Join us  

त्या 'चार दिवसात'ही केला व्यायाम! सारा अली खानची पोस्ट; पिरिएडस सुरु असताना करावा का व्यायाम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 4:48 PM

Menstruation Fitness: मासिक पाळीत व्यायाम केला तर पाळीत जास्त त्रास होईल, थकवा येईल या भीतीने व्यायाम केला जात नाही. पण मासिक पाळीत व्यायाम करण्याबाबत काही शंका असेल तर अभिनेत्री सारा अली खाननं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ नक्की पाहा आणि तज्ज्ञ काय म्हणतात ते आवर्जून वाचा!

ठळक मुद्देतज्ज्ञ म्हणतात पाळीत व्यायाम करणं हे अयोग्य नसून योग्य आहे.मासिक पाळीत व्यायाम करणं जेवढं गरजेचं आहे तितकाच योग्य व्यायाम करणंही आवश्यक आहे.पाळीत विशिष्ट प्रकारचा व्यायाम केला तरच शरीर- मनाला फायदा मिळून त्याचा उपयोग पाळीतील समस्या कमी करण्यास होतो.

फिट राहाण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. फिटनेस फ्रिक असणारे न चुकता व्यायाम करतात हे खरं. पण पाळीचे चार दिवस मात्र व्यायाम करायचा नाही म्हणून महिन्यातले चार दिवस आपल्या नियमित व्यायामामधे खंड पाडतात. पण या दरम्यान व्यायाम करत नसल्यामुळे मनात एक अपराधी भाव असतो, मूडही डाऊन असतो, शरीर जरा जड असतं. मासिक पाळीत व्यायाम केला तर पाळीत जास्त त्रास होईल, थकवा येईल या भीतीने व्यायाम केला जात नाही. पण मासिक पाळीत व्यायाम करण्याबाबत काही शंका असेल तर अभिनेत्री सारा अली खाननं आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ नक्की पाहा.

Image: Google

या व्हिडीओत सारा अली खान व्यायाम करण्याआधी काही बोलते. जे बोलते ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ती म्हणते , ‘आज सकाळी मी उठले तेव्हा कंटाळा आलेला होता, शरीर जडावलेलं होतं, पोट फुगल्यासारखं वाटत होतं, थकवाही आलेला होता. कारण माझी पाळी सुरु आहे. पण पाळीतला त्रास टाळण्यासाठी थकवा आणि कंटाळा बाजूला ठेवून मी जिम गाठली. जिममधे व्यायाम केल्यावर शारीरिक आणि मानसिक पातळीवर छान वाटतं. मी एक कणखर महिला आहे’ ! हे सांगितल्यावर सारा व्यायाम करते. तिचा हा व्हिडीओ नक्कीच प्रेरणादायी आहे. तिच्या या व्हिडीओमुळे मासिक पाळी सुरु असताना व्यायाम करावा का? असा प्रश्न पडलेल्यांच्या शंका नक्की दूर होतील.

पाळीत व्यायाम करावा हे योग्य आहे. कारण पाळीत थकवा येणं, पोटात दुखणं, कळा येणं, मूड सतत बदलत राहाणं हे त्रास होत असतात. या त्रासांवर मात करण्यासाठी, या त्रासांची तीव्रता कमी करण्यासाठी पाळी असतानाही व्यायाम करणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञ म्हणतात. पाळीत विशिष्ट प्रकारचा व्यायाम केला तरच शरीर- मनाला फायदा मिळून त्याचा उपयोग पाळीतील समस्या कमी करण्यास होतो. पण चुकीचा व्यायाम केल्यास मात्र त्रास होवू शकतो. त्यामुळे मासिक पाळी सुरु असताना कोणता व्यायाम करावा हे समजून घेणं आवश्यक आहे.

Image: Google

मासिक पाळीत व्यायाम

  ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ यांनी याबाबत केलेला एक अभ्यास सांगतो, की मासिक पाळीत महिला आणि मुलींच्या शरीरात वेगवेगळे हार्मोनल बदल होतात. या हार्मोनल बदलांमुळे विशिष्ट प्रकारचे त्रासही होतात. हे त्रास कमी करण्यासाठी पाळीत व्यायाम करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. पाळीत केलेला योग्य व्यायाम संप्रेरकांचा तोल सांभाळला जातो. व्यायाम करण्यामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचं ( फील गुड हार्मोन) वाढतं. व्यायामामुळे वाढणारं एंडोर्फिन हे डोपामाइन निर्माण करण्यास मदत करतं. डोपमाइन हे देखील एक हॅपी हार्मोन आहे. यामुळे मासिक पाळीत होणारी चिडचिड कमी होते आणि पोटातल्या वेदनाही कमी होतात. मासिक पाळीत व्यायाम करणं जेवढं गरजेचं आहे तितकाच योग्य व्यायाम करणंही आवश्यक आहे.

Image: Google

मासिक पाळीत कोणता व्यायाम करावा?

1. हलका फुलका योग

मासिक पाळी सुरु असताना योगचा सराव केल्यास सर्वात आधी मनावर परिणाम होतो. मूड चांगला होतो. मूड चांगला झाला की शरीरातील वेदनाही कमी होतात. कारण योगच्या सरावात स्ट्रेचिंग आणि श्वासाच्या व्यायामाचा समावेश असतो. योग करताना शांत बसून दीर्घ श्वसन केल्यास मानसिक पातळीवर आराम मिळतो. तसेच योगसाधनेत स्ट्रेचिंग हा महत्त्वाचा व्यायाम आहे. या स्ट्रेचिंगमुळे शरीरातील वेदना कमी होतात. तसेच शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

2. चालायला जाणं

मासिक पाळी सुरु असताना व्यायाम करणं योग्यही आहे आवश्यकही. पण अनेकींना या काळात व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. तेव्हा त्यांनी व्यायाम म्हणून व्यायाम न करता पाय मोकळे करण्याच्या निमित्ताने बाहेर, जॉगिंग ट्रॅकवर जावं. बाहेर जाऊन चालल्याने शरीरातील कॅलरीज कमी होतात. तसेच चालून आल्यानंतर आपला मूडही सुधारतो.

Image: Google

3. स्ट्रेचिंग

पाळीमुळे शरीरात विशेषत: पोटात, कमरेत, पायांच्या स्नायुत वेदना असतील तर स्ट्रेचिंगचे प्रकार करावेत. स्ट्रेचिंग केल्यानं शरीरातील वेदन कमी होतात. बाहेर पार्कमधे किंवा घरी बसल्या बसल्याही स्ट्रेचिंगचे व्यायाम करता येतात. स्ट्रेचिंग करताना दीर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा. यामुळे शरीराला आराम मिळतो.

4. नृत्य करणे

नृत्याकडे केवळ कला या दृष्टीनं पाहिलं जात नसून नृत्य हा उत्तम व्यायाम आहे हे शास्त्रज्ञ सांगतात. पाळीतल्या शारीरिक मानसिक त्रासांसाठी नृत्य हे एक औषधही ठरतं. नृत्य करतान शरीराच्या विशिष्ट हालचालींमुळे मासिक पाळीत शरीराला आलेला जडपणा निघून जातो. हलकं-हलकं वाटतं. मासिक पाळीत नृत्य केल्यानं मूडही छान होतो.

टॅग्स :व्यायाममासिक पाळी आणि आरोग्य