करिना ही तिच्या फिटनेसबाबत अतिशय जागरूक आहे, हे तर आपण जाणतोच. म्हणून तर प्रेगन्सी आणि डिलेव्हरी या काळात कमालीच वाढलेलं वजन करिनाने अवघ्या काही महिन्यांमध्ये पुन्हा नॉर्मलला आणलं आहे. बहुसंख्य मैत्रिणींचं काय होतं, की प्रेग्नन्सी आणि त्यानंतर बाळंतपण या काळात भरपूर वजन वाढतं. व्यायामाची सवयही सुटून जाते. म्हणून मग वाढलेलं वजन कंट्रोलमध्ये येण्यासाठी प्रयत्न कमी पडतात. थोडाफार व्यायाम केला जातो, पण तो खूप वाढलेलं वजन घटविण्यासाठी अजिबातच पुरेसा नसतो. मग शेवटी कितीही व्यायाम करा, वजन कमी होतंच नाही, असं आपण म्हणतो आणि आपल्या मनानेच व्यायामाचा काही उपयोग नाही, हे ठरवून व्यायाम करणं सोडून देतो.
पण करिनाने असं मुळीच केलं नाही. बाळंतपणानंतर अवघ्या दोन- तीन महिन्यात तिने मोठ्या प्रमाणात वजन घटवलं होतं. आता तिच्यासारखी एवढी परफेक्ट फिगर नसली तरी चालेल, पण आपलं शरीर सुडौल असावं, थोड- फार शेपमध्येही यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेढब दिसू नये, असं प्रत्येकीला वाटतं. म्हणूनच तर शरीराला बेढब होण्यापासून वाचवायचं असेल तर करिना करते ते वीरभद्रासन दररोज काही मिनिटांसाठी करा. शरीराचा शेप तर दिवसेंदिवस परफेक्ट होईलच, पण अनेक आजारांचा धोकाही कमी होईल.
वीरभद्रासन कसे करायचे?
- नावाप्रमाणे वीर म्हणज योद्धा किंवा शूर व्यक्ती. या शूर व्यक्तीनुसार करायची आसनस्थिती म्हणजेच वीरभद्रासन. वीर भद्रासन हे तीन प्रकारचे असतात. करिनाच्या फिटनेस ट्रेनर अंशुका (fitness trainer anshuka parwani) यांनी करिनाची जी आसन स्थिती शेअर केली आहे ती वीरभद्रासन- २ या प्रकाराने ओळखली जाते.
- वीर भद्रासन करण्यासाठी सगळ्यात आधी सरळ उभे रहा. यानंतर एक पाय पुढे आणि एक पाय मागे याप्रमाणे पायातलं अंतर वाढवत न्यावं. जवळपास साडेतीन ते चार फुट अंतर दोन्ही पायात असेल, अशी पोझमध्ये उभं रहावं. यानंतर जो पाय पुढे आहे तो गुडघ्यात वाकवावा आणि शरीर शक्य होईल इतकं सरळ रेषेत वाकवावं.
- यानंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ आडवे करावे.
- क्रमांक १ चे वीरभद्रासन करणार असाल तर दोन्ही हात यानंतर सरळ वर घ्यावेत आणि नमस्काराच्या स्थितीत एकमेकांना जोडावे.
- क्रमांक २ चे वीरभद्रासन करायचे असल्यास दोन्ही हात सुरुवातीला खांद्याच्या रेषेत सरळ आडवे करावेत. त्यानंतर जो पाय पुढे असेल तो हात पुढे आणि जो पाय मागे असेल तो हात मागे अशी हातांची हालचाल करावी आणि याच आसनस्थितीत काही सेकंद स्थिर रहावे.
- क्रमांक ३ वीरभद्रासन प्रकारात सरळ उभे रहावे. दोन्ही हा छातीजवळ घेऊन नमस्काराच्या स्थितीत जोडावे. त्यानंतर कंबरेत झुकावे आणि सोबतच एक पाय उचलून तो सरळ रेषेत मागे न्यावा. एका पायावर तोल सांभाळण्याचा प्रयत्न करावा.
- वीरभद्रासन आधी एक पायाने झाले की तसाच प्रकार दुसऱ्या पायाने पुन्हा करावा.
वीरभद्रासन करण्याचे फायदे
- या आसनामुळे शरीर सुडौल, बांधेसुद होण्यास मदत होते.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे हात, पाय, पाठ आणि मानेच्या स्नायूंना बळकटी मिळते.
- वीरभद्रासन केल्यामुळे शरीराच्या अनेक भागांचं खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेचिंग होतं.
- रक्ताभिसरण अधिक चांगले होण्यासाठी वीरभद्रासन उपयुक्त ठरते.
- वीरभद्रासन केल्यामुळे श्वसन संस्थेचे कार्यही अधिक मजबूत होते.
- या आसना मुळे एकाग्रता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही वीरभद्रासन करण्याचा सल्ला दिला जातो.