Join us  

करीना कपूर म्हणते फिट राहायचं तर सूर्यनमस्कार उत्तम , सूर्यनमस्कार घाला आणि पहा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 1:49 PM

करीनामुळे पुन्हा एकदा फिटनेसबाबत जागरुक असलेल्यांचं फिट होऊ पाहाणाऱ्यांच लक्ष सूर्यनमस्काराकडे वळलं आहे. सेलिब्रेटींपासून ते सामान्यांपर्यंत सूर्यनमस्कार घालण्याला महत्त्व देतात. सूर्यनमस्काराबाबत तज्ञ्ज्ञ सांगतात की सूर्यनमस्कार करण्याचे खूप फायदे आहेत. हा असा एक व्यायाम प्रकार आहे ज्यात डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक पेशी आणि स्नायू कार्यरत असतो. प्रत्येक स्नायूचा व्यायाम सूर्यनमस्काराद्वारे होतो.

ठळक मुद्दे सूर्यनमस्कार करण्याचे खूप फायदे आहेत. हा असा एक व्यायाम प्रकार आहे ज्यात डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक पेशी आणि स्नायू कार्यरत होतात.सूर्यनमस्कार तंत्रशुध्दपणे घातल्यास एका दिवसात शरीरातील ४०० उष्मांक जळतात.व्यायामाच्या बाबतीत सूर्यनमस्काराला परिपूर्ण व्यायाम संबोधलं जातं.

करीना कपूर आपल्या वजनावर नेहेमी काम करते. सिनेमातल्या तिच्या भूमिका बघून याचा अंदाज तर येतोच पण करीना कपूरने आपल्या दोन्ही बाळांतपणात फिटनेसकडे लक्ष दिलं होतं. गरोदर असताना ती करत असलेल्या व्यायामाचे व्हिडीओ. फोटो व्हायरल झाले होते. तसेच बाळांतपणानंतरही तिच्या फिटनेस व्हिडीओची चर्चा व्हायला लागली. वाढलेल्या वजनाचं करीना कधीच टेंंशन घेत नाही. कारण हे वजन तंत्रशुध्दपणे कसं कमी करायचं हे तिला माहित आहे.

नियमितपणे योग करणे हा करीनाचा नियम आहे. आणि योगची सुरुवात ती सूर्यनमस्कार घालून करते. आपल्या फिटनेसमधे सूर्यनमस्काराचं महत्त्वं करीनानं अनेक मुलाखतीतून सांगितलेलं आहे. सध्या दूसऱ्या बाळांतपणानंतर करीनानं आपल्या वाढलेल्या वजनवार लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी ती पुन्हा सूर्यनमस्काराकडे वळली आहे. मूल होण्याआधी करीना रोज १०८ सूर्यनमस्कार घालायची पण आता ती ५० ते ६० सूर्यनमस्कार रोज घालते. या सूर्यनमस्कारांमुळेच आपण आपल्या पूर्वीच्या फॉर्ममधे पुन्हा परतू असा करीनाला विश्वास आहे. पहिल्या बाळांतपणानंतर तिनं हे करुनही दाखवलं होतं. आपल्यात काम करण्याची ऊर्जा आणि उत्साह हा सूर्यनमस्काराने येतो त्यामुळे सूर्यनमस्कार हा आपल्या रोजच्या वर्कआउटचा महत्त्वाचा भाग असल्याचं करीना सांगते.

करीनामुळे पुन्हा एकदा फिटनेसबाबत जागरुक असलेल्यांचं फिट होऊ पाहाणाऱ्यांच लक्ष सूर्यनमस्काराकडे वळलं आहे. सेलिब्रेटींपासून ते सामान्यांपर्यंत सूर्यनमस्कार करण्याला महत्त्व देतात. सूर्यनमस्काराबाबत तज्ञ्ज्ञ सांगतात की सूर्यनमस्कार करण्याचे खूप फायदे आहेत. हा असा एक व्यायाम प्रकार आहे ज्यात डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक पेशी आणि स्नायू कार्यरत होतात. प्रत्येक स्नायूचा व्यायाम सूर्यनमस्काराद्वारे होतो. सूर्यनमस्कारातील १२ आसनं शरीरातील ७ चक्रांना सक्रीय करतात. नियमित सूर्यनमस्कार घालणाऱ्यांची क्षमता ही कालांतरानं वाढते. त्यामुळे सुरुवातीला पाच सूर्यनमस्कार घालून थकणारेही नंतर १०८ सूर्यनमस्कार एका वेळी घालू शकतात. तज्ञ्ज्ञ म्हणतात की नव्यानं सूर्यनमस्कार घालणार असाल तर सुरुवात ही पाच किंवा दहा सूर्यनमस्कारांनी करावी. कारण सूर्यनमस्काराच्या बारा आसनांमधे स्ट्रेचिंगचा व्यायाम असतो. या आसनामधे स्नायूंवर ताण येतो. आणि हा ताण देताना शरीराला ताकद लावावी लागते. त्यामुळे आधी पाच -दहा सूर्यनमस्कारांनी सूरुवात करुन मग सूर्यनमस्कार वाढवत न्यावेत. सूर्यनमस्कारांमुळे हदयाची गती समतोलित राखण्यास, स्नायुंमधे संतुलन राखण्यास मदत होते. सूर्यनमस्कार करताना प्रत्येक आसन हे कमीत कमी एक मिनिट होल्ड करावं. सुरुवातीला प्रत्येक आसन हे ३० सेकंद होल्ड करावं असं तज्ज्ञ म्हणतात. सूर्यनमस्कार तंत्रशुध्दपणे घातल्यास एका दिवसात शरीरातील ४०० उष्मांक जळतात. सूर्यनमस्कार घालताना एक लय आणि गती असते. वजन कमी करण्यासाठी वेगानं सूर्यनमस्कार घातले जातात तर शरीर लवचिक करण्यासाठी प्रत्येक आसन काही काळ होल्ड केलं जातं. व्यायामाच्या बाबतीत सूर्यनमस्काराला परिपूर्ण व्यायाम संबोधलं जातं.

 

सूर्यनमस्कारांचे फायदे

  • सूर्यनमस्कारांमुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहातो. रक्तादाबासंबंधित आजारांचा धोका सूर्यनमस्कारांमुळे कमी होतो.
  • नियमित सूर्यनमस्कार करणाऱ्यांचं हदयाचं आरोग्य चांगलं राहातं.
  •  शरीरातील विषारी वायू बाहेर काढण्यास, रक्त शुध्द करण्यास आणि शरीराला डिटॉक्स करण्याचं काम सूर्यनमक्सार करतात.
  •  पचनक्रिया सुधारण्याचं महत्त्वाचं काम सूर्यनमस्काराने होतं.पचनक्रिया व्यवस्थित असल्यास वजन वाढणं आणि इतर पचनासंबंधीच्या समस्या दूर राहातात. सूर्यनमस्कारानं पचन व्यवस्थित होतं , पोटात वायू धरत नाही तसेच बध्दकोष्ठतेची समस्याही दूर होते.
  •  सकाळी लवकर मोकळ्या हवेत सूर्यनमस्कार घातल्यास त्याचा उपयोग हाडं मजबूत होण्यास होतो.
  •  सूर्यनमस्कारानं शरीराची ठेवण सुधारते . ताठ बसणं, सरळ चालणं या चांगल्या सवयी सूर्यनमस्कारानं शरीरास लागतात.
  •  वय जसं वाढतं तसं शरीरातील लवचिकता कमी होत जाते. पण नियमित सूर्यनमस्कार घालण्याची सवय असल्यास शरीराची लवचिकता वयाच्या कोणत्याही टप्प्यात टिकून राहाते.
  •  मनशांतीसाठी सूर्यनमस्कार घालणं फायदेशीर असतं. मनाची एकाग्रता वाढते. ताण तणाव जाणवत असताना सूर्यनमस्कार केल्यास मन शांत होवून निर्णय प्रक्रिया सुधारते असं तज्ज्ञ म्हणतात. सूर्यनमस्कार करताना जे आसनं केली जातात त्यात श्वास घेणं, सोडणं, रोखून धरणं या श्वासांच्या विविध क्रिया कराव्या लागतात. याचा फायदा मन तणावमुक्त होण्यास होतो.
  •  अनेक कारणांमुळे रात्रीची झोप लागत नाही. पण सूर्यनमस्कार नियमितपणे घातल्यास झोपेसंबंधीच्या समस्या दूर होतात.
  •  आळस, आजार अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे वजन वाढतं. नियमित सूर्यनमस्कार घातल्यानं शरीरावरची चरबी कमी होते. शरीरावर चरबी साठत नाही. प्रत्येक आसनात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर ताण आणि दाब येत असल्यानं चरबी कमी होण्यास त्याचा फायदा होतो. वजन कमी करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार असं तज्ज्ञ सांगतात. सूर्यनमस्कारांनी केवळ वजनच कमी होतं असं नाही तर शरीर सुडौल होण्यास मदत होते.
  • मासिक पाळी नियमित करण्यास सूर्यनमस्काराचा फायदा होतो. तसेच लैंगिक जीवनावरही सूर्यनमस्काराचा सकारात्मक फायदा होतो.

सूर्यनमस्कार घालताना

  • सूर्यनमस्कारात १२ आसनं असतात. ही बारा आसनं तंत्रशुध्दपणे करणं आवश्यक असतं. तंत्र चुकलं तर सूर्यनमस्काराचा शरीराला काहीही फायदा होत नाही. म्हणूनच सूर्यनमस्कार नीट शिकून घेऊन मग करावेत.
  • गंभीर आजारपणात किंवा मोठ्या आजारपणातून बाहेर आल्यानंतर स्वत:च्या मनानं सूर्यनमस्कार करु नये. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • नुकतीच एखादी शस्त्रक्रिया वगैरे झालेली असल्यास सूर्यनमस्कार घालू नये असा सल्ला तज्ज्ञ देतात कारण सूर्यनमस्कारात प्रत्येक आसन करताना शरीरावर ताण येतो.