वेगवेगळ्या व्यायाम प्रकारातून शरीरास विविध फायदे मिळतात. काही व्यायाम प्रकार शरीरातील विशिष्ट अवयवांना व्यायाम देतात तर काही व्यायाम प्रकार केल्यानं संपूर्ण शरीरासोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. त्यातलाच प्लॅन्क हा व्यायाम प्रकार.
या प्लॅन्कबाबत चर्चा सुरु आहे ती मीरा राजपूत हिची इन्स्टाग्रामवरची पोस्ट बघून . या इन्स्टाग्रामवरील फोटोत मीरा राजपूत प्लॅन्क करताना दिसते. मीरा राजपूत अतिशय फिटनेस फ्रिक असून ती सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या वर्कआउटबद्दलचे फोटो आणि पोस्ट टाकत असते. मीरा राजपूतचे प्लॅन्क करतानाचे फोटो पाहून फिटनेसची आवड असणार्यांमधे उत्सुकता निर्माण झाली. हे प्लॅन्क कसे करतात त्याचे फायदे काय याबाबतची शोधाशोध सुरु झाली. ही उत्सुकता शमवण्यासाठी प्लॅन्क बद्दलची ही सविस्तर माहिती.
Image: Google
व्यायामाच्या बाबतीत कोणत्याही व्यायाम प्रकाराचे फायदे आधी बघितले जातात. पण फायदे बघण्याआधी त्याचं तंत्र जर नीट शिकून घेतलं तर त्याचे फायदे नक्कीच मिळतात. त्यामुळे फिटनेस तज्ज्ञ कोणत्याही व्यायाम प्रकाराकडे बघताना तंत्राकडे विशेष लक्ष देण्यास सांगतात.
Image: Google
प्लॅन्क कसे करायचे?
मीरा राजपूतचे प्लॅन्क करतानाचे फोटो पाहून हा व्यायाम प्रकार करायला अगदी सहज वाटतो. पण हा व्यायाम प्रकार दिसतो तसा सहज नाही. हा व्यायाम प्रकार कष्टाचा असला तरी तो खूप फायदेशीर आहे. प्लॅन्क करताना स्नायुंना ताकद मिळते. शरीराला शेप मिळतो तसेच या व्यायामानं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
* प्लॅन्क करताना सर्वात आधी पुशअप स्थितीत यावं. हाताचे कोपर 90 अंशात मुडपावे.
* प्लॅन्क करताना आपलं संपूर्ण वजन हाताच्या मनगट ते कोपर या भागावर येतं.
* प्लॅन्क करताना शरीर एका सरळ रेषेत ताठ ठेवावं. कंबर किंवा पाठीचा कणा खाली कललेला नको.
* शरीर एका सरळ रेषेत ताठ ठेवून डोकं जमिनीच्या दिशेनं झुकवावं.
* प्लॅन्क या व्यायाम प्रकारात तुम्ही किती काळ ही स्थिती धरुन ठेवता याला महत्त्व असतं. पण झेपेल तितका वेळ या स्थितीत राहावं. या स्थितीत असताना श्वसनक्रिया मंदपणे चालू ठेवावी.
* प्लॅन्कच्या स्थितीतून बाहेर पडताना हळुवारपणे शरीर जमिनीला टेकवावं.
* प्लॅन्कचे अनेक सेट करायचे असल्यास प्रत्येके प्लॅन्कमधे काही सेकंदाचं अंतर ठेवावं
Image: Google
प्लॅन्कचे फायदे
1.प्लॅन्कमुळे छाती आणि पोटाचे स्नायू बळकट होतात . प्लॅन्कचा सर्वात जास्त परिणाम पोटाच्या स्नायुंवर होतो. प्लॅन्क करण्यात सातत्य असेल तर पोटावरची चरबी कमी होते. प्लॅन्कमुळे वजन कमी होतं तसेच शरीरातील उष्मांकही जळतात. प्लॅन्क फक्त पोट, पाठ, छातीचे स्नायूच नाही तर हात आणि पायांच्या स्नायुवरही काम करतो. त्याचा परिणाम म्हणजे या व्यायाम प्रकारानं केवळ पोटाचीच चरबी कमी होत नाही तर संपूर्ण शरीरावरचे फॅटस कमी होतात. प्लॅन्क रोज एक मिनिटं तीन वेळा केल्यास त्याचा चांगला परिणाम होतो.
2. प्लॅन्क केल्याने पाय, हात, पाठीचा कणा सोबतच संपूर्ण शरीराच्या स्नायुंना ताकत मिळते. या व्यायामानं शरीर संतुलित ठेवायला मदत होते. प्लॅन्क केल्यानं स्नायुंना मिळालेल्या ताकदीचा उपयोग इतर व्यायाम प्रकार करायलाही होतो.
3. फिटनेस तज्ज्ञ सांगतात की, प्लॅन्क स्थितीत असताना मेंदुमधे एंडोर्फिन नावाचं संप्रेरकं स्रवतं. या संप्रेरकामुळे मूड सुधारतो आणि आनंद वाटतो. त्यामुळेच मनावरचं दडपण दूर करण्यासाठी प्लॅन्कची मदत होते. मनासोबतच संपूर्ण शरीरावरचा ताण घालवण्याची क्षमता या व्यायाम प्रकारात आहे.
Image: Google
4. हल्ली एका जागी बसून काम करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याचा परिणाम शरीराच्या ठेवणीवर होतो. पाठीला वाक येतो त्यामुळे ठेवण बिघडते. पण शरीराची ठेवण सुधारण्यासाठी प्लॅन्क हा उत्तम व्यायाम आहे. शरीराला कुठे जखम झाली असेल तर तो भाग आखडतो त्याचाही परिणाम शरीराच्या ठेवणीवर होतो. ह परिणाम घालवण्यासाठी प्लॅन्क मदत करतात. शरीराची ठेवण योग्य असेल, शरीर जर कमरेत , पाठीत वाकलेलं नसेल तर कंबरदुखीसारख्या समस्याही दूर होतात. प्लॅन्क नियमित केल्यास पाठीच्या कण्यावरील अनावश्यक ताण निघून जातो.
5. शरीर जेव्हा प्लॅन्कच्या स्थितीत असतं तेव्हा आपलं शरीर हाडांमधे नवीन पेशींची निर्मिती करतं. त्याचा परिणाम म्हणजे हाडं मजबूत होतात, सुरक्षित राहातात. प्लॅन्क केल्यानं सांध्यांमधील रक्तस्त्राव सुधारतो. त्याचा फायदा वाढत्या वयात होतो. पुढे जाऊन सांधे दुखीचा त्रास वाचवायचा असेल तर प्लॅन्क करणं गरजेचं आहे.
6. प्लॅन्क केल्यानं शरीर लवचिक होतं. शरीराच्या मागील भागाच्या अवयवांच्या स्नायुंची लवचिकता वाढते. प्लॅन्क करताना, मनगट, कोपरा, छाती, पोट, पाठ, पाय, पाऊलं, मांड्या यावर जितका जास्त तणाव येतो तितके तेथील स्नायू लवचिक होतात.