चटपटीत चिवडा, खुसखुशीत शेव आणि चकली, साजूक तुपात केलेले लाडू, खुमासदार शंकरपाळे असा दिवाळीचा फराळ समोर आला की तोंडावर आणि जिभेवर कसलाच ताबा राहत नाही. किती आणि काय खाऊ असं होऊन जातं. यामध्ये मग मित्रमंडळींचा आणि नातेवाईकांचा आग्रह पण असतोच. या आग्रहाला आणि समोर दिसणाऱ्या चवदार फराळाला आपण बळी पडतो आणि दिवाली है.... असं म्हणत आपण पण मग खाण्यापिण्याचे सगळे निर्बंध झुगारून देतो आणि फराळाचा मनमुराद आनंद लुटतो. असं हे जे काय आपण दिवाळीत केलेलं असतं, ते सगळं आपल्या शरीरावर मग दिसायला सुरुवात होते.
म्हणूनच तर बॉलीवूड स्टार मलायका अरोराने या आठवड्यासाठी तिचा फिटनेस फंडा शेअर करताना या समस्येवरचा उपाय सांगितला आहे. ती म्हणजे की दिवाळीत शरीरावर साचलेली एक्स्ट्रा चरबी बर्न करायची असेल, तर पश्चिमोत्तानासन करून बघा.
कसे करायचे पश्चिमोत्तानासन?
पश्चिमोत्तानासन हे एक बैठ्या प्रकारातील आसन आहे. हे आसन करायला थोडे अवघड जरूर आहे. पण आसनस्थिती आणण्याचा प्रयत्न केला तरी शरीराला अनेक लाभ होतात. पश्चिमोत्तानासन करण्यासाठी सर्वप्रथम पाय लांबवून ताठ बसा. हळूहळू कंबरेतून वाकण्याचा आणि दोन्ही हाताने दोन्ही पायांचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा. ही कृती करताना पाय गुडघ्यात वाकले जाणार नाहीत, याची काळजी घ्या. ही आसनस्थिती जमणे थोडे अवघड आहे. त्यामुळे सुरुवातीला पायाचे अंगठे नाही पकडता आले तर घोटे पकडण्याचा प्रयत्न करा. यानंतर कपाळ गुडघ्यावर टेकवा. ही आसनस्थिती १० ते १५ सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करा.
पश्चिमोत्तानासन करण्याचे फायदे
- पोट, पाठ, मांड्या आणि पोटऱ्या या भागावरील चरबी कमी करण्यासाठी पश्चिमोत्तानासन करणे अतिशय फायद्याचे ठरते.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे पचनशक्ती सुधारते.
- पित्ताशय, जठर आणि मुत्राशयाचा व्यायाम होतो.
- मानेपासून ते पायाच्या घोट्यापर्यंत सगळ्याच अवयवांच्या स्नायुंना बळकटी देणारे हे आसन आहे.
- मन शांत होऊन एकाग्रता वाढण्यासाठी या आसनाची मदत होते.
- मासिक पाळीसंदर्भातील तक्रारी दूर होण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरते.