छान रिमझिम बरसणारा पाऊस, हिरवागार झालेला निसर्ग, झाडे- पाने- फुले यांच्यात आलेला एक वेगळाच टवटवीतपणा... हे सगळं पावसाळ्याचं (rainy season) वातावरण भरभरून नेत्रसुख देणारं असलं तरी प्रत्यक्षात पावसाळ्यात तब्येती सांभाळणं हे मोठंच अवघड काम असतं. कारण या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजार बळावलेले असतात आणि त्यातच आपला जठराग्नि मंद झाल्याने पचनाचे त्रास निर्माण होऊन रोगप्रतिकारक शक्ती (immunity) जरा कमी झालेली असते. म्हणूनच तर पावसाळ्यात अपचन, जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे (bloating), गॅसेस होणे असे त्रास अनेक जणांना वारंवार जाणवतात.(indigestion)
हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. कारण उन्हाळा- हिवाळा या ऋतूंमध्ये काहीही खाल्ले तरी पचते, तसे पावसाळ्यात होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तर आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
वजन कमी करण्याच्या वेडापायी लोक करतात ९ चुका, तज्ज्ञ सांगतात तुम्हीही चुका करत असाल तर..
तसंच दुसरं म्हणजे पचनाचे कोणतेही त्रास होऊ नयेत यासाठी काही व्यायाम नियमितपणे करणं गरजेचं आहे. या व्यायामांमुळे पोट हलकं वाटेल आणि तसंच पचनक्रिया व्यवस्थित होऊन इतर अनेक त्रास कमी होतील. त्यासाठी कोणते व्यायाम करायचे, याची माहिती इन्स्टाग्रामच्या satvic.yoga या पेजवर शेअर करण्यात आली आहे. अवघ्या २ ते ३ मिनिटांत हे व्यायाम करणं अगदी शक्य आहे.
पचनाचे त्रास कमी करण्यासाठी आसनं..
१. वज्रासन
करायला अतिशय सोपं आणि अगदी कधीही करता येईल असं हे आसन आहे. रात्री झोपण्यापुर्वी बेडवर बसल्या बसल्या काही मिनिटांसाठी तुम्ही वज्रासन केलं तरी चालेल.
किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच काही मिनिटे वज्रासनात बसा. वज्रासन केल्यामुळे पचन संस्थेअंतर्गत येणाऱ्या अवयवांना अधिक चांगला रक्तपुरवठा होतो. त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते आणि पचनाचे त्रास कमी होतात.
२. मरिचासन
हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी दोन्ही पाय समोरच्या दिशेने सरळ करून ताठ बसा. यानंतर एक पाय गुडघ्यात दुमडा आणि तो शक्य तेवढा तुमच्या शरीराजवळ आणण्याचा प्रयत्न करा. यानंतर जो पाय शरीराजवळ आणला आहे, तो हात मागच्या बाजूने ठेवा. हाताचा तळवा बाहेरच्या बाजूने असावा. दुसऱ्या हाताचा कोपरा दुमडलेल्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने असावा. ही अवस्था काही सेकंद टिकवावी. पुन्हा दुसऱ्या बाजूने अशाच पद्धतीने आसन करावे. हे आसन करताना शरीराला एक विशिष्ट पिळ बसतो. त्यामुळे आतडे स्वच्छ होण्यास मदत होते.
३. पवनमुक्तासन
पवनमुक्तासन करण्यासाठी पाठीवर झाेपा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडा आणि पोटावर घ्या. दोन्ही हातांनी दोन्ही पाय पकडा. ही आसनस्थिती काही सेकंदांसाठी टिकवून ठेवा. यामुळे पोटातले गॅसेस मोकळे होऊन पोट फुगणे कमी हाेते.