व्यायाम हा आपल्या जीवनशैलीतील एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. पण रोजच्या धावपळीत आपलं त्याकडे दुर्लक्षं होतं. आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून आवरण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी, ऑफीस, प्रवास इतर कामं या सगळ्या गोष्टींसाठी वेळ राखून ठेवतो. पण व्यायाम हा आपल्या प्राधान्यावर नसल्याने आपण व्यायामासाठी मुद्दाम वेळ ठेवत नाही. दिवसभरात आपण सोशल मीडियावर जितका वेळ घालवतो त्या वेळात अगदी सहज बराच व्यायाम होऊ शकतो. पण त्याकडे काही ना काही कारणाने दुर्लक्ष होते आणि परिणामी तब्येतीवर त्याचा चुकीचा परीणाम होतो.
मग सतत थकवा येणे, अंगात त्राण नसल्यासारखे वाटणे, अंगदुखी यांसारख्या तक्रारी उद्भवत राहतात. मात्र दिवसातून ठराविक वेळ काढून व्यायाम केल्यास आरोग्याला त्याचा चांगला फायदा होतो. आलिया भट आणि करीना कपूर यांची फिटनेस ट्रेनर असलेली अंशुका परवानी नियमित करायला हवीत अशी काही सोपी आसनं सांगते. ही आसनं केल्यास शरीर लवचिक होण्यास आणि अवघडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते, नकळत आपल्याला फ्रेश वाटते. पाहूयात ही आसने कोणती आणि ती कशी करायची (Must Do 5 Daily Asanas for Good Health by Anshuka Parwani).
१. मार्जारासन
पाठीचा कणा आणि मान यांच्या स्नायूंना ताण पडावा आणि मजबूती यावी यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. यामुळे आपले पोश्चर आणि बॅलन्स सुधारण्यास मदत होते. ताण कमी करण्यास आणि मन शांत करण्यास या आसनाचा चांगला उपयोग होतो.
२. अधोमुख श्वानासन
या आसनामुळे हात, खांदे आणि पाठीच्या वरच्या भागातील स्नायू बळकट होण्यास मदत होते. पाठीचा कणा स्ट्रेच करण्यास या आसनाचा चांगला उपयोग होतो. हात, मनगट आणि बोटे मजबूत होण्यास हे आसन फायदेशीर असते. सुरुवातीला १० वेळा आणि नंतर किमान ३ मिनीटे हे आसन करावे.
३. भुजंगासन
या आसनामुळे छाती, खांदे आणि ओटीपोटाच्या स्नायूंना ताण पडण्यास मदत होते. हे स्नायू मजबूत आणि लवचिक होण्यास या आसनाचा चांगला फायदा होतो. बैठ्या कामाने कमरेच्या खालच्या भागाला आलेला कडकपणा कमी होण्यासाठी या आसनाचा फायदा होतो.
४. मलासन
कंबरेच्या खालचा भाग ओपन होण्यास याचा चांगला फायदा होतो. शरीराच्या खालच्या भागाला चांगला ताण पडण्यास याची चांगली मदत होते. पोटाला शेप येण्यास आणि मांड्या आणि मानेचा ताण कमी होण्यास या आसनाची चांगली मदत होते.
५. मणक्याला ताण देणे
पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात थोडे फोल्ड करायचे आणि हात शरीराच्या बाजूला जमिनीवर समांतर ठेवायचे. गुडघे एका बाजूला वळवून मान दुसऱ्या बाजूला वळवायची. यामुळे पाठीच्या मणक्याला ताण पडण्यास मदत होते. कंबर आणि मान या दोन्हीला ताण पडण्यास याची चांगली मदत होते.