सुर्यनमस्कार, योगा, वेगवेगळे वर्कआऊट यामुळे अभिनेत्री करिना कपूर खान नेहमीच चर्चेत असते. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तर करिनाने झपाट्याने केलेले वेटलॉस चर्चेचा विषय ठरले होते. वेटलॉसचा फिटनेस फंडा करिना नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असते. करिनाने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये करिना नटराजासन करताना दिसते आहे. नटराजासन या आसनाला किंग डान्सर पोज म्हणून देखील ओळखले जाते. काही अवघड योगासनांपैकी एक असणारे हे आसन करण्यासाठी खूपच एकाग्रता आणि योगसाधनेचा सराव लागतो. पण नटराजासन करण्याचे फायदे जबरदस्त असल्याने हे आसन नियमितपणे करावे, असे तज्ज्ञ सांगतात.
कसे करायचे नटराजासन?- सगळ्यात आधी वृक्षासनात उभे रहा.- त्यानंतर श्वास घेत घेत शरीराचे वजन उजव्या पायावर संतूलित करण्याचा प्रयत्न करा. डावा पाय अलगद उचलून तो मागच्या बाजूने वर उचलण्याचा प्रयत्न करा. - यानंतर डाव्या हाताने डावा पाय पकडण्याचा प्रयत्न करा. पाय पकडता आल्यावर उजवा हा पुढे करा आणि शरीराचा संपूर्ण भार उजव्या पायावर पेलण्याचा प्रयत्न करा. - २० ते ३० सेकंद ही आसनस्थिती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. एका प्रयत्नात एवढा वेळ आसन जमले नाही तर ३ ते ४ वेळा आसन करून बघा. - आता दुसऱ्या प्रयत्नात उजवा पाय वर उचलून डाव्या पायाने शरीराचे संतूलन राखण्याचा प्रयत्न करा.
नटराजासन करण्याचे फायदे- नटराजासन केल्यामुळे पायांच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि लेग टोन्ड होण्यासाठी मदत होते.- शरीराची ताकद आणि लवचिकता वाढविण्यासाठी नटराजासन करणे फायद्याचे ठरते. - नटराजासन केल्यामुळे जी आसन अवस्था निर्माण होते, त्यामुळे रक्ताभिसरण क्रियेस वेग मिळतो आणि त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात उर्जा मिळते.- मन एकाग्र करण्यासाठी नटराजासन करणे फायद्याचे ठरते.
- नटराजासन केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतो.- छाती, खांदे आणि मांडीचे स्नायू मजबूत होण्यासाठी नटराजासन फायद्याचे ठरते.- वेटलॉससाठी देखील नटराजासन उपयुक्त ठरते. विशेषत: पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नटराजासनाचा फायदा होतो. - पचन संस्थेचे अनेक आजार नटराजासनाच्या नियमित सरावाने बरे होतात.- नटराजासन केल्यामुळे शरीराचे पोश्चर सुधारण्यास मदत होते.
नटराजासन कुणी करू नये?- ज्यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांनी नटराजासन करू नये.- गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नटराजासन करावे. - स्लीप डिस्कचा त्रास असणाऱ्यांनी नटराजासन करू नये.