बॉलीवूडची फिटनेस क्वीन म्हणून मलायका अरोराकडे पाहिले जाते. तिच्यासारखा फिटनेस आणि फिगर मिळविण्यासाठी लाखो युवतींची धडपड सुरू असते. त्यामुळेच तर मलायका आज फिटनेसविषयी काय सांगणार आहे किंवा तिने काय सांगितले आहे, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. मलायका कधी कोणते वर्कआऊट सांगते तर कधी योगा करण्याचे महत्त्व समजावून सांगते. इन्स्टाग्रामवर तिने नुकतीच एक पोस्ट टाकली असून यामध्ये तिने वृक्षासन करण्याची योग्य पद्धत कशी ते समजावून सांगितले आहे.
कसे करायचे वृक्षासन ?
- वृक्षासन हा स्ट्रेचिंगचा एक प्रकार आहे. यालाच इंग्रजीमध्ये ट्री पोज असे म्हंटले जाते. शरीराचे संतूलन राखण्यासाठी आणि एकाग्रता वाढविण्यासाठी वृक्षासन अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील नियमितपणे वृक्षासन करावे, असे सांगितले जाते.
- वृक्षासन करण्यासाठी सगळ्यात आधी दोन्ही पायांवर ताठ उभे रहा.
- यानंतर तुमचा उजवा पाय वर उचला आणि गुडघ्यातून वाकवा. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या जांघेजवळ लावा आणि तशीच अवस्था कायम ठेवा.
- डाव्या पायाने संपूर्ण शरीराचा तोल सावरून धरण्याचा प्रयत्न करा.
- तोल सावरणे शक्य झाल्यावर दोन्ही हात सरळ डोक्यावर घ्या आणि हातांचे तळवे एकमेकांवर जोडून नमस्कार करण्याची पोझ घ्या.
- समोरच्या बाजूवर एका ठिकाणी कुठेतरी लक्ष केंद्रित करा. यामुळे एका पायावर शरीराचा तोल सावरणे सोपे जाते. कमीतकमी ३० सेकंद या अवस्थेत उभे रहावे.
- यानंतर अशीच सर्व क्रिया डाव्या पायाने करावी आणि उजव्या पायावर शरीराचा तोल सावरून धरण्याचा प्रयत्न करावा.
- हे आसन करणे अतिशय सोपे आहे. फक्त ते टिकवून ठेवणे अतिशय अवघड आहे. तुमचे स्वत:वर जेवढे जास्त नियंत्रण असते, तेवढ्या जास्त वेळ तुम्ही हे आसन करू शकता.
वृक्षासन करण्याचे फायदे
- उर्जादायी आसन म्हणून वृक्षासन ओळखले जाते.
- शरीराचा समतोल राखण्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर ठरते.
- वृक्षासनामुळे एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे अतिचंचलतेमुळे अभ्यासात लक्ष न लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते.
- सायटीका आजार असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे वृक्षासन करावे.
- वृक्षासन केल्यामुळे पायांचे स्नायू मजबूत बनतात.
- वृक्षासन केल्यामुळे कंबर, मान, पाठ, पोट, हात या सगळ्याचाच आराम होतो.
- वृक्षासनामुळे श्वासोच्छवासाची क्षमता वाढते.
- शरीर सुडौल होण्यासाठी वृक्षासन फायद्याचे ठरते.
या लोकांनी करू नये वृक्षासन
- अर्धशिशी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी वृक्षासन करू नये.
- हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वृक्षासन करावे.