उत्तम आरोग्यासाठीव्यायाम अतिशय गरजेची गोष्ट आहे हे आपल्या सगळ्यांना माहित असते. मात्र तरीही रोजच्या धावपळीत आपल्याला व्यायामाला अजिबात वेळ होत नाही. काहीतरी व्यायाम आपण करायला हवा हे कळत असते पण वेळेचे गणित काही केल्या जमून येत नाही आणि आपला व्यायाम मागे पडतो. काहीच व्यायाम नाही केली तर किमान चालायला तरी जायला हवे असा विचार आपल्या मनात येतो. पण चालणं हा व्यायाम नाही आणि त्याचा शरीराला काहीच उपयोग होत नाही असं आपण अनेकांकडून ऐकतो आणि मग चालणेही मागे पडते. पण प्रत्यक्षात चालणे हा अतिशय उत्तम व्यायाम असून आरोग्य उत्तम राहावं यासाठी चालणं हा अतिशय सोपा आणि उपयुक्त व्यायाम आहे. यासाठी कोणताही वेगळ्या प्रकारचा खर्च येत नाही. अगदी रस्त्याने, एखाद्या गार्डनमध्ये, मोकळ्या मैदानात असे आपण कुठेही चालायला जाऊ शकतो (Know What is Silent Walk and its Benefits).
कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल आपल्या आरोग्यासाठी वरदान असते, चालणे हा त्याचाच एक भाग आहे. तसेच चालणे हा अतिशय सोप्या प्रकारचा व्यायाम असून नियमित ३० ते ४० मिनीटे चालल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. एकदा लठ्ठपणा आटोक्यात आला की शुगर, बीपी, थायरॉईड यांसारख्या समस्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता असते. कोणत्या वेळेला चालावे, किती वेळ चालावे, कशा पद्धतीने चालावे असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. ब्रीस्क वॉकींग, रिव्हर्स वॉकींग असे चालण्याचे काही प्रकार आपल्याला माहित असतात. मात्र सायलेंट वॉकींग हे आपण ऐकले असेलच असे नाही. तर सायलेंट वॉकींग म्हणजे काय आणि त्याचे शरीराला नेमके काय फायदे होतात ते पाहूया...
सायलेंट वॉक म्हणजे काय?
सायलेंट वॉक म्हणजे कोणत्याही कृत्रिम आवाजाशिवाय चालणे. अनेकदा आपण चालताना कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकत चालतो. जीममध्ये आपण ट्रेडमिलवर चालत असलो तरी त्याठिकाणी मोठ्या आवाजात म्युझिक लावलेले असते. इतकेच नाही तर काही वेळा आपण मित्रमंडळींसोबत गप्पा मारत, व्हिडिओ पाहत चालतो. मात्र या चालण्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. कारण यामध्ये आपले लक्ष विचलित झालेले असते. नैसर्गिक अशा शांत ठिकाणी एकट्याने कोणत्याही आवाजाशिवाय चालण्याला यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. टिक टॉक स्टार मॅडी माओ याने एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर सायलेंट वॉकींग या संकल्पनेवर जोरदार चर्चा सुरू झाली.
१. ताणतणाव कमी होण्यास मदत
अनेकदा आपण दिवसभर नोकरी, कुटुंब, सामाजिक स्वरुपाचे, आर्थिक अशा विविध प्रकारच्या ताणांचा सामना करत असतो. फारच कमी वेळा आपल्याला आपला असा मोकळा वेळ मिळतो. पण एकट्याने चालायला गेलो तर आपल्याला एकांत मिळतो आणि त्यामुळे ताणतणाव दूर होण्यास निश्चितच मदत होते. एकटे चालणे मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते असे द नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हटले आहे.
२. मन शांत होण्यास मदत
एकटे चालल्याने आपण स्वत:ला अतिशय आनंदी ठेवू शकतो. शांतपणे चालणे हे एखाद्या ध्यानाप्रमाणे असते. त्यामुळे मनातून आपण शांत आणि फ्रेश फिल करतो. नकळत आपल्याला आनंदी वाटण्यास मदत होते. बाहेरचे आवाज वाढतात तेव्हा ताणतणाव वाढण्याची शक्यता असते. मात्र एकटे कोणत्याही आवाजाविना चालल्याने तणाव दूर होण्यास मदत होते आणि मन शांत होते.
३. चांगल्या पद्धतीने व्यायाम होतो
आपण एखादी गोष्ट करताना त्या गोष्टीकडे आपले पूर्ण लक्ष असेल तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. पण एकावेळी २ किंवा जास्त गोष्टी करत असू तर मात्र लक्ष विचलीत होण्याची शक्यता असते. कोणत्याही आवाजाशिवाय एकटे चालल्याने शरीराला या चालण्याचा जास्त चांगल्या प्रमाणात फायदा होतो आणि खऱ्या अर्थाने आपला व्यायाम होण्यास मदत होते