आपल्या शरीरात एक अत्यंत महत्वाची क्रिया घडत असते. या क्रियेकडे मलायका अरोराने (Malika Arora) आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. शरीरातंर्गत महत्वाची क्रिया म्हणजे चयापचय क्रिया अर्थातच मेटाॅबाॅलिझम. मलायकाच्या मते आपण आपल्या दुर्लक्ष करण्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चयापचय (metabolism) क्रियेकडे दुर्लक्ष करतो. पण फिटनेस राखायचा तर या क्रियेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असं मलायका आपल्या पोस्टमधून सूचवते. या चयापचय क्रियेकडे लक्ष देण्यासाठी खास चयापचय क्रियेसाठीची म्हणून काही योगासनं (yoga for metabolism) करणं गरजेचं असल्याचं मलायका अरोरा सांगते.
चयापचय या क्रियेत दोन क्रियांचा समावेश असतो. त्यापैकी पहिली क्रिया म्हणजे अपचय . यात खाल्लेल्या अन्नातील अन्न घटकांचे म्हणजेच अन्नातील कर्बोदकं, प्रथीनं, मेद यांचे विभाजन होते. तर दुसऱ्या क्रियेत विभाजित झालेल्या अन्नघटकांद्वारे शरीराचं भरणपोषण होतं. या दुसऱ्या क्रियेसाठी ऊर्जेची आवश्यकता असते जी अन्नाद्वारे मिळते. जर आवश्यक ऊर्जेपेक्षा अधिक अन्नाचं सेवन केलं तर अन्नातील जास्तीच्या पोषक घटकांचे चरबीत रुपांतर होते. यामुळे वजन वाढतं आणि इतरही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. चयापचय क्रियेवरच केवळ वजनच नव्हे तर संपूर्ण आरोग्य अवलंबून असतं. म्हणूनच चयापचय क्रिया नीट चालणं महत्वाच. ही चयापचय क्रिया नीट चालण्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा. त्यातही मलायका म्हणते त्याप्रमाणे योगासनातील गरुडासन, त्रिकोणासन आणि मलासन ही तीन आसनं नियमित केल्यास चयापचय क्रियेचा वेग सुधारतो. चयापच्य क्रियेचा वेग सुधारला की आरोग्य सुदृढ राहातं, विकृती निर्माण होत नाही आणि वजनही कमी होतं आणि नियंत्रित राहातं. मलायका अरोरा चयापचय क्रियेसाठी सांगत असलेली तीन आसनं कशी करावीत या संबंधीचा मलायका अरोराचा व्हिडीओ सर्व योगा स्टुडियोने इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर केला आहे.
Image: Google
चयापचय बिघडल्यास..
शरीराची चयापचय क्रिया बिघडलेली असल्यास थकवा येतो, कोलेस्टेराॅल वाढतं, स्नायू कमजोर होतात, त्वचा कोरडी होते, वजन वाढतं, सांध्यांवर सूज येते. बिघडलेल्या चयापचय क्रियेचा परिणाम म्हणून मासिक पाळीशी निगडित समस्या निर्माण होतात, नैराश्य येतं, हदयाची धडधड वाढते. या सर्व समस्या टाळून चयापचय क्रिया सुदृढ राहाण्यासाठी चयापचय क्रिया सुदृढ करणारी 3 योगासनं नियमित करायला हवीत.
गरुडासन
गरुडासन केल्यानं मांड्या, खांडे, पाठ या अवयवांवर ताण निर्माण होतो. या अवयवांचे स्नायू मजबूत होतात. तसेच सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे चयापचय क्रिया सुधारते.
गरुडासन करण्यासाठी ताडासनात म्हणजे ताठ उभं राहावं. दोन्ही हात छातीच्या समोर पसरवून ते ताठ ठेवावेत. गुडघे वाकवून कुल्ले खाली आणावेत. डावा पाय उजव्या पायात गुंडाळावा. डाव्या पायाची टाच उजव्या पायावर ठेवावी. दोन्ही हात एकमेकात गुंफावेत. तळवे नमस्कार स्थितीत ठेवावेत. नजर समोर स्थिर ठेवावी. हे आसन करताना मंद श्वसन सुरु ठेवावं. 5 ते 10 सेकंद या आसनात राहावं. नंतर गुंफलेला पाय बाहेर काढावा. ताठ ऊभं राहावं. दोन्ही हात शरीराजवळ ताठ ठेवत आसन सोडावं. हेच आसन मग उजवा पाय डाव्या पायात गुंडाळून करावं.
Image: Google
त्रिकोणासन
त्रिकोणासन करण्यासाठी ताठ उभं राहावं. दोन्ही पायांच्या मध्ये साधारण साडेतीन ते चार फूट अंतर ठेवावं. उजवे पाऊल 90 अंशामध्ये तर डावे पाऊल 15 अंशामध्ये उजवीकडे फिरवावं. दोन्ही पायांच्या टाचा एका सरळ रेषेत हव्या. पावलांची जमिनीवर पकड घट्ट ठेवावी. शरीराचं वजन दोन्ही पायांवर समान ठेवावं. एक दीर्घ श्वास आत घ्यावा. श्वास सोडत कंबर सरळ ठेवत उजवीकडे झुकताना दोन्ही हात सरळ एका रेषेत ठेवावे. उजवा हात जमिनीकडे तर डावा हात हवेत सरल ठेवावा. कंबरेत न वाकता शक्य होईल अशा रीतीने उजवा हात उजव्या पायाच्या घोट्यावर किंवा जमिनीवर पायाजवळ टेकवावा. डावा हात खांद्यातून सरळ ठेवत छताकडे ठेवावा. नजर वर केलेल्या हाताच्या तळव्यावर ठेवावी. या आसनात असताना दीर्घश्वसन सुरु ठेवावं. मग श्वास सोडत सरळ उभं राहावं. दोन्ही हात शरीराजवळ आणि दोन्ही पाय जवळ आणत आसन सोडावं. मग हेच आसन डाव्या बाजूनं झुकत करावं.
Image: Divayoga
मलासन
पोटाच्या समस्या सोडवण्यास उपायकारक असं हे आसन आहे. मलासन करताना सर्वात आधी दोन्ही पायात अंतर ठेवून ताठ उभं राहावं. पोट आतमध्ये घेत दीर्घ श्वास घ्यावा. हात नमस्कार स्थितीत ठेवावेत. श्वास सोडत गुडघे वाकवून उकिडवे बसावं. जांघांमध्ये ताण येईल अशा पध्दतीनं दोन्ही पाय बाहेरच्या दिशेनं ताणून घ्यावेत. दोन्ही हातांचे कोपरे दोन्ही पायांच्या गुडघ्यांमध्ये बसवावे. या स्थितीत अर्धा ते एक मिनिटं राहून मग दीर्घ श्वास घेत उभं राहून, दोन्ही हात कमरेजवळ सर ठेवत आसन सोडवं.