रोजच्या धावपळीत आपल्याला व्यायामाला अजिबात वेळ होत नाही. उत्तम आरोग्यासाठी सकाळी जीम किंवा योगा, अॅरोबिक्स असा काही व्यायाम करायला हवा असे आपल्याला वाटत असते. पण वेळेचे गणित काही केल्या जमून येत नाही आणि आपला व्यायाम मागे पडतो. काहीच व्यायाम नाही तर किमान चालायला तरी जायला हवे असा विचार आपल्या मनात येतो. पण चालणं हा व्यायाम नाही आणि त्याचा शरीराला काहीच उपयोग होत नाही असं आपण अनेकांकडून ऐकतो आणि मग चालणेही मागे पडते. पण प्रत्यक्षात चालणे हा अतिशय उत्तम व्यायाम असून आरोग्य उत्तम राहावं यासाठी चालणं हा अतिशय सोपा आणि उपयुक्त व्यायाम आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी चालण्याचे आरोग्याला होणारे फायदे सांगतात (Know How Walking is Useful for Healthy Lifestyle).
युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाच्या संशोधनानुसार, ज्या महिला आठवड्यातून ५ वेळा संथ गतीने चालतात त्यापेक्षा ३ वेळा वेगाने चालणाऱ्या स्त्रियांची पोटावरची चरबी पाच पट जास्त घटते. ही चरबी मधुमेह आणि हृदयविकारांसाठी जबाबदार असते. ती घटवण्यासाठी वेगवान वर्कआउट्ससह करणे आवश्यक असते. कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल आपल्या आरोग्यासाठी वरदान असते, चालणे हा त्याचाच एक भाग आहे. तसेच चालणे हा अतिशय सोप्या प्रकारचा व्यायाम असून चालण्याचे आरोग्याला होणारे फायदे पाहूयात..
१. बॉडी टोनिंग आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
ब्रिस्क वॉकींग केले तर १५० ते २०० कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. यामुळे पोटऱ्यांचा भाग, पाय आणि पोटाचा भाग कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर चढावर चालण्याचा जास्त फायदा होतो.
२. हृदयासाठी फायदेशीर
चालणे हा एकप्रकारचा कार्डीओ व्यायाम असल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ते फायदेशीर असते. तसेच गुड कोलेस्टेरॉल वाढावे यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. हायपरटेन्शन कमी होण्यासही याचा चांगला फायदा होतो. डायबिटीस नियंत्रणात राहण्यासही याचा चांगला उपयोग होतो.
३. मेमरी बुस्टींगसाठी उपयुक्त
चालण्याचा व्यायाम हा केवळ शरीरासाठी फायदेशीर नसतो. तर मानसिक आरोग्यासाठीही चालणे उपयुक्त असते. मेंदूचे कार्य शार्प राहावे, मेमरी फंक्शन चांगले राहावे यासाठी चालणे फायदेशीर असते.
४. सांधेदुखीवर उत्तम उपाय
वय वाढत जातं तसा आपल्याला सांधेदुखीचा त्रास होतो. पण चालण्याने सांध्यांमधील वंगण चांगले राहण्यास मदत होते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
५. एनर्जी बूस्टर
जेवल्यानंतर किंवा काम करताना, अभ्यास करताना मधे मधे चालल्यास त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. यामुळे आपली उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते. चालल्यामुळे एंडोर्फिन नावाचे हार्मोन स्त्रवते आणि त्यामुळे आपल्याला जास्त पॉझिटीव्ह वाटून ताण कमी होतो. तसेच झोप चांगले होण्यासही याचा चांगला उपयोग होतो.