वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. वय वाढतं तसे शरीरात, दिसण्यातही बदल होतात. बायकांच्या बाबतीत वाढतं वय हा चिंतेचा विषय नसतो तर वय दिसणं हा काळजीचा विषय असतो. आपल्याकडे पाहून आपलं वय कळलं नाही पाहिजे असा आग्रह असतो. हा आग्रह पूर्ण करण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला वयापेक्षा तरुण करणारे व्यायाम.
नियमित व्यायाम हा फिट राहाण्यासाठी आवश्यक असतो. पण व्यायामाचे असेही काही प्रकार आहेत जे आपल्याला दीर्घ काळ पर्यंत तरुण दिसण्यास मदत करतात. हे व्यायाम केवळ आपलं वयच लपवत नाही तर वाढत्या वयामुळे होवू शकणार्या त्रासांपासूनही दूर ठेवतात. आपण आहोत त्यापेक्षा 10 वर्ष आणखी तरुण दिसण्यासाठी आणि फिट राहाण्यासाठी आपल्या रोजच्या व्यायामात 5 व्यायाम प्रकारांचा समावेश करा आणि फरक बघा.
10 वर्ष तरुण करणारे व्यायाम
1. धनुरासन
योगसाधनेतील या आसनामुळे शरीरात रक्त प्रवाहित होतं. शिवाय ऑक्सिजनही मिळतं. या दोन गोष्टींमुळे स्नायुदुखीचा त्रास होत नाही.
हे आसन करताना पोटावर झोपावं. पाय गुडघ्यात वाकवावेत. दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडावेत. आता डोकं वर उचलावं. नजर समोर ठेववी आणि छाती ताणावी आणि दोन्ही हातांनी पायास ताण द्यावा. दहा सेकंद या स्थितीत राहावं. मग दहा सेकंद थोडा विराम घ्यावा. ही क्रिया दहा वेळा करावी.
2. दोरीवरच्या उड्या
या व्यायामानं हदयाचं आरोग्य चांगल राहातं. हा व्यायाम अतिशय सोपा असून यामुळे वजन पटकन कमी होतं आणि हदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण होतं. दोरीवरच्या उडया मारण्यापूवी व्यवस्थित वॉर्म अप करावं. एका मिनिटात जितक्या जास्त उड्या मारता येतील तितक्या माराव्यात. काही सेकंद थांबून पुन्हा एक मिनिट लावून उड्या माराव्यात. असं सात ते आठ वेळा करावं. साधारणत: 500च्या पुढे दोरीवरच्या उड्या मारल्यास त्याचा फायदा होतो.
3.सुपरमॅन
वय तिशीच्या पुढे गेलं की बर्याच महिलांमधे संधिवाताचे विकार डोकं वर काढतात. यामुळे हालचालींवर र्मयादा येतात. सांधे लवचिक राहावेत आणि संधिवाताचा धोका टळावा म्हणून हा सुपरमॅन पोजचा व्यायाम करावा.
हा व्यायाम करण्यासाठी पोटावर झोपावं. आपले दोन्ही हात समोर ताठ ठेवावेत. दोन्ही पाय सोबत उचलावे. जमिनीपासून चार ते आठ इंच वर उचलावेत. तसेच दोन्ही हात एकदम वर करावे. हात देखील पायांप्रमाणेच जमिनीपासून चार ते आठ इंच वर न्यावे. या अवस्थेत किमान दहा सेकंद रहावं. पुन्हा सामान्य स्थितीत यावं. दहा सेकंद विराम घ्यावा आणि पुन्हा हा व्यायाम करावा. कमीत कमी दहा वेळा हा व्यायाम करावा.
4.स्क्वॉटस
स्क्वॉटस केल्यामुळे गुडघे दुघतात असा अनेकजणींचा समज असतो. पण हा समज चुकीचा आहे. उलट शरीराच्या खालच्या भागाची चरबी कमी करण्यास हा अत्यंत उपयुक्त व्यायाम आहे. वय वाढत जाण्यासोबतच मांडीवरची चरबीही वाढत जाते. या व्यायामानं पाय तर मजबूत होतातच शिवाय सुडौलताही प्राप्त होते.
हा व्यायाम करण्यासाठी आपल्या मागे एक खुर्ची ठेवावी. खुर्ची समोर पाठ करुन उभं राहावं. आपल्या नितंबाइतक दोन्ही पायात अंतर ठेवावं. नंतर गुडघे वाकवून खुर्चीवर बसल्यासारखं करावं. ( प्रत्यक्ष मागे खुर्ची असली तर बसू नये) या अवस्थेत आपली पाठ ताठ ठेवावी. ओटीपोटांच्या स्नायुंवर ताण द्यावा. पुन्हा सामान्य स्थितीत यावं. न थंबता 20 स्क्वॉटसचा एक सेट करावा. थोडा विराम घेऊन पुन्हा स्क्वॉटस करावेत. 20 स्क्वॉटसचे तीन सेट करावेत.
5. वेगानं चालणं
वेगानं चालणं हा एक चांगला व्यायाम आहे. हदय, फुप्फुस यांचं कार्य सुरळीत चालण्यासाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे. सुंदर दिसण्यासाठी हा व्यायाम करावा असं तज्ज्ञ सांगतात. कारण वेगानं चालण्याचा व्यायाम केल्यानं ऑक्सिजन आपल्या चेहेर्या त्वचेच्या पेशींपर्यंत पोहोचतो. यामुळे वय वाढण्याची क्रिया मंदावते.
हा व्यायाम करताना वेगानं चालायला सुरुवात करवी. पण पळायचं मात्र नाही. भरभर चालताना दमायला झालं तर एक मिनिट विराम घ्यावा आणि पुन्हा वेगानं चालण्यास सुरुवात करावी. किमान अर्धा तास तरी वेगानं चालायला हवं.