वजन कमी असणे हे केवळ सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे नाही. वजन योग्य प्रमाणात असणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते. कारण लठ्ठपणा, स्थूल शरीर अनेक आजारांचे मुळ आहे. म्हणूनच वजन योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी शरीराची चयापचय क्रिया सुधारणे अतिशय महत्त्वाचे आहे. चयापचय क्रिया सुधारण्यासाठी काही नियम पाळणे गरजेचे आहे. हे नियम कोणते आहेत, याचीच माहिती आपण घेणार आहोत.
वजन कंट्रोल करण्याचे नियम
१. रात्रीच्या वेळी घ्या सकस आहार
बऱ्याचदा आपण रात्रीच्या जेवणाकडे दुर्लक्ष करतो. पार्टी, हॉटेलिंग यासगळ्या गोष्टी रात्रीच्या वेळीच असल्याने अनेकदा रात्री खूप जास्त जेवण केले जाते. हे जेवण एकतर मैदायुक्त पदार्थांनी पुरेपुर असते किंवा मग खूप जास्त स्पाईसी आणि तेलकट, तुपकट असते. अनेकदा रात्रीच्यावेळी घरी स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो. किंवा मग ऑफिसमध्येच उशीर झाल्याने घरी येऊन स्वयंपाक करणे जमत नाही. याचा परिणाम म्हणजे बाहेरून काहीतरी मागवले जाते. ही सवय वजन वाढीचे मुख्य कारण आहे. रात्रीचा आहार हा कमी कॅलरीजचा असावा. कारण जेवण केल्यानंतर आपण काही वेळात झोपतो आणि मग कॅलरीज बर्न व्हायला वेळच मिळत नाही.
२. रात्रीच्या जेवणात गोड नको
गोड पदार्थांमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय असल्यास ती सगळ्यात आधी बंद करा. गोड पदार्थ खायचेच असतील तर ते नाश्ता आणि दुपारचे जेवण किंवा दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांच्या मधे जो वेळ असतो, त्या वेळेत खा.
३. जेवणानंतर आंघोळ करू नका
अनेक लोकांची अशी सवय असते की रात्रीच्यावेळी आंघोळ करायची आणि मग झोपायचे. मग ही आंघोळ अनेक जण जेवण झाल्यानंतर करतात. जेवण केल्यानंतर शरीराची उष्णता वाढलेली असते. अशावेळी जर आंघोळ केली तर शरीराचे तापमान कमी होते. असा शरीराच्या तापमानात होणारा झटपट बदल आरोग्यासाठी हानिकारक आणि वजन वाढण्यास प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे रात्री आंघोळ करायचीच असेल तर ती जेवणाच्या आधी करा.
४. जेवल्यानंतर थंड पाणी पिणे टाळा
जेवण झाल्यानंतर अर्धातास पाणी पिऊ नये असे सांगितले जाते. पण जर पाणी प्यायचेच असेल, तर जेवणानंतर कोमट पाणी प्यावे. थंड पाणी अन्न पचन व्यवस्थित होण्यास बाधा आणते. त्यामुळे मुख्यत : रात्रीच्या जेवणानंतर थंड पाणी पिऊ नये.
५. जेवणानंतर फळे खाऊ नका
रात्रीच्या जेवणानंतर कधीही फळे खाऊ नयेत. मुळात रात्री फळेच खाऊ नयेत. फळे खायची असतील तर ती सकाळी नाश्त्याला किंवा मग दोन जेवणांच्या मधल्यावेळेत खावीत. जेवण झाल्यानंतर आपली संपूर्ण पचन संस्था जेवण पचविण्याकडे केंद्रित झालेली असते. अशा अवस्थेत जर फळे खाल्ली तर ती अजिबातच पचत नाहीत. त्यामुळे फळे खाण्याचा लाभ तर शरीराला होतच नाही, उलट वजन वाढीसाठी फायदा होतो.
६. अन्न उरले म्हणून खाऊ नका
अनेक घरांमध्ये हा नेहमी दिसून येणारा सीन. जेवण झाल्यानंतर सगळ्याच भांड्यामध्ये अगदी थोडे थोडे पदार्थ उरलेले असतात. त्यामुळे घरातल्या महिलेकडून सगळ्यांना हे पदार्थ संपविण्याचा आग्रह करण्यात येतो. पोट भरलेले असतानाही वरून होणारा हा मारा आपल्या पचनसंस्थेला सहन करणे खूपच अवघड असते. अन्न वाया न घालविण्याची ही सवय खूपच चांगली आहे, पण आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. म्हणून काही अन्न उरले तर ते गरजू व्यक्तींना द्या. पोट भरलेले असताना अजिबातच जास्तीचे खाऊ नका.