वजन वाढू लागले आहे, हे जाणवून देणाऱ्या पाऊलखुणा सगळ्यात आधी आपल्या पोटावरून दिसायला सुरूवात होतात. हळूहळू पोटाचा पेटारा फुलू लागतो आणि मग तो कितीही प्रयत्न केला तरी कमी होत नाही. म्हणूनच तर पोटाचा नगारा वाढण्याआधी सावध व्हा आणि जपानी टॉवेल एक्सरसाईज हा जगभर गाजणारा ट्रेण्ड अगदी सहजपणे घरातल्या घरात करून पहा.
लॉकडाऊनमुळे अनेक जीम आतापर्यंत बंदच होत्या. आता जीम सुरू झाल्या असल्या तरी कोरोनाची भीती अजूनही कमी झालेली नसल्याने आपल्याला जीमला जायला नको वाटते. शिवाय लॉकडाऊन काळात घरातच बसून राहिल्याने वजनही भराभर वाढते आहे, अशी अनेक जणांची तक्रार आहे. म्हणून तर पोटाची चरबी कमी करणारा आणि एका साध्या टॉवेलच्या मदतीने करता येणारा हा व्यायाम प्रकार जगभरातल्या लोकांनी सध्या डोक्यावर घेतला आहे.
जापनीज टॉवेल एक्सरसाईज
जापनीज टॉवेल एक्सरसाईजचा शोध जपान येथील अभ्यासक डॉ. तोशिकी फुकुत्सूदजी यांनी लावला असल्याचे सांगितले जाते. या व्यायामामुळे पोटावरची चरबी कमी होते आणि बोडी पोश्चरही परफेक्ट होते. कंबरेला आणि पाठीला मजबूती देण्याचे कामही या व्यायामातून होते.
कसा करायचा हा व्यायाम
- जापनीज टॉवेल एक्सरसाईज करायला योगा मॅट किंवा सतरंजी आणि एक टॉवेल एवढ्या दोनच गोष्टी लागतात.
- १५ इंच लांब आणि चार इंच रूंद असा टॉवेल या व्यायामासाठी घ्यावा.
- सुती टॉवेलपेक्षा जाडसर कापडाचे मऊ टॉवेल या व्यायामासाठी निवडावेत.
- टॉवेल जमिनीवर पसरून मधोमध दुमडून घ्या. यानंतर एका बाजूने टॉवेलची गुंडाळी करायला सुरूवात करा.
- टॉवेलची ही गुंडाळीच आपल्याला आपल्या व्यायामासाठी वापरायची आहे.
- टॉवेलची गुंडाळी बरोबर आपल्या कंबरेच्या खाली येईल, अशा पद्धतीने योगा मॅटवर झोपा.
- दोन्ही पायांच्या टाचांमध्ये ८ ते १० इंच अंतर राहील, अशा पद्धतीने पाय पसरा आणि पायांचे अंगठे मात्र एकमेकांना जोडा.
- दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वर पसरवा आणि जमिनीवर पालथे ठेवा.
- पाच मिनिटे या अवस्थेत राहिल्यानंतर ही व्यायामस्थिती सोडा.
- व्यायामस्थिती सोडताना सगळ्यात आधी कंबरेखालचा टॉवेल काढा. त्यानंतर एका कुशीवर वळून हळूच उठा.