अगदी कमी वयातच हृदय विकाराचा झटका आल्याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात झालेला बदल, कामांचे बदललेले स्वरूप आणि वेळा, खाणापानाच्या सवयी यामुळे आपसूकच अनेक आजारांना निमंत्रण मिळते. यापैकीच एक चिंताजनक बाब म्हणजे हृदयविकारांना मिळालेले निमंत्रण. काही साध्या- सोप्या गोष्टींचे आपण पालन केले तर नक्कीच दिलकी धडकानोंको जवान रखना आसान है... म्हणूनच तर हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काही योगासने नियमितपणे केली पाहिजेत. कारण योगा केवळ वेटलॉससाठी नाही. योगा केल्यामुळे विविध अवयवांचे, इंद्रियांचे काम सुरळीत चालते आणि त्यामुळे आपण अधिकाधिक फिट होतो. काही योगासनांमुळे रक्ताभिसरण संस्थेचे कार्य सुधारते आणि त्यामुळे हृदय देखील अधिक कार्यक्षम होते.
१. सर्वांगासन
हृदयविकार कमी करण्यासाठी सर्वांगासन अतिशय उपयुक्त ठरते. हृदयाकडून सर्व शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो आणि सर्व अवयवांकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे येते. जेव्हा आपण कायम उभे असतो तेव्हा कंबर, पाय यांच्याकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे येण्यास खूप ताकद लागते. जेव्हा सर्वांगासनाची अवस्था आपण घेतो तेव्हा ही क्रिया अधिक वेगवान आणि उत्तम होते. शरीरातील सर्व पोकळ अवयवांना गुरुत्वाकर्षणाचा जो दाब सहन करावा लागतो, त्यासाठी लागणारी ताकद सर्वांगासनातून मिळते. मेंदूकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा होण्यासाठीही सर्वांगासन अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे नियमितपणे सर्वांगासन केले पाहिजे.
कसे करायचे सर्वांगासन?
- सर्वांगासन करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर सरळ पाठीवर झाेपावे. यानंतर कंबरेपासून पाय वर उचला. यानंतर दोन्ही हात कोपऱ्यात वाकव आणि तळहातांनी पाठीवर जोर देऊन पकडा. यानंतर पाठदेखील उचला आणि पाय सरळ रेषेत ठेवा. ही अवस्था ३० सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करावा.
२. वृक्षासन
अस्थिर, चंचल मनाला शांत करण्याचे काम वृक्षासन करते. वृक्षासनामुळे एकाग्रता साधता येते. मन एकाग्र आणि शांत असणे म्हणजेच हृदयाचे कार्य उत्तम असणे. शांत मनामुळे हृदय देखील निरोगी राहते. त्यामुळे नियमितपण वृक्षासन करून मन शांत आणि हृदय निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
कसे करायचे वृक्षासन?
- वृक्षासन करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. यानंतर उजवा पाय गुडघ्यातून वाकवा आणि पायाचा तळवा डाव्या पायाच्या जांघेजवळ ठेवा. दोन्ही हात सावकाश वर सरळ उचला आणि हातांचे तळवे एकमेकांना जोडा. मान सरळ आणि नजर समाेर केंद्रित करा. तीस सेकंद या अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करा. यानंतर असाच व्यायाम डाव्या उजव्या पायाने करा.
३. भुजंगासन
भुजंगासन म्हणजे एका अर्थाने सुर्यनमस्कारातली सहावी स्थिती. या आसनामुळे मेंदूतील शिथिलता दूर होते आणि कार्यक्षमता वाढते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी भुजंगासन अतिशय उपयुक्त मानले गेले आहे. तसेच छाती, फफ्फूस, हृदय आणि पाठीचा कणा यांचे आजार दूर करण्यासाठी भुजंगासन करण्याचा प्रयत्न केला जातो.
कसे करायचे भुजंगासन?
- भुजंगासन करण्यासाठी आधी जमिनीवर पोटावर झोपा. यानंतर दोन्ही हात कोपऱ्यात वाकवून छातीजवळ ठेवा. हाताचे तळवे जमिनीला टेकलेले हवे. यानंतर हळूहळू डोके, छाती आणि कंबरेचा काही भाग उचला. मान वर करा आणि छताकडे बघा. ही अवस्था १५ ते २० सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करावा.
४. गोमुखासन
गोमुखासन हे एक बैठक स्थितीत करण्याचे आसन आहे. या आसनामुळे फुफुसाची आणि हृदयाची शक्ती वाढते. या आसनामध्ये जालंदरबंध, उड्डीयानबंध , मूलबंध उत्तमप्रकारे लागले जातात. यामुळे सगळ्या शरीरातच प्राणवायूचा प्रवाह सुरळीत होतो आणि त्यामुळे मन शांत होऊन हृदय निरोगी बनते.
कसे करायचे गोमुखासन?
- सगळ्यात आधी पाय पसरून ताठ बसा. यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवून डाव्या टाचेला नितंबाच्या उजव्या बाजूखाली ठेवा. नंतर उजवा पाय वाकवा आणि उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर ठेवा. उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडी खाली घ्या.
- यानंतर डावा हात कोपरामध्ये वाकवून मानेखाली खांद्यांच्या मध्ये टेकवा. उजवा हात कोपरामध्ये वाकवून मागील बाजूने वर न्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफण्याचा प्रयत्न करा. डाेके, मान आणि पाठीचा कणा सरळ रेषेत ठेवा. ३० सेकंद ही आसन स्थिती टिकवून ठेवा.
५. वीरभद्रासन
रक्ताभिसरणाचे कार्य योग्य पद्धतीने होण्यासाठी वीरभद्रासन अतिशय उपयुक्त आहे. म्हणूनच हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी वीरभद्रासन करणे आवश्यक आहे.
कसे करायचे वीरभद्रासन?
वीरभद्रासन करण्यासाठी सगळ्यात आधी सरळ उभे रहा. यानंतर दोन्ही पायातले अंतर वाढवा. ६० अंशाचा कोण दोन्ही पायात होईल, एवढे अंतर ठेवा. यानंतर उजवा पाय गुडघ्यात वाकवा आणि दोन्ही हात दोन्ही बाजूला लांब करा. ही अवस्था ३० सेकंद टिकवून ठेवा. यानंतर असाच व्यायाम डाव्या पायाने करा.