मलायका अरोरा आपल्या अभिनयापेक्षाही ओळखली जाते ती फिटनेससाठी. तिच्याबाबतीतला विषय कोणताही असो, चर्चा मात्र सुरु होते ती तिच्या फिटनेसला धरुनच. सोशल मीडियावर तर मलायका अरोरा म्हणजे फिटनेस गुरु झाली आहे. तिच्या डाएट टिप्स आणि व्यायामाचे व्हिडिओ पाहायाला नेटिझन्सना आवडतं. मलायकाने फिटनेसवरचा कोणता नवीन व्हिडिओ किंवा पोस्ट टाकली याकडे सगळ्यांचच लक्ष असतं. मलायकाचे व्हिडिओ बघून आपल्यालाही व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते असं महिला आणि मुली सांगतात.
Image: Google
मलायकाच्या नव्या फिटनेस पोस्टची वाट पाहाणाऱ्यांसाठी मलायकानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट एका आसनाबदलची माहिती देणारी आहे. पोस्टमधे मलायका जे आसन करत आहे त्याला परिवृत्त त्रिकोणासन असं म्हणतात. हे आसन पाहाताना जितकं सोपं वाटतं, प्रत्यक्ष करताना ते तितकंच आव्हनात्मक आहे. त्यातही हे आसन मलायकानं काठीच्या आधारानं केलं आहे. हे जरा आणखीनच अवघड आहे. पण ते कसं करावं हे ही मलायकानं आपल्या इन्स्टा पोस्टमधून सांगितलं आहे.
मलायका म्हणते, की त्रिकोणासन हे तिचं सर्वात आवडीचं आसन आहे. हे आसन आपण रोज करत असून या आसनानं शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चांगले लाभ होतात.
Image: Google
परिवृत्त त्रिकोणासन कसं करणार?
मलायकानं सांगितलेलं परिवृत्त त्रिकोणासन करण्यासाठी आधी ताडासनात सरळ उभं राहावं. दीर्घ श्वास घेत दोन्ही पायात बरंच म्हणजे किमान अडीच फुटांचं तरी अंतर असावं. डावं पाऊल बाहेरच्या बाजूने आडवं ठेवावं आणि उजवं पाऊल समोर सरळ रेषेत ठेवावं . मग डावा हात डोक्याच्या वर, कानाला चिकटवून सरळ वर न्यावा आणि गुडघे न वाकवता खाली वाकून उजवा हात हा डाव्या पावलाच्या बाजूला जमिनीला टेकवावा. नजर सरळ वर डाव्या हाताच्या मधल्या बोटावर स्थिर ठेवावी. या स्थितीत एक मिनिट राहिल्यावर श्वास सोडत सरळ उभं राहावं. दोन्ही पायात अंतर ठेवून अर्धा मिनिट उभं राहिलं की मग हेच आसन दुसऱ्या बाजूने झुकून डावा हात उजव्या पावलाच्या जवळ जमिनीवर ताठ ठेवावा आणि नजर वरच्या बाजूने ताठ ठेवलेल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर स्थिर ठेवावी. या स्थितीत एक मिनिट राहिल्यावर श्वास सोडत आसन सावकाश सोडावं.
Image: Google
आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक सवयी अशा असतात की ज्या शरीरास आणि आरोग्यास त्रासदायक असतात. यापासून शरीर सुरक्षित ठेवायचं असेल तर व्यायाम , योगसाधना ही खूप महत्त्वाची आहे. चुकीच्या उठण्या बसण्याच्या पध्दतीने उद्भवणारे पाठीचे, कमरेचे आजार या परिवृत्त त्रिकोणासनाने रोखता येतात.
हे आसन करताना मान/ गुडघा किंवा पाठीच्या हाडासंबंधी काही समस्या जाणवत असेल तर हे आसन करण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. हात, पाय, खांदा यांच्या स्नायुंमधे जर वेदना होत असतील तर हे आसन करु नये. परिवृत्त आसन करताना ही एवढी काळजी घेतली तर या आसनामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यास फायदे होतात. हे आसन करणं अंगवळणी पडेपर्यंत जरा भिंतीचा आधार घेऊन करावं. सराव झाला की मोकळ्या जागेत करावं.
Image: Google
परिवृत्त आसन करण्याचे फायदे
1. परिवृत्त आसन करताना संपूर्ण शरीराला पीळ पडतो त्यामुळे आपलं शरीर लवचिक होण्यासाठी हे आसन रोज करणं हे फायदेशीर असतं असं फिटनेस तज्ज्ञ म्हणतात.
2. या आसनानं पाठीच कण्याची गोलाकार हालचाल होते. पाठीचा कणा लवचिक राहाण्यासाठी, ताठ राहाण्यासाठी म्हणून या आसनातील ही हालचाल महत्त्वाची असते.
3. परिवृत्त आसन करताना जास्त ताण मांड्यांवर पडतो. या ताणाने मांड्यांचे स्नायू बळकट होतात.
4. या आसनाने कमरेतही पीळ पडतो. त्याचा फायदा पचनसंस्थेला होतो. पचनक्रिया सुलभ होण्यासाठी परिवृत्त त्रिकोणासन महत्त्वाचे ठरते.
5. कंबर, पोट याला पडणारा पीळ हेच या आसनाचं वैशिष्ट्य आहे. यामुळे आतील इंद्रियांना व्यायामाद्वारे चांगला मसाज मिळतो. तसेच पोटाचे स्नायू बळकट होण्यासाठी ( कोअर बाॅडी मसल) या आसनाचा खूप उपयोग होतो.
6. पाठीत वाक आला असेल किंवा खांदे झुकलेले असतील तर ते ताठ करण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरतं.
7. छातीचं आंकुचन झालं असल्यास छाती प्रसरण पावण्यास तसेच फुप्फुसाची श्वसनक्रिया चांगली होण्यास हे आसन मदत करतं.
8. परिवृत्त त्रिकोणासन केल्याने मनाची एकाग्रता वाढते. मन शांत होतं. कामात चित्त एकाग्र करण्यासाठी हे आसन उपयोगी ठरतं.