आई झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं. बाळसोबत अख्खं घर सांभाळणं, घरातल्या जबाबदार्या पार पाडणं यामधे ती अटकून जाते. इतकी की स्वत:ला वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे याचाच विसर पडतो. म्हणून कोणत्याही स्त्रीसाठी आई होणं ही सोपी गोष्ट नाही. अतिशय थकवणारी, शरीरातला कस संपवणारी ही जबाबदारी आहे.
आई झाल्यानंतर अनेक स्त्रियांचं वजन वाढतं, चेहेर्यावरचं तेज हरवतं, त्या सतत थकलेल्या दिसतात. यावरच उपाय डॉक्टरांच्या गोळ्या औषधांमधे नसून स्वत:ला थोडा वेळ देण्यातून सापडेल. हा वेळ देणं म्हणजे नेमकं काय ?
तर अभिनेत्री मलायका अरोरा म्हणते की, रोजच्या कामाच्या गर्दीतून स्वत:साठी किमान अर्धा तास काढा. या अर्धा तासात मलायका महिलांना योगसाधनेतील तीन आसनं करण्याचा सल्ला देते. मलायका म्हणते, की आई होणं काय असतं हे मी स्वत: अनुभवलेलं आहे, पण आईपणाची जबाबदारी निभावताना शरीर आणि मनाची होणारी ओढाताण आणि त्यातून जाणवणार्या समस्या यावर एक उपाय मी स्वत: करुन पाहिला. तो म्हणजे योगासनांचा. योग साधनेतील वृक्षासन, त्रिकोणासन आणि उत्कटासन ही तीन आसनं आई झालेल्या प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाची आहे. ही आसनं नियमित केल्यानं त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप चांगला परिणामआई होणं म्हणजे स्वत:ला विसरणं नव्हे. उलट स्वत:च्या आरोग्याचं महत्त्व जाणून त्याकडे लक्ष दिलं तर प्रत्येक स्त्री सर्व नात्यातल्या आपल्या जबाबदार्या उत्तम पार पाडू शकेल.
वृक्षासन
छायाचित्र- गुगल
मलायका अरोरा म्हणते की नियमित वृक्षासन केल्यास शरीराची ठेवण आणि तोल यांच्यात सुधारणा होते. वृक्षासनामुळे शरीरासोबतच मानसिक पातळीवरही लाभ होतात.वृक्षासन करताना सरळ ताठ उभं राहावं. आपला डावा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या पायाचा तळवा उजव्या गुडघ्यावर ठेवावा. दोन्ही हात कानाला जोडून ताठ करावेत. दोन्ही हात एकमेकांना जोडून नमस्कार स्थितीत ठेवावेत.वर ताणावेत. या स्थितीत दीर्घ श्वसन करावं. या स्थितीत शरीराचा तोल सांभाळावा. या स्थितीत कमाल एक किमान अर्धा मिनिट तरी राहावं. तोल ढळायला लागला की पुन्हा सरळ उभं राहावं आणि तीच क्रिया उजव्या पायानं करावी.
त्रिकोणासन
छायाचित्र- गुगल
त्रिकोणासन हे आसन स्तनपान करणार्या महिलांसाठी फायदेशीर आहे. या आसनामुळे पाठीचे हाड मजबूत होतं.हे आसन करताना आधी ताठ उभं राहावं. दोन्ही पाय कमरेच्या प्रमाणात किंवा त्यापेक्षा थोडे जास्त लांब ठेवावेत. डाव्या पायाचा पंज आडव्या स्थितीत ठेवावा. नंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आडवे पसरावेत. श्वास सोडत, कमरेत वाकत डाव्या हाताने डाव्या पायाच्या टाचेला स्पर्श करावा. दुसरा हात वर ताठ करावा. आणि डोकं वर केलेल्या हाताच्या रेषेत ठेवावं. काही सेकंद या स्थितीत राहिल्यावर श्वास घेत वर उठावं. आणि हीच क्रिया दुसर्या बाजूने करावी.
उत्कटासन
छायाचित्र- गुगल
बाळांतपणानंतर अनेक महिलांना कंबर दुखीचा त्रास सुरु होतो. उत्कटासन हे आसन प्रामुख्याने महिलांच्या कंबरेसाठी उत्तम व्यायाम आहे. या आसनामुळे कंबरेसोबतच संपूर्ण शरीराची ताकद वाढते. हे आसन केल्यानं आखडलेले खांदे मोकळे होतात.हे आसन करताना आधी ताठ उभं राहावं. दोन्ही हात छातीच्या समोर ताठ ठेवावेत. हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने (पालथ्या स्थितीत) ठेवावे. कंबर आणि मान सरळ ठेवावी आणि गुडघे वाकवत कुल्हे गुडघ्याच्या रेषेत येतील एवढं खाली यावं. म्हणजे आपण खुर्चीवर जसं बसतो तशी या आसनात आपली स्थिती होते. या आसनात थोडा वेळ राहावं. थकायला झालं की मूळ स्थितीत यावं. किमान 15 वेळा तरी हे आसन करावं. ते करताना येणारा थकवा घालवण्यासाठी काही सेकंद शवासन करावं.