मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. कधी अर्जून कपूरसोबतच्या नात्यावरुन तर कधी तिच्या डाएटमुळे. फिटनेसच्या बाबतीत तर मलायका विशेष जागरुक असल्याचे दिसते. विशेष म्हणजे सोशल मीडिया अकाऊंटवरही ती फिटनेसविषयी सातत्याने काही ना काही अपडेट करत असते. आपल्या चाहत्यांनी आपल्यापासून प्रेरणा घेऊन फिटनेसच्या बाबतीत जागरुक व्हावे असे वाटत असल्याने ती सतत नवनवीन चॅलेंज, योगासने, व्यायामप्रकार यांबद्दल काही ना काही पोस्ट करते. दर आठवड्यात ती तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून एक फिटनेस मोटीव्हेशन (Workout Motivation) देत असते. नुकताच मलायकाने एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून त्यामध्ये ती आपल्या मैत्रीणीसोबत व्यायाम करताना दिसत आहे (Friendship Day). यामध्ये ती फ्लोअर एक्सरसाइज आणि खुर्चीच्या मदतीने करता येतील असे एक्सरसाइज करताना दिसते (Fitness Tips).
कॅप्शनमध्ये मलायका लिहीते, नवीन महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या शुभेच्छा. काल जगात अनेकांनी फ्रेंडशीप डे साजरा केला असला तरी हा दिवस रोज साजरा करण्यात कोणताही तोटा नाही. आपल्या योगा बेस्ट फ्रेंडसोबत वर्क आऊट करत आठवड्याची सुरुवात करण्यापेक्षा आणखी सुंदर काय असू शकते असंही ती म्हणते. मला मित्रमंडळींसोबत वर्कआऊट करायला खूप आवडतो कारण माझ्या मर्यादांपर्यंत पोहोचण्यासाठी ते मला कायम पुश करतात. अवघड व्यायमप्रकार आणि माझ्या योगा प्रॅक्टीसला सकारात्मक चालना देण्यास ते मदत करत असल्याने मी त्यांची कायम ऋणी आहे असेही मलायका पुढे म्हणत आपल्या व्यायामाला सोबत असणाऱ्या मित्रमंडळींचे आभार मानते.
त्यामुळे आज तुमच्या फिटनेस पार्टनरला या पोस्टच्या कमेंटमध्ये टॅग करा असेही मलायका म्हणते. सर्व योगा स्टुडीओलाही तिने यामध्ये टॅग केले असून एका दिवसात तिच्या पोस्टला ७३ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी मलायकाच्या फिटनेसचे कौतुक करत यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. याआधी मलायकाने घरच्याघरी योग्य पद्धतीने व्यायाम कसा करावा, त्याच्या ३ स्टेप्स कोणत्या याविषयी ती माहिती दिली होती. तसंच मलायकाने आपलं वर्कआऊट रुटीनही सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वीच मलायकाने एक छोटासा व्यायाम सांगत त्याचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्यायामामुळे मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी रिलॅक्स होण्यास मदत होत असल्याचेही मलायका यामध्ये म्हटली होती. हे आसन होतं मार्जारासन. पाठीच्या कण्याला आराम देण्यासाठी काय करावं याबद्दलही मलायकाने अतिशय उपयुक्त माहिती दिली होती. इतकंच नाही फिटनेससोबत बॉडी टोनिंगसाठी आपण काय करतो हेही तिने तिच्या चाहत्यांशी शेअर केले होते.