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)