नवरात्रोत्सव हा भारतातील एक प्रमुख सण. देशात विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. देवीचा, स्त्रीशक्तीचा जागर करत असताना स्त्रिच्या आयुष्यात ज्याप्रमाणे नाद आहे त्याचप्रमाणे तो या उत्सवातही आहे. या सणार रंग, धार्मिकता, नृत्य, पेहराव आहे त्याचप्रमाणे नादही आहे. नाद म्हणजेच आवाज, ध्वनी. ज्याा आवाजाने आपल्या शरीरात स्पंदने तयार होतात तो नाद. त्या नादावर पाय आपोआप थिरकायला लागतात. या स्पंदनांमुळे हृदयाची गती हळूहळू बदलू लागते. नादाचे अनेक प्रकार असून प्रत्येक नादाचा शरीरावर होणारा परिणाम वेगळा असतो. मग ते पुरातन काळातील सामवेदातील गीत संगीत असू दे किंवा नवीन हिंदी सिनेमातील गाणी. या नादाशी आपले पूर्ण शरीर, मन, श्वास एकरूप होते आणि आपले भान हरपून जाते.
आता या नादमय संगीतावर व्यायाम केला तर? आता संगीत ऐकताना किंवा संगीताच्या बरोबरीने व्यायाम करावा हा प्रश्न वादातीत आहे. पण नवरात्रीतील एक सर्वात सुंदर व्यायाम प्रकार म्हणजे गरबा. गुजरात प्रांतांत हा प्रकार शारदीय नवरात्रीत केला जातो. तसेच दांडियाही हमखास खेळल्या जातात. यावेळी सजून धजून आलेल्या स्त्रिया अतिशय उत्साहात असतात. प्रत्येकालाच दांडिया आणि गरबा खेळता येईल असे नाही. पण या तालावर थिरकण्याची मजाच काही और आहे. हे खेळ खेळताना अक्षरश: भान हरपून जाते आणि २-४ तास कुठे जातात हे कळतही नाही.
दांडिया किंवा गरबा खेळण्याचे काय फायदे आहेत....
१) या नृत्यामुळे कार्डिओ व्यायाम होतो.
२) नकळत आपले मन प्रसन्न होते.
३) शरीरात अतिरिक्त प्रमाणात चरबीच्या रूपात साठलेल्या कॅलरी(उष्मांक) वापरले जातात, व ही चरबी घटण्यास मदत होते.
४) घामाच्या रूपात शरीरातील अशुद्ध घटक बाहेर पडतात. चुकीच्या जेवणाच्या सवयी, शिळे अन्न, कोल्ड्रिंक, फास्ट फूड याने शरीरात साठलेले टॉक्सिन बाहेर पडायला मदत होते.
५) श्वासाची गती वाढते व त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
६) हाताचा व पायांचा चांगला व्यायाम होतो.
७) या नृत्यात व्यायाम होत असल्याने चेहऱ्यावर चमक येते.
काय काळजी घ्यावी
१) नृत्य करण्याआधी हलका आहार घ्यावा.
२) तुम्ही नृत्यात कितीही दंग झाला असाल तरी प्रत्येक ४० ते ४५ मिनिटानंतर पाणी घ्यावे.
३) संत्री किंवा मोसंबी अशी पाणीदार फळे जवळ ठेवावीत.
४) लिंबूपाणी जवळ ठेवावे. जेणेकरुन तुम्हाला एकदम थकवा आल्यासारखे झाल्यास घोट-घोट पाणी पिता येते.
५) नृत्या आधी थोडा वॉर्मअप (शरीराच्या शुक्ष्म हालचाली) कराव्यात.
६) नृत्य करताना आपण घागरा किंवा साडी असे कपडे घालतो. त्यावर हिल्सच्या चप्पल किंवा सँडल घातले जातात. मात्र हे टाळावे आणि पायात बूटांचा वापर करावा
नाद योगा म्हणजे काय?
नाद योगा म्हणजे नादावर किंवा तालावर केलेला व्यायामप्रकार हा व्यायामप्रकार आपल्याला शारीरिक व्यायाम तर घडवतोच पण त्यामुळे मानसिक शांतीही मिळते. संगीतावर व्यायाम करण्याचे फॅड असले तरी त्याकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहायला हवे. जाणून घेऊयात या नाद योगाविषयीच्या काही गोष्टी
कधी करावा?
१) व्यायामासाठी भरपूर वेळ असताना
२) थोड्या वेळाने कार्डिओ व्यायाम करायचा असल्यास
३) व्यायामाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असल्यास
४) मन आनंदी करायचे असल्यास
व्यायाम करताना संगीत कधी ऐकू नये?
१) आपण एखाद्या स्पर्धेची तयारी करत असू त्यावेळेस संगीत ऐकू नये. फक्त आपल्या व्यायामाकडे लक्ष द्यावे.
२) आपण खूप थोड्या वेळासाठी व्यायाम करणार असू तेव्हा नाद योगा करु नये.
३) शरीराला दुखापत झाली असल्यास
४) घरापासून दूर किंवा रहदारीच्या रस्त्यावर व्यायाम किंवा चालायला गेलो असल्यास
मनाली मगर-कदम
योग थेरपिस्ट
manali227@gmail.com