Join us  

2 वर्षांच्या लेकीसह कल्की कोचलीन करतेय योगासनं,आई आणि लेकीचे पाहा भन्नाट व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 2:24 PM

कल्की कोचलिननं शेअर केलेला व्हिडीओ पाहा;  लेकीला सांभाळत कल्की करतेय दमदार योगसाधना.. मजेदार व्हिडीओतून मिळते प्रेरणा

ठळक मुद्देकल्कीनं पोस्ट केलेला व्हिडीओ फास्ट फाॅरवर्ड स्वरुपातला असून पाहायला मजेशीर वाटतो. मूल लहान असलं तरी स्वत:साठी वेळ काढणं, फिटनेस राखणं शक्य आहे हेच कल्कीनं पोस्ट केलेल्या व्हिडीओतून लक्षात येतं. 

मूल झाल्यानंतर बाईचं आयुष्य 360 अंश कोनातून बदलतं असं म्हणतात. तिला तिचं आयुष्य मूल, मूल झाल्यानं बदललेले प्राधान्यक्रम डोळ्यासमोर ठेवून नव्यानं आखावं लागतं. मूल होण्यापूर्वीच्या अनेक गोष्टी आवडत असूनही केवळ वेळ मिळत नसल्यानं तिला त्या बाजूला ठेवाव्या लागतात नाहीतर  सोडून द्यावा लागतात. मूल होण्यापूर्वी स्वत:च्या फिटनेसबाबत अतिशय जागरुक असलेल्या महिला मूल झाल्यानंतर मुलाचं कारण देत फिटनेस रुटीनकडे दुर्लक्ष करतात. त्या सर्वांसाठी एक मजेदार व्हिडीओ कल्कीनं नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ केवळ मजेदार नसून प्रेरणादायी देखील आहे. 

Image: Google

कल्कीनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत कल्की योगसाधना आणि व्यायाम करताना दिसते. फास्ट फाॅरवर्ड स्वरुपातला हा व्हिडीओ पाहायला अगदी मजेशीर आहे. व्हिडीओत कल्की सूर्यनमस्कार, स्क्वाॅटस, स्ट्रेचिंग, शिर्षासन,  वज्रासन ही योगआसनं, ध्यानधारणा करताना दिसते. हे करत असताना कल्कीची दोन वर्षांची मुलगी सॅफो तिच्या आजूबाजूला खेळताना दिसते. आईच्या योगामॅटवर सॅफोचे दोन बदकं विराजमान असलेले दिसतात. एकीकडे आई व्यायाम करतेय तर मुलगीही तिच्या खेळण्यात दंग असलेली दिसते. पण हे चालू असताना दोघीही एकमेकींची दखल घेताना दिसतात. आई व्यायाम करत असली तरी सॅफोला मधूनच आईच्या कुशीत जाऊन बसावंसं वाटतं . तर कल्कीही व्यायामादरम्यान थोडा वेळ मुलीला मांडीवर घेऊन खेळवताना दिसते. मुलीच्या खेळण्यात आईचा व्यायाम व्यत्यय आणत नाही आणि आईच्या व्यायामात मुलगी अडथळा आणत नाही हे या व्हिडीओमधून दिसतं. 

Image: Google

मूल झाल्यानंतर आईचं आयुष्य पूर्वीपेक्षा जास्त वेगवान होतं. मूल सांभाळण्यासोबतच घर, करिअर संदर्भातल्या अनेक जबाबदाऱ्यांनी तिचा दिवस व्यापलेला असतो. अशा या घाईगर्दीच्या दिवसात निवांतपणा मिळेल तेव्हा स्वत:साठी वेळ काढू,  आवडी  निवडीची कामं करु, व्यायाम करु असं अनेक बायका ठरवतात. पण आवडीच्या आणि स्वत:च्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाची कामं करायला वेळ असा मिळतच नाही. असा निवांत वेळ बाईला आयता मिळत नसून तो आग्रहानं काढावा लागतो. कल्कीनं शेअर केलेल्या व्हिडीओतून आई झालेल्या बाईच्या व्यस्त जगाची झलक तर दिसतेच पण यात ठरवलं तर आनंदान स्वत:साठी वेळ काढत स्वत:ला फिट ठेवता येतं हे वास्तवही उमगतं. कल्की कोचलिननं मजा म्हणून हा व्हिडीओ शेअर केलेला असला तरी यातून बायकांना "स्वत:साठीचा क्वाॅलिटी वेळ कसा काढावा ' याचा धडा मिळतो आणि धावपळीच्या जीवनात योगसाधना, व्यायाम करण्याचं महत्वही उमगतं.

योगसाधनेमुळे शरीराबद्दलची सजगता निर्माण होते . मानसिक पातळीवर आवश्यक असलेली शांतता, दृष्टिकोनातील निश्चितता योग आणि व्यायामानं मिळवता येते. हाॅर्वड युनिव्हर्सिटीनं योगसाधनेच्या परिणामांवर केलेला अभ्यास सांगतो की योग साधनेमुळे भीती आणि नैराश्य हे मानसिक आजार बरे होण्यास मदत होते. योगसाधनेमुळे मेंदू चांगल्या पध्दतीनं काम करतो.  नियमित योग साधना केल्यानं शरीराच्या लवचिक हालचली होतात, आरोग्य निरोगी राहातं.

Image: Google

मानसिक ताणतणावाच्या परिस्थितीत योगसाधनेतील स्ट्रेचेसचे व्यायाम केल्यास, ध्यानधारणा केल्यास मनावरील ताण दूर होतो. लहान मूल सांभाळताना, सोबत करिअर करताना बाईची अशक्य धावपळ होते. या धावपळीतून स्वत:साठी वेळ काढून योगसाधना करणं, ध्यानधारणा करणं हाच ऊर्जा मिळवण्याचा मार्ग आहे हेच कल्कीचा हा व्हिडीओ बघून लक्षात येतं. 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेकल्की कोचलीन