Join us  

नवरात्र स्पेशल योगा : रोज फक्त ३ आसनं आणि १० मिनिटे, सुटलेलं पोट नक्की कमी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 3:43 PM

नवरात्र स्पेशल योगा : सुटलेलं पोट कमी होत नाही याचं सगळ्यांनाच टेंशन येतं, त्यासाठी ही ३ आसनं. नवरात्र स्पेशल योगा भाग -२

ठळक मुद्देपोटावरची चरबी कमी होऊन बेढब दिसणारे शरीर सुडौल दिसायला लागेल.

वृषाली जोशी-ढोके

आपण व्यायाम करायला हवं, फिट राहायला हवं हे सगळ्यांनाच कळतं. मग त्यावर उपाय म्हणून अनेकजण जीमला लावतात. मग त्यांचं पाहून बाकीचेही फिगर मेंटेन करतात म्हणून जिम लावणे, जिम सूट विकत घेतो प्राथमिक तयारीही केली जाते. काही दिवस जातातही लोक. पण मग नंतर रोज जिमला जाणे होत नाही, पोट कमी झालेलं दिसत नाही, फी वाया गेली याचे दुःख होते आणि मग नैराश्य येतं. आणि सगळ्यांना काळजी असते ती सुटलेल्या पोटाची. काही केल्या पोट कमी होत नाही. त्यावर उपाय म्हणून आपण शिकायला हवीत घरच्याघरी करता येतील, आणि करायलाही सोपी,  अतिशय परिणामकारक काही योगासने.  योगासने आणि जोडीला योग्य आणि सकस आहार घेतला तर निश्चितच पोटावरची चरबी कमी होऊन बेढब दिसणारे शरीर सुडौल दिसायला लागेल. महिला असो वा पुरुष कोणीही हे आसनं अगदी सहजपणे करू शकतात.

वाढत्या पोटाला आवर घालणारी आसनं..

(Image : google)

१. नौकासनपाठीवर झोपून पाय सरळ ठेवावेत. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूने सरळ ताठ ठेवावे.मोठा श्वास घेत बैठक (सीट) जमिनीला तशी टेकवून ठेवावी. पाय ४५ अंशाच्या कोनात वर उचलावे.बाकी मान, पाठ वरच्या दिशेने उचलत गुडघ्याच्या दिशेने उचलावे. या स्थितीत १० ते १५ सेकंद थांबावे. पुढे सराव केल्याने अधिक वेळ एक आसन स्थिर ठेवता येईल. पुन्हा हळूहळू श्‍वास सोडत पूर्वस्थितीत यावे.

(Image : google)

२. पश्चिमोत्तानासनबैठक स्थिति मध्ये बसून दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून बसावे. या वेळी पायांचे अंगठे व टाचा जुळवून घ्यावात. दोन्ही हात कंबरेजवळ ठेवावे. मान सरळ व नजर समोर असावी. थोडे कंबरेत वाकून दोन्ही हातानी दोन्ही पायाचे अंगठे पकडावे. प्रथमच हे आसन करणाऱ्यांना पायाचा अंगठा पकडणे शक्य होईलच असे नाही. मात्र सातत्याने हा व्यायाम प्रकार करीत राहिल्यास सहज शक्य होईल. यावेळी गुडघे वाकणार नाही याची काळजी घ्या. ३० सेकंद ते एक मिनिटांपर्यंत याचा कालावधी सरावाने वाढवू शकतो. पोटावर भरपूर दाब निर्माण झाल्याने पचनाच्या तक्रारी दूर होतात.

(Image : google)

३. ऊष्ट्रासनदोन्ही गुडघ्यांवर उभे राहून पायात थोडे अन्तर घ्यावे. डावा हात गोलाकार फिरवून डाव्या पायाच्या टाचे वर ठेवावा तसेच उजवा हात गोलाकार फिरवून उजव्या टाचे वर ठेवावा आणि नंतर पाठीची मागच्या दिशेने कमान करावी. उलट प्रकारे आसन सोडावे. या वेळी झेपेल तितपतच ताण घ्यायचा आहे. डोळे मात्र उघडे ठेवायचे आहेत. ३० सेकंद ते एक मिनिटांपर्यंत सरावाने आसन टिकवता येते. कंबर आणि पोटावरची चरबी कमी करायला अतिशय उपयोगी आसन आहे.

विशेष सूचना : १.वरील सर्व आसनांचा अभ्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. योग्य पद्धतीने आसनं शिकून मग ती करावी.

(लेखिका आयुषमान्य योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)

२. आसनांच्या सोबतच हिरव्या पालेभाज्या, भरपूर फळे, कोशिंबिरी यांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. जंक फूड, चहा,कॉफी, मिठाई तसेच शीत पेये आहारातून वर्ज करावीत. स्वतः साठी रोज फक्त १० मिनिटं आणि योग्य आहार यांचा समन्वय साधला तर नक्कीच पोटावरची चरबी कमी करायला मदत होईल.

टॅग्स :योगासने प्रकार व फायदेफिटनेस टिप्स