Join us  

करिना कपूरची ट्रेनर सांगतेय पाठीच्या दुखण्यासाठी योगासनं, 5 प्रकारची आसनं करा नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 3:10 PM

पाठीच्या दुखण्यावर करिनाच्या योग प्रशिक्षकांनी सांगितला रामबाण उपाय; 5 प्रकारच्या आसनांनी होते पाठीचे दुखणे गायब 

ठळक मुद्देएकाच जागी तासनतास बसल्यानं पाठदुखी, कंबरदुखीच्या समस्या निर्माण होतात. पाठीच्य स्नायुंना बळ येण्यासाठी आणि शरीराचं पोझिशनिंग सुधारण्यासाठी योगासनं महत्वाची.अर्धचक्रासन, त्रिकोणासन, मार्जरासन, भुजंगासन आणि बालासन केल्यानं पाठदुखी - कंबरदुखीची समस्या दूर होते. 

बैठी जीवनशैली ही आरामशीर वाटत असली तरी प्रत्यक्षात बैठ्या जीवनशैलीचे अनेक दुष्परिणाम शरीर आणि मनाला भोगावे लागतात. एकाच जागी तासनतास बसून काम केल्यानं पाठदुखी कंबरदुखी वाढते. शरीराची 'पोझिशन' बिघडते. पाठीत, कंबरेत वाक येऊन दुखणं आणखी वाढतं. यावर गोळ्या औषधांपेक्षाही व्यायाम हाच उत्तम पर्याय आहे. अभिनेत्री करिना कपूरच्या योग प्रशिक्षक अनुष्का परवानी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत पाठीच्या दुखण्यावर 5 आसनांचा रामबाण उपाय सांगितला आहे. या आसनांचा एकत्रित परिणाम पाठदुखी, कंबरदुखी कमी होण्यावर होतो.  शरीराच्या स्नायुंना बळ आणि आकार देण्यासाठी ही 5 योगासनं उत्तम असल्याचं अनुष्का सांगतात.

Image: Google

अर्धचक्रासन

अर्धचक्रासन दोन पध्दतीनं करता येतं. अर्धचक्रासन करताना जमिनीवर ताठ उभं राहावं. डावा हात डोक्यावर सरळ  नेऊन ताणावा आणि तो उजव्या बाजूने झुकवावा. काही सेकंद या अवस्थेत राहावं. नंतर मूळ स्थितीत यावं. नंतर उजवा हात डोक्यावर सरळ नेऊन तो डाव्या बाजूने झुकवावा.दुसऱ्या पध्दतीनं अर्धचक्रासन  करताना जमिनीवर ताठ उभं राहावं. दोन्ही हात पाठीमागे कंबरेवर ठेवावे. दोन्ही हातांच्या तळव्यांनी पाठीला आधार देत मागच्या दिशेने जास्तीतजास्त झुकण्याचा प्रयत्न करावा. शरीराचं संतुलन राखत हे आसन करावं. किमान 5 ते 7 वेळा हे आसन करावं. 

Image: Google

अर्धचक्रासन केल्यानं पोटाची चरबी कमी होते. मानदुखी कमी होते. स्वादुपिंड सक्रिय होतं. पाठीच्या स्नायुंवर संतुलित ताण येतो. पाठीवरील अतिरिक्त ताण निघून जातो. पाठीचा कणा निरोगी ठेवण्यासाठी अर्धचक्रासन हा उत्तम व्यायाम आहे. पुढे झुकन/ वाकूण बसण्याची सवय असल्यास या आसनानं ती सुधारते.  बसून काम करणाऱ्यांनी अर्धचक्रासन अवश्य करावं. 

Image: Google

त्रिकोणासन

शरीराला एकाच वेळी तीन कोनात आणणारं आसन म्हणजे त्रिकोणसन. त्रिकोणासन करण्यासाठठीदोन पायात साडेतीन ते चार फुटाचं अंतर ठेवावं. उजवा पायाचं पाऊल 90 अंश बाहेरच्या दिशेनं ठेवावं. डाव्या पायाचं पाऊल सरळ ठेवावं. पुढे झुकत उजवा हात पावलाच्या जवळ ठेवावा आणि डावा हात खांद्यातून सरळ वर ताठ ठेवावा. नजर वर उचललेल्या हातावर ठेवावी. अर्धा मिनिट या स्थितीत राहिल्यानंतर आसन सोडावं आणि दुसऱ्या बाजूनं हे आसन करावं. हे आसन करताना कंबर गुडघे न वाकवता खाली झुकावं.

Image: Google

त्रिकोणासन केल्यानं लठ्ठपणा कमी होतो. पोटावरची चरबी कमी होते. त्रिकोणासनानं फुप्फुसांचा व्यायाम होतो. शरीराला ऊर्जा मिलते. पाठदुखी असणाऱ्यांसाठी हे आसन फायदेशीर असतं. या आसनानं पचनशक्ती मजबूत होते. बध्दकोष्ठता दूर होते. चिंता तणाव कमी होतो. शरीराचं संतुलन या आसनानं राखलं जातं. 

Image: Google

मार्जरासन

मार्जरासन करताना गुडघ्यावर बसावं.  पुढच्या दिशेने झुकून दोन्ही हात जमिनीवर टेकवावेत. खांदे आणि मांड्या ताठ ठेवाव्यात. दीर्घ श्वास घेत मान वर करुन आकाशाकडे पाहावं. मान उंच करताना पाठ जमिनीच्या दिशेने खाली न्यावी. श्वास सोडत मान जमिनीच्या दिशेनं खाली करावी आणि पाठ वर उचलावी. हे असं किमान दहा वेळा करावं. 

Image: Google

मार्जरासन केल्यानं पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. मान आणि पाठीचे स्नायू लवचिक होतात. बरगड्यांच्या पिंजऱ्याची उघडझाप व्यवस्थित होते. गर्भाशयाशी निगडित समस्या दूर होतात. पचनसंस्थेचं कार्य सुधारतं. कामातील एकाग्रता वाढते. हात, खांडे मनगट मजबूत होतात. पाठ आणि ओटीपोटावरील स्नायूंवर ताण येऊन समस्या दूर होतात. पाठदुखीची समस्या दूर होते. 

भुजंगासन

भुजंगासन करण्यासाठी पोटावर झोपावं. दोन्ही हात मांड्यांच्या जवळ ठेवावे. दोन्ही पायात थोडं अंतर ठेवावं. नंतर दोन्ही हात खांद्याच्या बरोबरीला आणावेत. दोन्ही तळवे छातीच्या जवळ जमिनीवर टेकवावे. शरीराचं वजन तळव्यांवर टाकावंं. श्वास आतमध्ये घेत डोकं वर घेऊन पाठीच्या दिशेनं मागे उचलावं. हाताचे कोपर वाकलेले असावेत. डोकं जास्तीत जास्त पाठीच्या दिशेनं मागे ताणावं. या स्थितीत 15 ते 30 सेकंद राहावं. दोन मिनिटापर्यंत हे आसन करता येतं. आसन सोडताना श्वास सोडत मान खाली आणावी. छाती जमिनीला टेकवत डोकं हातांवर ठेवावं. 

Image: Google

भुजंगासनानं पाठीचा मणका मजबूत होतो. लवचिकता वाढते. पचनक्रिया सुधारते. चयापचयक्रिया सुधारण्याने वजन कमी होतं. छाती, खांदे, पोटाचा खालचा भाग ताणला गेल्यानं फायदा होतो. 

Image: Google

बालासन

बालासन करण्यासाठी वज्रासनात बसावं. कमरेतून समोर झुकावं. डोकं जमिनीला टेकवावं. दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवून समोर लांब/ सरळ ठेवावेत. छातीनं मांड्यांवर दाब द्यावा. हे आसन करताना मंद गतीनं श्वसन सुरु ठेवावं. बालासन केल्यानं पाठ आणि कंबरेच्या तक्रारी दूर होतात. पाठ, कंबर, खांद्यांमधील आखडलेपणा दूर होतो. मेंदू, मन शांत होतं. स्मरणशक्ती वाढते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेपाठीचे दुखणे उपाय