आरोग्य उत्तम ठेवायंच तर नियमितपणे व्यायाम करायला हवा हे आपल्याला माहित आहे. यामध्ये अगदी सूर्यनमस्कारापासून ते चालणे, जिमला जाणे, योगा असे व्यायामाचे सगळेच प्रकार येतात. स्नायूंना बळकटी येण्यासाठी, हाडे चांगली राहण्यासाठी, खाल्लेले अन्न नीट पचण्यासाठी आणि एकूणच शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते. यासाठी आपण रोजच्या दिनक्रमातून खूप मुश्कीलीने वेळही काढतो. पण व्यायामाचा शरीराला योग्य पद्धतीने फायदा व्हावा असं वाटत असेल तर आपण करतो तो व्यायाम योग्य पद्धतीने करायला हवा. यासाठीच प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात. या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करायचा पाहूया (Know How Exercise to be Effective Fitness tips by Rujuta Divekar)...
४ महत्त्वाचे घटक
१. स्ट्रेंथ - ताकद
२. स्टॅमिना - सामर्थ्य
३. स्टॅबिलीटी - स्थिरता
४. स्ट्रेचिंग - लवचिकता
आपण करत असलेल्या व्यायामाच्या माध्यमातून एका आठवड्यात या चारही घटकांना चालना मिळायला हवी. दिवसभर आपण रिकव्हर करु शकू इतकीच चालना या माध्यमातून मिळायला हवी. त्यामुळे खूप जास्त व्यायामही नको आणि खूपच कमी व्यायामही नको. ताकद वाढवण्यासाठी जिमला जाणे किंवा घरात योग्य मार्गदर्शन घेऊन व्यायाम करणे गरजेचे असते. स्टॅमिना वाढण्यासाठी आपण सायकलिंग, चालणे, धावणे, जॉगिंग करणे असे व्यायाम करायला हवेत. स्ट्रेचिंग आणि स्टेबिलीटीसाठी योगा हा सर्वोत्तम व्यायामप्रकार आहे. मात्र या चारही गोष्टी एका आठवड्यात होतील याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
चांगले आरोग्य म्हणजे काय?
शरीरावर चरबी कमी प्रमाणात असेल आणि स्नायूंची ताकद आणि हाडांमधील ताकद चांगली असेल तर आपली तब्येत चांगली आहे असे आपण म्हणू शकतो. कारण वाढत्या वयानुसार स्नायू आणि हाडे कमकुवत होत जातात. वयानुसार आपल्याला डायबिटीस, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांसारख्या तक्रारी वाढत जातात यामागे हीच महत्त्वाची कारणे असतात. याचे महत्त्वाचे कारण स्नायूंची ताकद आणि हाडांची घनता कमी होत असल्यानेच या तक्रारी उद्भवतात. आता यासाठी नेमकं काय करायला हवं ते पाहूया...
१. लहान वयात जास्तीत जास्त अॅक्टीव्ह राहणे. तसेच आजुबाजूला लहान मुले असतील तर त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त बाहेर जाणे, स्विमिंग, सायकलिंग, धावणे, खेळणे अशा गोष्टी आवर्जून करायला हव्यात. लहान वयात आणि तारुण्यात तुम्ही जितके अॅक्टीव्ह असाल तितका वय वाढल्यावर तुम्हाला त्याचा फायदा होतो.
२. मुलींच्या बाबतीत त्यांना दिवसभर किती एनर्जेटीक वाटते, दिवसभराच्या सगळ्या गोष्टी त्या किती सहजपणे पूर्ण करु शकतात, मासिक पाळीच्या दिवसांत त्यांना काही त्रास होतो का या गोष्टींचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा. त्यादृष्टीने मुलींनी आहाराकडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा मुली उरलेले, शिळे किंवा बाहेरचे काहीतरी खातात, पण तसे करणे योग्य नाही. लक्ष देऊन शरीराला गरज आहे तेवढे अवश्य खायला हवे.
३. आता हे सगळे करत असताना व्यायाम किती करायचा असा प्रश्न आपल्यााल साहजिकच पडतो. तर आठवड्याला किमान १५० मिनीटे व्यायाम आवर्जून करायला हवा. म्हणजेच २.३० ते ३ तास व्यायाम नियमितपणे व्हायलाच हवा.
४. वय वाढलं तरी तुम्ही लवकर वयस्कर दिसू नये असे तुम्हाला वाटत असेल तर नियमितपणे किमान व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही कायम तरुण दिसण्यास मदत होईल. व्यायामामुळे हृदय, हार्मोन्स, हाडं आणि मेंदू सगळेच चांगले राहण्यास मदत होते, त्यामुळे व्यायामाला पर्याय नाही.