Join us  

फक्त १ महिना वृक्षासन करा, पाय होतील सुबक आणि वाढेल स्नायूंची लवचिकता, टोण्ड लेग्ज हवेत तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 1:48 PM

Benefits of Vrikshasana (Tree Pose) : वृक्षासन हे आसन करायला अत्यंत सोपे आणि रोज नियमित करण्याचे फायदे अनेक

आपल्या देशाला योगशास्त्राची परंपरा हजारो वर्षांपूर्वीच लाभली आहे. योगासने आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी फायदेशीर आहेत. योगासने करून तुमच्या शरीराला आणि मनाला खूप फायदे मिळू शकतात. तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर रोजच्या रुटीनमध्ये योगाचा समावेश करायलाच हवा.  योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. इतकंच नाही तर मानसिक तणावात देखील तुम्हाला योगाचा नक्कीच फायदा होतो. योगा करताना केवळ एकच आसन करून चालत नाही. योग दिवसेंदिवस बदलत आहे, त्याच्या आसनांमध्ये अनेकदा बदल आणि भिन्नता येतात. अशी अनेक योगासने आहेत जी स्नायू चांगले ठेवण्यास आणि टोन करण्यास मदत करतात. योगासने तुमच्या शरीराला संतुलित आणि डिटॉक्स करण्यास मदत करतात. केवळ एका महिन्यात तुमच्या पायांना टोण्ड करण्यासाठी व पायांच्या स्नायूंना बळकटी मिळवून देण्यासाठी वृक्षासन करणे महत्वाचे आहे. वृक्षासनाचा उल्लेख प्राचीन पुराणातही आढळतो आणि रामायणातही या आसनाचे संदर्भ आहेत. वृक्षासन करण्याची योग्य पद्धत व त्याचे फायदे समजून घेऊयात(Benefits of Vrikshasana -Tree Pose).

१. पायांना टोन करण्यासाठी कोणते आसन करावे ? 

योगशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण आसन म्हणजे वृक्षासन (Vrikshasana). वृक्षासनाला इंग्रजी भाषेमध्ये ट्री पोझ (Tree Pose) असे म्हटले जाते. झाडांच्या स्थितीवरुन प्रेरणा घेऊन या आसनांची रचना करण्यात आल्यामुळे याला वृक्षासन हे नाव पडले. या आसनाचा नियमितपणे सराव केल्यास शरीरामध्ये संतुलन राखले होते. वृक्षासन हा एक संस्कृत शब्द आहे. या शब्दाची फोड केल्यावर वृक्ष आणि आसन हे दोन शब्द तयार होतात. या आसनामध्ये शरीराची स्थिती वृक्षाप्रमाणे (झाडाप्रमाणे) असते. 

२. वृक्षासन कसे करावे ? 

१. जमिनीवर सरळ उभे राहा आणि शरीराच्या दोन्ही बाजूला हात ठेवा. 

२. आपला उजवा गुडघा वाकवा आणि उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर ठेवा. तुमच्या पायाचा तळवा तुमच्या आतील मांडीवर सरळ ठेवला आहे याची खात्री करा. 

३. या दरम्यान, तुमचा डावा पाय सरळ असावा ज्यामुळे तुम्हाला शरीराचा समतोल राखता येईल.

४. या आसनात असताना, दीर्घ श्वास घेत राहा. आता तुमचे हात तुमच्या डोक्यावर वर घ्या आणि 'नमस्ते' मुद्रेत तुमचे तळवे एकत्र करा. 

५. जेव्हा तुम्ही मुद्रेत असता तेव्हा तुमच्या समोरील काही अंतरावर असलेल्या वस्तूवर लक्ष केंद्रित करा. 

६. या दरम्यान, तुमचे संपूर्ण शरीर ताणलेले असावे आणि पाठीचा कणा सरळ ठेवावा.

७. आता या आसनात ३० सेकंद राहा. श्वास सोडा आणि आसनातून सामान्य स्थितीत परत या. 

८. आता आसनाच्या या स्टेप्स दुसऱ्या पायाने करा.

३. वृक्षासन करण्याचे फायदे - 

१. वृक्षासन पाय, घोटे, गुडघे आणि मांड्या यांच्या स्नायूंचे आरोग्य राखण्यास मदत करते. 

२. वृक्षासनामुळे शरीरात संतुलनाची भावना निर्माण होते. हे मानसिक आरोग्य, लक्ष आणि एकाग्रता वाढवण्यास देखील मदत करते. 

३. वृक्षासनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. परिणामी मज्जासंस्थाही बळकट बनते.

४. या आसनाच्या नित्य सरावामुळे पाय लवचिक बनतात. 

५. या आसनाच्या नियमित सरावाने पायाची बोटे, गुढघे, हाताचे कोपरे यांसारख्या अवयवांमधील रक्तवाहिन्यांनमध्ये रक्त पुरवठा सुरळीत होतो.

टॅग्स :फिटनेस टिप्स