तंदुरूस्त राहण्यासाठी कित्येक जण जिममध्ये जाऊन घाम गाळत आहेत. तरुण मंडळींमध्ये जिमची क्रेज जास्त पाहायला मिळते. तंदुरूस्त आणि आकर्षक दिसण्यासाठी काही लोकं प्रोटीन पावडरचे सेवन करतात. प्रोटीन पावडरचे सेवन केल्याने शरीराला योग्य आकार मिळतो. यासह शरीर तयार होण्यास मदत मिळते. प्रोटीन शेक आणि नियमित व्यायाम केल्याने रोगप्रतिकारशक्ती यासह स्नायू तयार करण्यास मदत होते. परंतु, ही प्रोटीन पावडर थोडी महाग असते. जी प्रत्येकाला घेणं परवडत नाही. त्यामुळे आपण ही प्रोटीन पावडर घरच्या घरी देखील बनवू शकता.
होममेड प्रोटीन पावडर बनवण्यासाठी लागणारं साहित्य
१ कप बदाम
१ कप अक्रोड
अर्धा कप शेंगदाणे
१/४ कप पिस्ता
१/४ कप काजू
२ चमचे कच्चे खरबूजाचे बिया
२ चमचे कच्च्या भोपळ्याच्या बिया
२ चमचे कच्च्या सूर्यफूलाचे बिया
२ चमचे फ्लेक्ससीड
२ चमचे चिया सिड्स
१/४ कप सुके खजूर
कृती
घरच्या घरी प्रोटीन पावडर बनवण्यासाठी, एक नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि मध्यम आचेवर बदाम भाजून घ्या, बदाम भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात अक्रोड, शेंगदाणे, पिस्ता, काजू, खरबूज, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि फ्लेक्ससीड्स देखील भाजून घ्या.आता मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर सुके खजूर घालून मिक्स करा. मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे सारण घेऊन वाटून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. पावडर रेडी झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या. अशाप्रकारे प्रोटीन पावडर रेडी.
प्रोटीन पावडरचा योग्य वापर
होममेड प्रोटीन पावडरपासून शेक करण्यासाठी सर्वप्रथम एका ग्लासमध्ये दूध घ्या. त्या दुधात ३ चमचे प्रोटीन पावडर मिक्स करा. पावडर दुधात चांगले मिक्स झाल्यानंतर प्यावे.
प्रोटीन शेक पिण्याचे फायदे
प्रोटीन शेक प्यायल्याने शरीरात प्रोटीनचे प्रमाण वाढते. व्यायामासह आपण प्रोटीन शेक पीत असाल तर याने शरीराला उत्तम गुणधर्म मिळतात. उच्च प्रथिने आहार वजन कमी करण्यास मदत करतात. कॅलरी-बर्न वाढवून तुमची चयापचय वाढवते. यासह पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.
प्रोटीन शेक कधी प्यावा
फिटनेस तज्ञांच्या मते, व्यायाम केल्यानंतर सुमारे १५ ते ६० मिनिटांनी प्रोटीन सप्लिमेंट घ्यावे. याने प्रोटीन पावडरमधील मुख्य पौष्टीक घटक शरीराला मिळतात.