Join us  

मूड गेलाय?  चिडचिड झालीय? -चालायला लागा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 4:42 PM

खरंच मूड गेला, चिडचिड झाली की चालून यावं, बरं वाटू शकतं. ट्राय कर के देखो.   

ठळक मुद्देनिदान मूड रिपेअर करण्यासाठी तरी आपण व्यायाम करूच शकतो.

-गौरी पटवर्धन

आपल्याला सगळ्याच जणींना कधी ना कधी उगीचच उदास वाटतं. कधीतरी उगीचच डोळ्यात पाणी येतं. आपण ही मनावर आलेली मरगळ झटकून टाकू शकतो. पण काही वेळा असं होतं, की काहीही केलं तरी उदासच वाटत राहतं. आपण ती उदासी घालवण्यासाठी आपले नेहेमीचे हुकमी इलाज करून बघतो. आल्याचा चहा किंवा कॉफी पितो, टीव्ही बघतो, पुस्तक वाचतो, मैत्रिणीला/मित्राला फोन करून त्यांच्याशी उगाच निरर्थक गप्पा मारतो. पण आपला मूड काही केल्या ताळ्यावर येत नाही. आपल्या आयुष्यातले आनंद आपल्यालाच सापडेनासे होतात. काहीच आपल्या मनासारखं होत नाहीये असं वाटायला लागतं. सगळं जग आपल्याला त्रास देतंय असं वाटायला लागतं. आणि असंच काय काय  वाईट वाटायला लागतं आणि वाटतच राहतं. आपल्याला समजत असतं की हे विचार योग्य नाहीत, पण आपले विचार आपलं ऐकेनासे होतात. मग आपण नवऱ्यावर राग काढतो, मुलांवर चिडचिड करतो, आईवडिलांवर करवादतो, भावाबहिणींशी भांडतो, मित्रमैत्रिणींचे फोन कट करून टाकतो, फेसबुकवर इतर लोकांच्या भिंतीवर जाऊन जाऊन चिडून बोलतो… आणि या सगळ्यामुळे होतं काय? तर आपल्याला अजूनच जास्त वाईट वाटायला लागतं आणि या सगळ्याचं काय? करायचं ते कळत नाहीच.

आता असं म्हंटलं की, असं काही वाटू लागलं की एक छोटा उपाय म्हणून व्यायाम करायला लागू..

आता हे वाचून तर आधी अनेकींना हसूच येईल की, चिडचिड होण्याचा आणि उदास वाटण्याचा व्यायाम करण्याशी काय संबंध?

तर त्याचं उत्तर हेच की, करुन पहा. उदास, चिडचिड वाटण्याच्या सुरुवातीलाच करून बघण्याचा प्रथमोपचार म्हणजे व्यायाम. कोणी म्हणेल की असं तर आपल्याला केव्हाही वाटू शकतं. समजा रात्री अकरा वाजता असं काहीतरी वाटायला लागलं तर काय? रात्री अकरा वाजता जिममध्ये जाऊन वजनं उचलायची की का? तर अर्थातच नाही.

पण आपण सगळ्यात सोपा, कधीही कुठेही करण्यासारखा व्यायाम करू शकतो तो म्हणजे चालणं. पायात व्यायामाचे बूट घाला, किंवा तुम्हाला सोयीचं वाटत असेल तर चपला, फ्लोटर्स काहीही घाला, घराबाहेर पडा आणि चांगली वीस मिनिटं कुठेतरी चालत जाऊन या. बाजारात जा, मैदानात जा, सोसायटीच्या आवारात जा, गच्चीत जा… कुठेही जा, पण चांगला दम लागेपर्यंत आणि घाम येईपर्यंत चाला. मूड जाण्याचा प्रथमोपचार म्हणून हे नक्की करून बघा. बहुतेक वेळेला त्याचा उपयोग होतो आणि मूड सुधारतो.

व्यायाम केल्याने शरीर सुदृढ होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, पण आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात येत नाही. व्यायाम केल्याने शरीराबरोबर आपलं मनही सुदृढ होतं. आपण जेव्हा व्यायाम करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आत काही हार्मोन्स स्रवतात. ही हार्मोन्स आपल्या मनाला उत्तेजित आणि प्रफुल्लित करतात. आपल्या मेंदूतील काही भाग असे असतात जे जागृत किंवा ऍक्टिव्ह असतील तर आपल्याला प्रसन्न वाटतं. व्यायाम केल्याने मेंदूचे असे भाग जागृत होतात. त्यामुळे व्यायाम केल्याने मूड सुधारतो.

कारण आपलं शरीर आणि मन यांचा काही बाबतीत फार जवळचा संबंध असतो. त्यामुळेच शरीर सुदृढ असणं आणि मन सुदृढ असणं याही बाबी एकमेकांशी निगडित असतात. अर्थात ज्यांना मानसिक आजार असतात त्यांना त्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरचेच उपचार गरजेचे असतात. पण निदान मूड रिपेअर करण्यासाठी तरी आपण व्यायाम करूच शकतो. करुन तर पाहू...  बाकी काही नाही तर चालायला तर लागू!

टॅग्स :फिटनेस टिप्स