वृषाली जोशी-ढोके
जरा बरं नाही आज, नेहमीचेच कंबरदुखी, टाचदुखी, अंगदुखी असं कितीतरी जणी किती सहज सांगतात. आणि मग आपापली कामं रेटत राहतात. बरं वाटतच नसतं. कुरकूर सुरुच असते. कंबरदुख-अंगदुखी सतत छळते. पण डॉक्टरकडे जाणं नाही, गेलं तरी तेवढ्यापुरती औषधे पुन्हा तेच ते. ही अशी दुखणी अंगावर काढत राहिले की त्रास नेहमीचे होतात आणि ‘छान’ वाटणे आपण आरोग्य संपन्न असणे हेच मागे पडते.रोज मलम लावून शेकून दिवस कसेही "ढकलू" शकतो परंतु कंबरदुखीो मूळ कारण शोधून काढणे सुद्धा आवश्यक आहे. मुख्य म्हणजे कंबरदुखी मागेच लागू नये किंवा असलेली कंबरदुखी कमी व्हावी यासाठी नियमित योगासनांचा अभ्यास करायला हवा. रोज फक्त २ मिनिट स्वतः साठी वेळ काढून या आसनांचा अभ्यास केला तर कंबरदुखी निश्चितच दूर राही. अर्थात ही आसनं स्वत:च्या मनानं वाट्टेल तशी न करता तज्ज्ञांकडून शिकूनच घ्यायला हवीत.
३ आसने २ मिनिटे
(Image : google)
१. भुजंगासन- पोटावर झोपून हाताच्या आधाराने खांदे मान वर उचलावी. मागे दोन्ही पाय जुळलेले ठेवावेत. साधारण एक मिनिटांपर्यंत ही आसान स्थिती टिकवली तर पाठीच्या मणक्याची कार्यक्षमता चांगली सुधारते पाठीची लवचीकता वाढते.
(Image : google)
२. सेतू बंधासन - या आसानामध्ये पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात घडी घालून कमरेकडे ओढून घ्यावे. नंतर दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे घोटे घट्ट घरून कंबर वर उचलणे. लोअर बॅक साठी अतिशय फायदेशीर असे हे आसन आहे.
(Image : google)
३. शलभासन - हे आसन पोटावर झोपून करायचे आहे. यामध्ये दोन्ही पाय कंबरेतून मागे वर उचलायचे आणि जुळलेले ठेवायचे आहेत. ह्यामुळे ओटी पोटाची आणि कमरेची कार्यक्षमता सुधारते. ३० सेकंद ही आसन स्थिति टिकवता येते.
विशेष सूचना : ज्यांना अल्सर किंवा हार्निया सारखे त्रास असतील, पोटाच्या काही शस्त्रक्रिया झालेल्या असतील त्यांनी वरील आसनांचा अभ्यास शक्यतो टाळावा किंवा आपल्या डॉक्टरांच्या, योग तज्ज्ञांच्या सल्ल्याने -संमतीनेच करावा.
(लेखिका आयुषमान्य योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)