गौरी पटवर्धन
एरोबिक, स्ट्रेंग्थ, वेट ट्रेनिंग, योगा, पिलाटेज किंवा याहीपेक्षा वेगवेगळे व्यायाम काहीजण करतात. त्यातही नव्याने व्यायाम सुरु करणारे लोक मार्गदर्शनासाठी इंटरनेटचा सल्ला घेतात. यूट्यूबवर व्हिडीओ बघतात. आणि मग अर्थातच त्यांना उत्तम व्यायाम करणारे, खूप सगळं इक्विपमेंट वापरणारे, जिममध्ये जाऊन व्यायाम करणारे लोक दिसतात. आणि मग त्यांची अशी खात्री पटते की चांगला व्यायाम करण्यासाठी जिम लावण्याला पर्याय नाही. आणि जिम लावायचं म्हणजे खर्च आला. आधी जिमची फी, मग तिथे वापरायला वेगळे बूट, कपडे, नॅपकिन, किट बॅग, पाण्याची बाटली, हेल्थ ड्रिं आणि मग साहजिकच आपण स्वतःशी विचार करतो की आपण जिममध्ये नियमितपणे जाणार आहोत का? कधी फार ऊन आहे म्हणून, कधी पाऊस आहे म्हणून तर कधी इतर कुठल्यातरी कारणाने आपण जिमला दांड्या मारणार हे सगळ्यांना मनातून माहिती असतं. मग आपण जे करण्याची खात्री नाही त्यासाठी एवढा खर्च कशाला करायचा असा विचार करून बऱ्याच वेळा चालणे, धावणे असे व्यायाम सोडून इतर कुठल्याही व्यायामाचा आपण विचार करत नाही. आणि त्यात सगळ्यात जास्त बळी जातो तो अपर बॉडीच्या फिटनेसचा.
पण अपर बॉडीच्या फिटनेससाठी खरंच जिम किंवा व्यायामशाळा गरजेची असते का?
तर नाही. बेसिक फिटनेससाठी लागणारे व्यायाम हे स्वतःच्याच शरीराच्या वजनाचा उपयोग करून करता येऊ शकतात. कसे? तर गुरुत्वाकर्षणाने आपलं शरीर जमिनीवर घट्ट धरून ठेवलेलं असतं. त्याच्या विरोधात आपण जे काही करू त्याने आपल्याला व्यायाम होतो. मग त्यात पुश अप्स, पुल अप्स, क्रन्चेस, जोर-बैठका, उड्या मारणं हे सगळं येतं. असा विचार केला तर बॉडी वेटचा विचार करून आपण कुठले अपर बॉडी एक्सारसाईझ करू शकतो ते आपल्याला लक्षात येऊ शकतं.
अपर बॉडी एक्सारसाईझ इतकाच महत्वाचा पण काहीसा दुर्लक्षित असणारा व्यायामाचा भाग म्हणजे बेंडिंग आणि स्ट्रेचिंग. यामागचं लॉजिक तसं सोपं आहे. आपण ज्या ज्या स्नायूंना व्यायाम दिलेला असतो ते स्नायू ताणून रिलॅक्स करणं आणि जे स्नायू व्यायामाने आखडलेले असतात ते बेंडिंग करून मोकळे करणं हा त्यातला मुख्य विचार आहे.
त्यामुळे व्यायाम करून झाल्याच्या नंतर काही बेसिक बेंडिंग आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ पुढे वाकून डोकं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करणं, कमरेतून मागे वाकण्याचा प्रयत्न करणं, साईड बेंडिंग करणं, सिटअप्स किंवा क्रन्चेस मारल्यानंतर बॅक बेंडिंग करणं, पाय मागे पुढे आणि आडवे जास्तीत जास्त एकमेकांपासून लांब नेण्याचा प्रयत्न करणं. कमरेतून वळून मागे बघणं, खाली बसून पाय सरळ करून चवडे स्वतःकडे ओढून पोटऱ्यांचे स्नायू ताणणं इत्यादी.
व्यायाम सुरु करतांना वॉर्मअप करणं जितकं महत्वाचं असतं, तितकंच व्यायाम संपल्यावर स्ट्रेचिंग-बेंडिंग आणि कूलिंग डाऊन करणं महत्वाचं असतं. हे व्यायाम केले नाहीत तर फिटनेस बाजूला राहून दुखापत होऊ शकते. आणि आपलं ध्येय व्यायाम करण्याचं आहे कारण त्यातूनच आपल्याला फिटनेस कमावता येणार आहे!